

स्थानशोधनी
अत्यंत महत्वपूर्ण पंथीय स्थानांचा पुराव्यांसहित सचित्र आलेख…
महातीर्थ निधीवास
निधिवासा स्तवन
निधिवासा निशीसमयी, आरोगणा सपरिवारी ।
वानरेशा गोळकहोडे, हातगुंडा आली हारी ॥
धिरवीर म्हाइंभट, मार्तंडाची प्रकट चोरी ।
सहामास अवस्थान, विलोकन शिंपणे करी ॥
म्हाळशी बघण्या धाडी साधे, पुजा तद्भुवनी भारी ।
ईश आमुचा ग्राहीक वेखे, व्यवस्थेचे ज्ञान करी ॥
भक्तीजना दिवाळी पै, करुनिया पाश निवारी ।
टरल फेडी अविद्येचे, भोजेया संतोष उपहारी ॥
वानरेशा केळी होड, मोदक मार्तंड चोरीती ।
नव्हे बरवे ताती करणे, आनो भिक्षा प्रशंसिती ॥
रेवलेले कपर्दिक, काळबोट्याचे दाविती ।
शक्ती महालसा प्रभूते, सर्वही काळी ओळगती ॥
नाथोबाचा उपहारू, केसतोडू बांधविती ।
थोवे अवघे देवतांचे, चक्रस्वामिस सेविती ॥
बाइसाचा देव अविधी, संतोषाचा परिहरी ।
सदा जीवा स्मर प्रभूते, कदळीफळ जो स्वीकारी ॥
भटाचा तो स्वामी ज्ञान, भक्ती वैराग्य निरोपि ।
टाकूनिया निरोधाते, अहिंसा जीवी आरोपी ॥
चाल जीवा बघण्या तो, असतिपरी आचर सोपी ।
स्वामी रांजणगावासी, स्वयंदास्यावरून कोपी...॥ निधिवासा...
प्रस्तावना
काळाची गती विलक्षण आहे. त्याच्या ओघात अनेक प्राचीन संस्कृती लयाला गेल्या. अनेक प्राचीन शहरे, नगरे, गावे भूमिगत झाली. त्या काळावर मात करूनही काही शहरांचे भग्नावशेष त्या शहरांचे प्राचीनत्व आणि गतकालीन वैभवाची साक्ष देत विखुरलेले आढळतात. त्यांच्या आधारे भूतकाळात जाऊन शोध घेणे हा अतिशय रंजक विषय आहे.
प्राचीनत्व आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणजे नेवासा. महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक महत्त्वपूर्ण स्थळ. अहमदनगर शहराच्या ईशान्येला सुमारे ५६ कि.मी. अंतरावर प्रवरा नदीच्या तीरावर ते वसलेले आहे. निधीवास, निदवास, निवासा ही देखील नावे या शहराला आहेत.
या शहरातल्या लाडमोड टेकडीच्या परिसरात पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वतीने १९५४ ते १९६० या काळात उत्खनन झाले. सध्या हा परिसर पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. या उत्खननामुळे या शहराचे प्राचीनत्व अधिकच स्पष्ट झाले. उत्खननात यादवकालीन आणि त्यानंतर बहामनी काळातले अवशेष सापडले. त्यामानाने ही अलीकडची म्हणजे चौथी वस्ती. त्याआधी इ.स. पूर्व पहिल्या सहस्रकापासून तीन वस्त्या झाल्या. चौथ्या वस्तीच्या काळात नेवाशाला अनेक मंदिरे, घाट, मशिदी इतर वास्तू निर्माण झाल्या.
यादवकाळात हे संपन्न नगर असून यादवांच्या प्रशासकीय विभागाचे केंद्र होते. या नगराला राजकीय दृष्ट्या महत्त्व होते. म्हाइंभट राजकार्यासाठी नेवाशाला आल्याचा उल्लेख लीळाचरित्रात आला आहे. इथल्या हाटवट्या आणि घाट प्रसिद्ध होते. श्रीनागदेवाचार्य पूजाद्रव्ये आणायला डोंबेग्रामहून नेवाशाला जात असत.
नेवासा खुर्द आणि नेवासा बुद्रुक असे दोन भाग प्रवरा नदीमुळे झाले आहेत. त्यापैकी नेवासा बुद्रुक परिसरात यादवकालीन मंदिरांचे अवशेष विखुरले असून त्यात स्तंभ, स्तंभपाद, देवकोट, मूर्ती इत्यादींचा समावेश आहे. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंच्या वेळी तिथे अनेक मंदिरे होती.
सर्वज्ञांच्या प्रसन्नतेचे स्थान म्हणजे डोंबेग्राम. हे महास्थान या परिसरातच येते हा एक सुंदर योग. त्यामुळे तर नेवाशाचे महत्त्व द्विगुणित झाले आहे. अनंत, अगाध, अजिंक्य, अतर्क्य, अकल्पित, अप्रतिम, अनाकलनीय, अगोचर अशा सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे ज्या ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य झाले त्या डोंबेग्राम, प्रतिष्ठान, बीड, एळापूर अशा भाग्यवान नगरांसारखेच एक नगर निधीवास. ‘एथ देवाते राहो आवडले.' इथे अमृततुल्य, सुमधुर लीळा केल्या.
लीळाचरित्राच्या स्मरण पाठानुसार नेवाशाला ३९ लीळा घडल्या आहेत. “हे होते तेथ जाइजे” असे देवाने म्हटले खरे, पण सर्वज्ञ जिथे जिथे गेले ती सर्वच स्थाने आपल्याला उपलब्ध आहेत का? नाही. हा अपरितोष मनात असतो म्हणून ती स्थाने शोधण्याचा हा उत्कट प्रयत्न. निधीवास या ठिकाणी पाच महिन्यांपेक्षा दीर्घकाळ वास्तव्य झाले. परंतु येथील अत्यंत महत्त्वाची स्थाने कालौघात नष्ट झाली असावीत का? या ठिकाणी ओटे मांडले असावेत का? अथवा मूळ अवस्थेतच नमस्कार करण्याची परंपरा एका ठराविक काळापर्यंत होती आणि ती परंपरा काळांतराने खंडित झाली असावी का? इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधणे हा संशोधनाचा विषय आहे.
प्रथम टाकळीहून सर्वज्ञ नेवाशाला आले तेव्हा “महालक्ष्मीयेसि पुरादित्यी अवस्थान : दिस पाच :” असा उल्लेख आहे. पण त्यावेळच्या लीळा उपलब्ध नाहीत. दुसऱ्यांदा डोंबेग्रामहून आले तेव्हाच्या काळात भटोबासांना नारळाचा गोळा एकाच घावात डोक्यावर फोडायला लावला, म्हाळसीभुवना जाऊन पूजा स्वीकारली, साधेला म्हाळसी पाहायला पाठवले, वाळवंटात साइदेवाची केळी आरोगिली, बाइसा वर्णित विरक्ताला अविद्येचा मोटाळा म्हटले, देवतांनी नाथोबाचे गाऱ्हाणे आणले, सातारा पसरवून संतोषाला आणि नाथोबाला उपहार घडवला, मार्तंड आणि काळबोटा यांची चोरी प्रगट केली, भटोबासांना होड लावून केळी खायला लावली, संतोषपूर्वक दायंबाचा उपहार स्वीकारला, भक्तीजनांसह आनंदाची दिवाळी केली, हातगुंड्याची होड लावून भटोबासांना पराभूत केले, वाळवंटात हाटवटीमध्ये जाऊन ग्राहीक वेश स्वीकारला. अशा सुंदर लीळा इथे घडल्या आहेत.
आचार्य एकदा डोंबेग्रामहून नेवाशाला भर ज्वरात आले. आणखी एकदा पासवडी घ्यायला आले. तेव्हा सर्वज्ञांनी स्वतःची वस्त्रे त्यांना दिली. इथली दिवाळीही फार महत्त्वाची. या दिवाळीचे सविस्तर वर्णन लीळाचरित्रात आले आहे. मराठी भाषेला देववाणीचा दर्जा देणाऱ्या श्रीचक्रधरप्रभूंच्या सर्वच लीळा आनंददायी. त्यातही आनंदाचा कळस म्हणजे इथली दिवाळी. सर्वच लीळा प्रसन्नतेच्या आहेत.
सर्वज्ञांनी एकूण आठ दिवाळ्या केल्या. त्यापैकी हिवरळीच्या दिवाळीचेही वर्णन तपशिलात आहे. पण ही नेवाशाची दिवाळी महत्त्वाची यासाठी वाटते की, “महात्मेया दिवाळी सणु होआवा : आनंदाची दिवाळी करू ना कां :” असा सर्वज्ञांचा हेतू त्यामागे होता. ही लीळा खरोखरच अगाध आहे. श्रीचक्रधरप्रभूंनी भक्तिजनांच्या हृदयात जो परमानंद संचारला; जी आनंदाची रांकधनी केली त्यापुढे इतरांची सर्वच श्रीमंती, संपन्नता तुच्छ होती. बाह्य वस्त्रे- बाह्यरूप मळके पण अंतरातला जो आनंद भक्तीजनांच्या चेहऱ्यावर झळकला त्या तेजापुढे गावीचे ब्राह्मण त्यांची रेशमी वस्त्रेच काय पण हजारो सूर्यही फिके पडले असतील! त्या सुंदर श्रीनेत्रांनी देवाने कसे अवलोकन केले असेल आणि भक्तिजनांनी तो आनंद कसा अनुभवला असेल? सारेच अगम्य.
स्थानांमुळे आपल्या भावनांचा परिघ वाढतच जातो. स्थान म्हटले की तिथल्या लीळा आठवतात, अभ्यास, मनन, चिंतन, स्मरण सुरू होते. आपल्याला जी व्यक्ती आवडते, स्नेहा-प्रेमाची असते, तिच्या आठवणी, वस्तू आपण जपून ठेवतो. स्थानांचेही तसेच आहे. आपल्याला अत्यंत प्रिय असा साधन दाता आता नाही. पण त्यांच्या पवित्र श्रीचरण स्पर्शाने पावन झालेली स्थाने आपण जपून ठेवतो, ती जपावीशी वाटतात. मग पहिल्या किंवा दुसऱ्या विरहिणीचा दृष्टांत साच होतो.
परमेश्वराच्या वियोगातच आपण जन्माला आलो. त्यामुळे वियोगाच्या दुःखाचा तो अनुभव आपल्याला नाही. पण १६५० स्थानांपैकी कितीतरी नामशेष झाली याचे दुःख जरूर होते. त्या दुःखाचा उपशम स्थानाजवळ गेल्याने होतो. तिथल्या लीळांचा पुन: प्रत्यय येतो. ती स्थाने आपल्याला लीळा कथन करतात. एरव्ही तर स्थान जवळ नसतानाही आपण लीळा आठवतोच. पण स्थान आणि लीळा यांचे एकत्रीकरण आनंददायी असते. डोळ्यांसमोर येते. सर्वज्ञ असे आले असतील, इथे आसन झाले असेल, वस्ती स्थान असेल तर पश्चात प्रहरी देवाने सकळ जीवांचे चिंतन केले असेल! एखाद्याच्या मनात भावनांचा उत्कर्ष झाला तर भूडकाच उठतो आणि त्या अश्रुपाताबरोबर मनातली जळमटे बाहेर पडतात. हे स्थानाचे सामर्थ्य. श्रीमोठेबाबा म्हणतात, नुसती स्थाने आठवण्यापेक्षा तिथल्या लीळांसह आठवावीत.
आपल्याला स्थानांजवळ पुन्हा पुन्हा का जायला हवे? कारण “गोसावी म्हणितले : व्यक्त संबंधी अव्यक्त प्रसन्नता निक्षेपिती : मग आपुला संबंध देती : संबंध वंदने सा ठाय होति : ऐसी संबंध महिमा गोसावी श्रीमुखे निरुपिली : आणि गोसावी म्हणितले : हे असे तया रक्षण : मार्गासी अंती स्थानची रक्षैल ऐसा वरु दिधला :” म्हणूनच आपण तिथे जायला हवे. लीळांच्या दृश्यमान खुणा स्थानांच्या रूपाने उपलब्ध आहेत. देवाच्या सन्निधानी स्थानापासून तसेच नामापासूनही वेध होतो, पण असन्निधानी वेध होण्यासाठी स्थान अधिक महत्त्वाचे आहे. म्हणून उपसाधनात स्थानालाच अग्रक्रम दिला आहे.
गोसावियांनी उत्तरापथे बिजे केल्यावर दीर्घकाळ उलटून गेला आहे. आणि आता परिस्थितीही खूप बदललेली आहे. काळाची ७००-८०० वर्षांची पटले बाजूला सारून, आजच्या बदललेल्या आणि उपलब्ध भौगोलिक परिस्थितीच्या आधारे तेव्हाच्या जागांची, दिशांची, स्थळांची निश्चिती करणे तसे आव्हानात्मक जरी असले तरी आपल्या पूर्वजांनी अनेक स्थानपोथ्या लिहिल्या, एकाच स्थानाचे निरनिराळ्या पाठकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केले. त्यामुळे स्थानांचा शोध घेणे शक्य झाले आहे.
स्थाने शोधून काढली पाहिजेत असा श्रीमोठेबाबांचा नेहमीच मनोधर्म असतो. त्यांना नेहमीच वाटते की परंपरा खंडित झालेली किंवा लुप्त झालेली स्थाने पुन्हा उजेडात आली पाहिजेत. ईश्वरालाही त्याचा तोष होतच असणार. वेरूळ, पैठण, जोगेश्वरी, डोंबेग्राम ही बाबांच्या अत्यंत जिव्हाळ्याची स्थाने. त्यांनी जोगेश्वरीची जशी सुंदर आरती रचली, तसेच लीळा गुंफून नेवासा स्तवनही केले आहे. अशा स्थानांच्या जागा निश्चित करण्याचा आनंद काहीवेगळाच असतो. गर्दळलेली स्थाने शोधून काढणे, त्यांचे जतन करणे ही एक उत्तम प्रकारची ईश्वर सेवाच आहे.
श्रीमोठेबाबांना नेवाशाच्या स्थानाबद्दल फार पूर्वीपासूनच आत्मीयता आहे. लाडमोड टेकडीवरील स्थानाविषयी २००० सालापासून कोर्टात केस चालू आहे. त्याकाळी जंगले वकील हे आपल्या बाजूने नेवासा कोर्टात लढत होते. दीर्घकाळानंतरही निकाल न लागल्याने कोर्टास पुरावे द्यावे लागणार होते. त्यासाठी श्रीमोठेबाबांनी अनेक स्थानपोथ्यांमधून येथील स्थानाचे संदर्भ शोधले असता मूळ स्थानाचे संदर्भ सगळे बुद्रुक येथे जुळू लागले. म्हणून श्रीमोठेबाबांनी येथील स्थळांचा शोध घ्यावयास सांगितला. आणि स्थानपोथीतील संदर्भानुसार सगळी स्थानं जुळून आली. आणि एक एक स्थानाचं शोधकार्य सुरू झालं. अशा रीतीने येथील स्थानांचा शोध लागला आणि आपल्याला येथील मूळ स्थाने नमस्करायला मिळाली.
आता या संशोधन कार्याचा आढावा- नेवाशाच्या स्थानशोधनीमध्ये चाचरमूद, लाडमोड टेकडीवरील स्थान, कणेरेश्वर, कुसुमेश्वर, चतुर्मुख देवालय, इथले घाट, अग्निष्टिका लिंगाची देवळी, पुरादित्य, बडव्याचा आवार, पुरादित्याच्या जगतीमधली एकविरा, सूर्यकांत, नारायण मठ, परिश्रय स्थान, नेवाशातल्या हटवट्या, वाळवंट, म्हाळसा, गोपाळमठ, गोपाळ, सुंदर, कपाळेश्वर, संगमेश्वर इत्यादि स्थानांचा अभ्यासपूर्ण शोध घेतला आहे.
नकाशे आणि छायाचित्रे यामुळे निवेदनात सप्रमाण सुस्पष्टता आली आहे. अनेक वासनाभेद आणि पाठभेद यातून वाट काढत निष्कर्षाप्रत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी निर्णय नि:संदेह आहे, तर काही ठिकाणी पाठभेद नोंदवले आहेत. वर उल्लेख केलेल्या सर्व जागी जाऊन, त्या जागेचे सूक्ष्म निरीक्षण करून निर्णय मांडला आहे. तथापि त्यासाठी स्वतःचा तर्कशुद्ध विचार आवश्यक असतो. लीळाचरित्रामध्ये फक्त उल्लेख येतात सर्वज्ञ कुठून आले, कुठे आसन झाले, अवस्थान झाले, विहरण झाले, इत्यादी. उदाहरणार्थ- “मग तेथौनि गोसावी कुसुमेश्वरा बीजे केले : आसन जाले : बाइसी चरणक्षाळण केले :” पण ती जागा नेमकी कुठे, कोणत्या दिशेला, किती अंतरावर ते ठरवण्यासाठी स्थान पोथ्यांचाच आधार घ्यावा लागतो. त्याच्याही पुढची पायरी म्हणजे ते तसे खरोखर घडते का ते पाहण्यासाठी त्या वर्णनानुसार त्या जागी प्रत्यक्ष जाऊन बघणे. हे करीत असताना अभूतपूर्व समाधान मिळते.
या संशोधनकार्यात जी साधनसामग्री उपयोगात आणली, त्यात सुमारे ५०-६० पोथ्यांचा समावेश आहे. त्यात विविध पाठ आहेत. त्या पोथ्यांचे ढोबळ मानाने सहा गटात वर्गीकरण केले आहे.
१) पहिला गट- चिरडे पाठ. यात सविस्तर तपशील आढळतो. या गटात सहा पोथ्या आहेत. यात सूक्ष्म विवरण आढळते. या पाठकरांनी त्यांना श्रुत असलेल्या विविध वासनांद्वारा परिपूर्ण नेमकी माहिती दिली आहे.
२) दुसरा गट- पिढीपाठ.
३) तिसरा गट- स्थापत्यशास्त्रीय पाठ. या गटात तीन पोथ्या.
४) चौथा गट- चार पोथ्या.
५) पाचवा गट- अज्ञात पाठ. यात एकच पोथी.
६) सहावा गट- यात पाच पोथ्या. आणि संकीर्ण टाचण्या.
यादवकालीन नेवासा येथील शिलालेखांचाही समावेश संशोधन साहित्यात करता येईल.
कणेरेश्वराच्या देवळाचा उल्लेख असणारा शिलालेख
हा शिलालेख नेवासे येथे देशपांडे यांच्या वाड्यात उपलब्ध झाला होता. तो एका दीड फूट व्यासाच्या शिळेवर कोरलेला आहे. लेखाची भाषा संस्कृतमिश्र मराठी असून लिपी मात्र देवनागरी आहे.
लेखाचा उद्देश एवढाच, कणेरेश्वराच्या मंदिरात पुराण वाचण्याची वृत्ती असणाऱ्या सीलू पंडित नामक शौनक गोत्रिय, माध्यंदिन शाखेच्या ब्राह्मणाला अठरा निवर्तने भूमी सर्वकरमुक्त करून दिली त्याविषयी आहे. ही भूमी देवपुरुष जीवण याने दिली. ती पांपूविहिरनामक गावाच्या सिमागारात होती.
लेखाचे वाचन पुढीलप्रमाणे-
१. स्वस्ति श्री शकू ११६१ विकारी सं-
२. वत्सरे ॥ श्रीकणैरेश्वर देवालये ॥ पुराण-
३. वृत्तिकार: ॥ शौनकगोत्रीय: माध्यंदिन:॥
४. श्री सीलू पंडित: ॥ तथा पांपूवीहरि सीमागारे ॥
५. पुराणवृत्तीभूमी निवर्तने सर्वंनमसे अठरा १८ इए भूमी ॥
६. कणैरेश्वरदेॐमूली ॥ भूमी देवपुरुषेण जीवेण दीधली ॥
नारदमुनीच्या मठाजवळील शिलालेख
१. स्त्रीलादमाठ च उदकदाना च समस्त पुण्यवान
२. पुण्यवान देवाल्य द्या ॐ आकुरी माहादेवि
नेवासा बेलापूर मार्गावरील नारदमुनींच्या मठाजवळ असणारा हा शिलालेख कपाळेश्वर देवळाच्या उत्तरेस प्रवरेच्या पश्चिम घाटाजवळ असणाऱ्या पव्हेचा असण्याची शक्यता आहे. “देउळाउतरे पव्हेपासी घाटु : पाइरीया २०। :” ही पव्हे तत्कालीन म्हाळसेस समर्पित असावी. या पव्हेचं उदक पुण्यवान महादेवी म्हाळसा देवालयाच्या निमित्ताने समस्त पुण्यवानांना समर्पित आहे. असे उपरोक्त शिलालेखावरून वाटते.
प.पू.प.म. श्रीमोठेबाबांची प्रेरणा प्रत्येक ठिकाणी जाणवावी असाच एकूण अनुभव असतो. परमार्गीची देवता हृदयात व्यापारायला लागते आणि अदृष्टाचे सामर्थ्य स्फुरण देत राहते. त्यानुसार चहुबाजूंनी सहाय्य वर्तू लागते. अचानक वाट सापडते. रस्ता स्वच्छ दिसू लागतो.
या संशोधनाचे वैशिष्ट्य हेच सांगता येईल की कुठेही आग्रही भूमिका नाही. लाडमोड टेकडीवरील स्थानाविषयी स्थानपोथीत पुरावा मिळत नसला तरी ते स्थान आहे असा प्रत्यय काही घटनांवरून येतो. त्यामुळे ते कोणत्या लीळेचे आहे ते सांगता येत नाही. अग्निष्टिका-लिंगाची देवळी या स्थानाची निश्चिती मात्र स्थानपोथीच्याच आधारे; पण स्वतःचा तर्क वापरून केली आहे. “पुरादित्या वायव्यकोणी घाट : त्यासि वायव्यकोणी पेहेरेचीये थडीयेसी अग्निष्टिका पूर्वाभिमुख : तेथ आसन :” चिरडे गटातील स्थानपोथीतल्या या वाक्यांचे वाचन सरळ केले तर असा अर्थ होईल- पुरादित्याच्या वायव्यकोणी घाट आहे आणि त्याच्या वायव्येस पेहेरेच्या थडीस अग्निष्टिका आहे. असे वाचन केले तर हे स्थान नदीच्या पात्रात येईल. पण हे बरोबर नाही. म्हणून “त्यासि वायव्यकोणी” म्हणजे पुरादित्याच्या वायव्यकोणी अग्निष्टीका आहे असे वाचन योग्य आहे.
पुरादित्याची स्थाननिश्चिती साधार, सप्रमाण केली आहे. “गावाचा पश्चिम विभागी पेहेरेचे पुर्विले थडीये पुरादित्य :” हे वाक्य प्रमाणाला धरून नेवासा बुद्रुक गावास प्रवरेच्या तीन थडी सांगितल्या आहेत. पूर्व-पश्चिम आणि उत्तर. अर्थात पुरादित्य हा गावाच्या पूर्णपणे पश्चिम विभागी असून प्रवरेच्या पूर्व थडीवर आहे. एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडला आहे की, नेवासा बुद्रुक गावात पश्चिमेकडील प्रवरेची पूर्व थडी असणाऱ्या भागाची लांबी १०० मीटर इतकी आहे. त्यातही घळीमुळे ६० मीटर आणि ४० मीटर असे दोन भाग पडले आहेत. त्यापैकी ६० मीटर भागातच पुरादित्य जागेचा अचूक निर्देश मिळतो. पुरादित्याचे जुने अवशेष म्हणजे पौळीचा काही भाग आणि इतर काही त्रोटक अवशेष दृष्टोत्पत्तीस येतात.
तथापि स्थानपोथीतील वर्णनावरून स्थान निश्चिती करताना या मठाच्या आवारातच सांप्रत काही स्थानांच्या जागेवर ओटे मांडले आहेत. त्यात मढाच्या पायऱ्यांचे स्थान, पटीशाळेतील दिवाळीचे स्थान, उंबरवटाचे स्थान, चौकातील स्थान, अवस्थान स्थान आणि इतरही स्थाने आहेत.
एकदा पुरादित्य हे केंद्र निश्चित झाल्यामुळे पुढे बडव्याचे घर, वळ्हे, परिश्रयस्थान या जागा निश्चित करता आल्या. या पुरादित्या मागेच ‘भटोबासांकरवी होडे गुंडे टाकवणे' ही लीळा घडली. सर्वज्ञांचा तो काळ पुन्हा एकदा कल्पनेत जगणे हा अनुभवण्याचाच विषय आहे. बाह्य प्रेरणा आणि अंत:प्रेरणा एकत्र आल्या म्हणजे आशयसंपन्न अभिव्यक्ती घडते. हे श्रीमोठेबाबांचे चिंतन आणि ही देवाची कृपा.
काही लीळा आणि स्थळांच्या बाबतीत मात्र निश्चित निर्णय न देता पाठभेद आहेत तसेच नोंदवले आहेत. उदाहरणार्थ- पासवडी अविधी परिहार या प्रसंगी सर्वज्ञांनी संतोषाला सातरा पसरायला लावला, या स्थळाविषयी चरित्र पोथ्यांमध्ये मतभिन्नता आढळते. काही पाठात ही लीळा वेरूळ इथल्या माणकेश्वराजवळची आहे; तर काही पाठात ही लीळा नेवाशाची आहे. यातून तर्काला पटेल असा विचार करून मार्ग कसा काढायचा? स्थानपोथ्यांमध्ये तिन्ही ठिकाणी पुरादित्यापुढे वडाखाली ही लीळा घडली असाच उल्लेख आहे. तथापि संतोषाला ती पासवडी वेरूळला मिळाली. आणि ती काही काळाने नेवाशाला अर्पण केली की नेवाशालाच मिळाली आणि त्यांनी ती सर्वज्ञांना अर्पण करून परत मागितली? या प्रश्नांचे उत्तर मिळणे कठीण आहे. असे असले तरी अनेक स्थानपोथ्यांचे परिशीलन करावेच लागले.
असेच मतभेद गोपाळाच्या देवळासंबंधी; कारण स्थानपोथीत गोपाळाच्या तीन देवळांचा उल्लेख येतो. एक प्रवरेच्या पश्चिम काठावर, दुसरा प्रवरेच्या पूर्व काठावर, आणि तिसरा म्हाळसेच्या पश्चिम दारवंठ्यात. त्यामुळे या पाठभेदांची केवळ नोंद करणे क्रमप्राप्त होते.
नेवाशातील महत्त्वाची वास्तू म्हणजे म्हाळसेचे मंदिर. आज ही वास्तू भग्नावस्थेत आहे. पुरादित्यप्रमाणेच याही वास्तूचे स्थापत्यशास्त्र प्राचीन काळात खूप प्रगत होते. कारण मंदिराच्या पश्चिम दारवंठ्यावरील घाट आजही अस्तित्वात आहे. पायऱ्यांची रचना मजबूत आहे. म्हाळसीभुवना आगमनी पूजा स्वीकारू, गोपाळुनी साधे म्हाळसी पाहो धाडणे, म्हाळसा दर्शनागमनी भोजेया सामर्थ्य कथन, माडी सिंपणे अवलोकणे, यात्रे ग्राहिकवेष स्वीकारे सर्वा संबंधु देणे, तथा यात्राकर्षणी निषेधी व्यवस्था कथन, नाथोबा सातराविधी प्रकाशी एळौर मांगळौर म्हणवणे, (गोसावी विहरणा म्हाळसापुरा बीजे केले) वाळवंटी साइदेवा भेटी : कर्दळी फळे आरोगणा, बाइसी वर्णित विरक्ताचे सोपहास भक्ता दाखवणे. या सर्व लीळा म्हाळसा मंदिराशी आणि परिसराशी निगडित आहेत. लीळाचरित्रात “म्हाळसी देवता प्रसिद्ध : सिमुगा तथा महामंगीये (माघ पौर्णिमा) तेथ सिंपणे होए : तियेकाळी तेथ महापेठ : माघमासी यात्रा भरे :” असे उल्लेख आहेत. विचारपर आणि प्रसन्नतेच्या या लीळा आहेत. या वास्तूचे सविस्तर वर्णन वास्तवतेत भर घालणारे आहे. घाट, हटवट्या, दारवंठे पायऱ्या, पाटांगणे, वाळवंट हा तपशील म्हाळसा मंदिराच्या वर्णनाला एक प्रकारची पूर्णता आणतो. या म्हाळसा मंदिराचे आजचे स्वरूप, बांधकाम आणि त्यामागचा इतिहासही माहितीपूर्ण आहे.
समग्र देवताराशी आमच्या स्वामींच्या दासी-सेविका पण त्यांचाही तो स्वामीच असल्यामुळे साधेलाही दुसऱ्यांदा शृंगारलेली म्हाळसी पाहायला पाठवले. “आता होए” या श्रीमुखीच्या शब्दांमध्ये देवतांविषयीचे सौजन्य दिसते, त्याचप्रमाणे दर्शनाला येणारे आधी सर्वज्ञांना पूजाद्रव्य अर्पण करीत होते. या कृत्यातूनही म्हाळसेला आनंदच झाला असणार.
प्रवरेच्या पूर्वतटावरील म्हाळसेच्या पश्चिम दारवंठ्यावर घाट होता. त्या घाटासमोर वाळवंट होते. या वाळवंटात तर अनेक महत्त्वाच्या लीळा घडल्या. त्यातही ग्राहकवेष स्वीकारण्याची लीळा हेतुपूर्ण. सर्वांना संबंध देणे हा तर हेतू होताच, परंतु महादानी परब्रह्म परमेश्वर ग्राहीक होतो. वास्तविक तो अनंत ब्रम्हांडाचा मालक; पण ग्राहक होतो. कर्मरहाटीत गिऱ्हाईक पैसे देऊन वस्तू घेतात. मात्र हे ग्राहक वेगळे आहेत. त्यांनी सर्वांना संबंध दिला; घेतले काहीच नाही. उलट त्यांनाच समाधान, सुख दिले.
इथल्या लीळा आणि स्थाने यांची सांगड घालून विचार केला तर एक वेगळेच परिमाण हाती लागते. नेवाशाच्या मार्गाने सर्वज्ञ निघाले त्याच्या प्रारंभीच चौबाऱ्याला पहाट झाली. आज या स्थानाचा मागमूस लागत नसला तरी “देवो न जोडे तरी कणव तरी जोडावी :” या श्रीमुखीच्या अमृतमय शब्दांनीच नेवासा इथल्या वास्तव्याची सुरुवात झाली. पुरादित्याच्या मठात रात्रीच्या वेळी सपरिवारी झालेली आरोगणा ही एक विलक्षण आरोगणा. विलक्षण पूजावसरासारखीच. पुरादित्याच्या मंदिरातच सर्वज्ञांनी नारळाचा गोळा एकाच घावात भटोबासांना डोक्यावर फोडायला लावला. ही लीळा ज्या स्थानी घडली तिथेच भटोबासांच्या किती दुःखरूप कर्मांचा नाश झाला असेल ते गोसावीच जाणती. शिवाय “हा होडेकरून कचला गेला :” ही करुणेची किनारही या स्थानाला आहे.
श्रीचक्रधर भगवंतांनी मनुष्यवेशाला मान देऊन काही लीळा केल्या; तथापि त्यामागेही जीवांच्या भल्याचाच हेतू होता. परमपूज्य बाबांच्या निधीवासा स्तवनात तर फार छान हेतू आले आहेत. यात्रा आकर्षण प्रसंगी परमेश्वर अव्यवस्था कधीच करत नाहीत. ‘हे व्यवस्थेचे ज्ञान करी' या शब्दात बाबा सांगतात. हातगुंडा किंवा इतर कुठल्याही होड प्रसंगी भटोबासांची हार होऊनही त्यांची अदृष्टपर जीतच झाली होती. महाजनांचे पाश कथन करून भक्तीजनांचे पाश निवारले. घडला अविधी परिहरायला तेव्हा स्वतः परमेश्वर होते. आता आमच्या अविधींचे डोंगर कोण नासणार? परमेश्वर आधी दोष प्रगट करतात. कार्याला आणतात आणि मग शिक्षापण करतात. असे सुंदर अर्थ बाबांनी विशद केले आहेत.
सर्वच लीळांमध्ये कुठे कणवेचे कार्य, तर कुठे कृपेचे कार्य; कुठे दयेचे कार्य, तर कुठे निरभिमानतेचे कार्य. अशा सद्गुणांनी परिप्लुत लीळा त्या स्थानी आठवल्या की ते स्थानही त्या गुणांनी भारित झाल्याचे जाणवते. नाथोबा सातरा विधी प्रकाशी ही लीळा वाळवंटातच घडली. एखाद्याला खरोखरच आर्त, दुःख, तळमळ असेल तर देव अशांची आर्त पूर्ण करतात. दायंबाचा उपहार स्वीकारून स्वामींनी त्यांना “गोसावी माते सनाथ केले : माझे जिवीचे संचरले जाणीतले :” असा आनंद दिला. असे तर सर्वज्ञांनी अनेकांना निवविले असेल. अशा तऱ्हेने स्थान आपल्याशी बोलत असते. असा नेवासा आपल्याशी संवाद साधतो.
नेवाशातील स्थानांचा शोध घेताना स्थानपोथीतील वर्णनानुसार येथील परिसराची शोधनी भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करूनच केली आहे. त्यातही मूळ वास्तूच्या अवशेषांचा अभ्यास केल्यानंतरच निर्णयाप्रत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. येथील स्थळांंची निश्चिती अचूक व्हावी म्हणून स्थानपोथीतील स्थानवर्णनास अनुसरून काही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे.
नेवाशातील वर-खाली असणाऱ्या भूपृष्ठाच्या (Terrain) प्रदेशाची तंत्रज्ञानाचा उपयोग करून पाहणी केल्यामुळे काही स्थळांंची निश्चिती करणे सोपे झाले. उदा. स्थानपोथीतीत ज्या घाटाच्या वर्णनात ७ पायऱ्यांचा उल्लेख आहे तिथे तेवढाच वर असणारा भूप्रदेश आहे. आणि ज्या ठिकाणी २९ पायऱ्यांचा, ५६ पायऱ्यांचा उल्लेख आहेत त्या ठिकाणी तेवढ्याच उंचीचा भूप्रदेश आढळल्यामुळे त्या स्थळाची निश्चिती करणे अधिक सुकर झाले.
सद्य:स्थितीतील परिस्थितीत तत्कालीन परिस्थितीचे आकलन व्हावे म्हणून त्रिमितीय छायाचित्रे आणि मानचित्रांचा उपयोग करण्यात आला आहे. संपूर्ण नेवाशाची (360 Degree Panoramic View) सर्वदर्शी दृश्ये, व्यापक दृश्ये ही या वेबपेजवर पाहावयास मिळतील.
सर्वगुणनिधी, तेजोनिधी, सकल सौभाग्याचा निधी
अशा परमेश्वर श्रीचक्रधर भगवंतांचा वास असलेले निधिवास!
इथल्या स्थानवंदनाचा लाभ तर सदासर्वकाळ आहेच!
स्थानशोधनीच्या कार्यात भेंडा, कवठा येथील उपदेशी मंडळींनी सहकार्य आणि श्रमदानाच्या सेवेचा वाटा उचलला आहे, त्यांच्या या बहुमोल सेवेचे दाएपसाए सर्वज्ञ साधनदाता श्रीचक्रधरप्रभु त्यांच्या झोळीत देवो!
***
संपादकीय
प्रस्तुत स्थानपोथीच्या संपादनासाठी आम्हाला सुमारे पन्नास पोथ्या प्राप्त झाल्या. यात विविध पिढ्यांतील पाठांचा समावेश होतो. या सर्वांचा साक्षेपी दृष्टीने अभ्यास केला असता या पोथ्यांचे वर्गीकरण ढोबळमानाने पाच गटांत करता येईल. या प्रत्येक गटातील जी जी पोथी सर्व दृष्टीने योग्य व समृद्ध वाटली तिचा आम्ही प्रस्तुत संपादनासाठी मुख्यत्वे उपयोग केला. तथापि त्या गटातील इतरही पोथ्यांचा पाठभेदांकरिता उपयोग झालेला आहेच. अशाप्रकारे एकूण ३१ पोथ्यांचा प्रत्यक्षरित्या वापर केलेला आहे. त्या पोथ्यांच्या गटवारीनुसार त्यांना आम्ही नावे दिलेली आहेत. त्यांचा अन्वय पुढील प्रमाणे-
[आम्हाला प्राप्त झालेल्या सर्व पोथ्या ‘सकळ लिपी'तीलच होत्या. तथापि पोथीची लांबी-रुंदी, पानांचा वर्ण, जीर्णता, अक्षरांचे वळण, इतर प्रकरणे, पृष्ठसंख्या, इ. अभिव्यक्तीविषयक पोथीमीमांसेत न गुंतता अभ्यासकांच्या उपयोगी जाईल अशा स्थानपोथीविषयक मूळ आशयाला प्रधान ठेऊन प्रस्तुत लेख लिहिला जात आहे.]
पहिला गट- चिरडे पाठ.
ख२- ही ‘चिरडे'पाठाची पोथी आहे. हा पाठ ‘स्थानशोधनीत' आम्ही प्रथमत:च प्रकाशित केला. ही पोथी गगनविहार संग्रहालयातील आहे. हिचा समाप्तीलेख-
“एवं चिडलेया महानुभावाचीं स्थानें : सूभंभवतू :”
असा संक्षिप्त आहे. परंतु याच पाठाचे टाचण असलेली दुसरीही एक पोथी हस्तगत झाली. त्यात याच पाठातील मजकूर संक्षिप्त रुपाने आहे. त्यातील समाप्तीलेखावरून आपल्याला पाठकाराचा अन्वय कळतो-
“चिडलेया अनंतराजा विक्षातु तयाचां गोपाळनंदन सुतु तेणें लिहिला स्थानाचा अर्थु चित देवोनि :॥:”
उ- ही पोथी पूर्वाश्रमीचे सद्भक्त दि. को. माळवे यांच्याकडून मिळाली आहे. या पोथीत अळजपूरपर्यंतची काही पाने गहाळ आहेत. तसेच सुरुवातीची काही मोजकी गावं सोडल्यास वडनेरपासून शेवटपर्यंत पूर्णपणे ‘ख२' सदृशच आहे. यातील समाप्ती लेख पुढीलप्रमाणे-
“शकें १५४८ : क्षयेनाम संवत्सरे : जेष्टमासे : शुक्ल पक्षे तीथि चतोर्दश वार सोम : तदीने पुस्तक समाप्ता : यादृशं पुस्तकं दृष्ट्वा तादृशं लिखीते मया यदी शूद्रं वा शुद्रमथाप्रतिलीखीते मम दोष न लीपिते : भग्निपुष्टि कटीग्रीवारधोदृष्टीरधोमुखं । कष्टेन लीखिते शास्त्रं यत्नेन प्रतिपाळयतू :।: कुमर आम्नाय कोठी गोमराजसुतु कमळाकरमुनिचें हस्ताक्षेर संपुर्णमीति :॥: गंगातीरे ग्राम राजुर तेथ पोथी लीहीली :॥:”
अं- ही पोथी चिरडे पाठाची असून ‘उ' सदृश आहे.
समाप्ती लेख- “इती स्थानें : पुर्वार्ध : उत्तरार्ध : रीधपुर समाप्त : सकें १५०६ तारण सवंछरे : वैसाखवदि : पंचमी : वारू रवि : तदीनी स्थानें समाप्त :”
बी- ही पोथी श्रीदेवदत्त ग्रंथालयातील असून तिचा उतारा ‘बी' चरित्रपाठाच्या शेवटी आहे. ही पोथी ‘उ' सदृशच आहे. यात दिशा निर्देशासाठी खुणांचा वापर केला असल्यामुळे त्या समजण्यात वाचकाची गल्लत होऊ शकते. ‘उ' पोथीत मात्र दिशांचा स्पष्ट उल्लेख आहे.
दि३- गगनविहार संग्रहालय येथील ही पोथी आहे. ही श्रीदेवदत्त ग्रंथालयातील ‘बी' चरित्रपाठा सदृश असली तरी अशुद्ध वाटल्याने आवश्यक तिथेच तिचा उपयोग करण्यात आला आहे. ह्यात समाप्ती लेख नाही.
प्र१- ही पोथी पूर्वाश्रमीचे सद्भक्त दि. को. माळवे यांच्याकडून मिळाली आहे. या पोथीच्या आरंभीच ‘महेश्वर पाठ' असे नमूद केले आहे. तथापि हा पाठ ‘चि' पाठाशी मिळता जुळता असल्यामुळे याचा याच गटात समावेश करणे उचित वाटले. ह्या पोथीलाही समाप्ती लेख नाही.
ख३- ही चिडले पाठाची पोथी श्रीदेवदत्त ग्रंथालयातील असून त्यात संक्षिप्त माहिती आहे.
समाप्ती लेख- “चीडलेयां अनंतराजा वीक्षांतु : तयांचां गोपाळनंदनु सुतु : तेणें लेहीला स्थानाचा अर्थु : चीत देउनि :॥०॥: अबदोवां : सबदोवा : मम दोस न लीपीत : सकें १५०५ ॥ सुभाण सवछरे अस्विनमासे वदि बारसी वारू बुधिवारु तदीनी उतरीली प्रति : मांडोगणग्रामे : सीधनाथे स्थाने उतरिली :”
ख६, क- ह्या श्रीदेवदत्त ग्रंथालयातील दोन पोथ्या चिडले पाठासदृश असून परस्परभिन्न आहेत.
दुसरा गट- पिढीपाठ.
स६ं- ही पोथी श्रीदेवदत्त ग्रंथालयातील आहे. हिचा समाप्तीलेख पुढीलप्रमाणे-
समाप्ती लेख- ‘एवं स्थानें पूर्वार्ध उत्तरार्ध परशरामबास : रामेश्वरबास : हिराइसें : शिउबास अंगीकृत पिढीपाठ महाराष्ट्राअंतरवृत्त्यें अनुष्ठानशिळांसि आचरणिये : सर्वज्ञे म्हणितलें : “महाराष्ट्री असावे :” यातवं : एरी लीळा अथवा स्थानें तें आइकावें इतुलेचि : इति नागराज उपशिष्य देवमुनिकृत शोधनस्थानें समाप्तिमगमनु : शकें १५२५ शुभकृत संवत्सरे : चैत्र शुद्ध पंचमी : सोमवारे तद्दिने स्थान शोधन संपूर्ण :॥'
ख५- ही पोथी श्रीदेवदत्त ग्रंथालयातील पिढीपाठाची आहे.
समाप्ती लेख- ‘एवं स्थानें पूर्वार्ध उत्तरार्ध परशरामबास : रामेश्वरबास : हिराइसें : शिउबास अंगीकृत पिढीपाठ महाराष्ट्राअंतरवृत्त्यें अनुष्ठानशिळांसि आचरणिये : सर्वज्ञे म्हणितलें : “महाराष्ट्री असावे :” यातवं : एरी लीळा अथवा स्थानें तें आइकावें इतुलेचि : इति नागराज उपशिष्य देवमुनिकृत शोधनस्थानें समाप्तिमगमनु : शकें १५२५ शुभकृत संवत्सरे : चैत्र शुद्ध पंचमी : सोमवारे तद्दिने स्थान शोधन संपूर्ण :॥'
जा- ही पोथी देखील श्रीदेवदत्त ग्रंथालयातील पिढीपाठाची आहे.
समाप्ती लेख- “इति नागराज उपशिष्य देवमुनिकृत शोधन : स्थानें समाप्तिमगमनु : शूभमस्त लेखक पाठकयो :॥०॥ शकें १५२५ शुभकृत संवत्सरे : चैत्र शुद्ध पंचमी : सोमवारे तद्दिने स्थान शोधन संपूर्ण :॥”
आपल्या लक्षात आले असेलच की या तिन्ही पोथ्यांचा समाप्ती लेख सारखाच आहे. कदाचित या तिन्ही प्रतींचे लिखाण सोबतच झाले असावे. अथवा एकाच प्रतीवरून या लिहिल्या असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
तिसरा गट- एक स्थापत्यशास्त्रीय पाठ.
स१ं- ही मराठवाडा विद्यापीठातील १४०९ क्रमांकाची पोथी आहे.
स२ं- ही मराठवाडा विद्यापीठातील ९७० क्रमांकाची पोथी आहे.
दुर्दैवाने वरील दोन्ही पोथ्यांचे समाप्तीलेख उपलब्ध नाहीत.
दि२- ही पोथी गगनविहार संग्रहालय येथील असून ती वरील दोन पोथ्यांसदृशच आहे.
समाप्ती लेख- “अस्थानें समापता : चैत्र मासें सामापतें : अदीत्ये दीसे : संपुर्णता :”
चौथा गट- संक्षिप्त वर्णन असणारे पाठ.
हे गट प्राचीन असले तरी यातील पोथ्यांमध्ये फार संक्षिप्त माहिती असते.
ग६- श्रीदेवदत्त संग्रहातील पोथी.
ही- ई.श्री.राजुदादा पुजदेकर, वरणगाव. यांच्या ग्रंथ संग्रहातील पोथी आहे.
समाप्ती लेख- “एवं हिराइ पाठ तिन्हीरुपें स्थाने समाप्त :...मयंका कुमरें लाड सारंग हस्ताक्षेरें पोथी संपुर्ण समाप्त :”
त३- ई.श्री. राजधरबुवा तळेगावकर, डोंगरसांगवी.
ग-२ (त-३ सदृश) ही पोथी श्रीदेवदत्त ग्रंथालयातील आहे.
समाप्ती लेख- “एवं पुर्वार्ध स्थानें : उत्तरार्ध स्थानें : ऋद्धपूरिची स्थानें : संपूर्ण समावेसू : शूभंभवतू : लेखक प(पा)ठकयो वाचिता वीजया हो :॥: मुकुंदभारतीचा सुतु : कृष्णदाया वीख्यातु : तेणे ऋद्धपूरीचेया स्थानाचा पाठू : उतरीला :॥: एथाप्रति लीक्षेते मम दोष न लिप्यते :॥०॥”
स४ं- मराठवाडा विद्यापिठ, १५२१ क्र. पोथी
अ (सं-४ १५२१ सदृश) ही पोथी श्रीदेवदत्त ग्रंथालयातील आहे.
पु. पुजदेकर संग्रह, पुजदा (पिढीपाठ शिवबास स्वमतीकारकृत)
समाप्ती लेख- “एवं उत्तरार्ध पुर्वार्ध पिढीपाठ शिवबासाचा :”
मा-१ (पु. सदृश) ही पोथी श्रीदेवदत्त ग्रंथालयातील आहे.
समाप्ती लेख- “एवं पुर्वार्ध : उत्तरार्ध : रुद्धपुर स्थान : हा पीढीपाठ सीवबास : स्वमतिकाराचा :॥०॥”
भा. भालोदकर संग्रह, भालोद.
समाप्ती लेख- “एवं स्थाने संपुर्ण समाप्त : सके सतरासे ८८ ॥ क्षेनाम संवछरे : हस्त अक्षयर रवीनामनोउभीद पंचसरीताख्ये : ततसिष्ये दिआलमुनीचे जाणावें :”
त-१ ई.श्री. राजधरबुवा तळेगावकर, डोंगरसांगवी.
ग-३ वाजेश्वरी ग्रंथ संग्रह, वाजेश्वरी.
मा-२ (ग-३ सदृश) ही पोथी श्रीदेवदत्त ग्रंथालयातील आहे.
वा-२ (ग-३ सदृश) ही पोथी श्रीदेवदत्त ग्रंथालयातील आहे.
प्रस्तुत संपादनासाठी या गटातील पुढील तेरा पोथ्यांचा उपयोग केला आहे. त्यात कमीअधिक शब्दभेदाने आलेले वर्णन पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल-
ही- “माडी सीमुगा सींपणें :”
त३- “देउळा दक्षीणीली दारवठा माडावरी बिजे केले : वरुनि सिंपणें अवलोकणें :”
सं-४ “देउळादक्षीणीली दारवठां माडावरौनि सींपणे अवलोकणें :”
पु. “माडासी सिमगा सींपणे :”
भा. “माडी सीमुगा सींपणें :”
त-१ या प्रतीत हे वाक्य नाही. इतर वर्णनही खूप संक्षिप्त आहे.
ख-६ “देउळादक्षिणीली दारवठां माडावरुनि सींपणे अवलोकणे :”
ग-३ “माडावरि आसन :”
असे असले तरी काही वाक्ये मात्र पूर्णपणे वेगळीही आढळतात-
ही. “गोसावीयासी डोंबेग्रामुनि बिजे करीतां चाचरामुदे आसन : पव्हे आसन : गावापूर्वे मळा :”
पु. “गोसावीयासी डोंबेग्रामुनि बिजे करीतां चाचरमोदी आसन : तेथचे फळीए थोरा सुखफळा नेले म्हणणें : पव्हे आसन : गावापूर्वे मळा :”
ख-६ “डोंबेग्रामुनि बिजे करीता चाचरमुदी आसन जाले : मग गोसावी तेथौनि बिजे केले : गावापसिमे मळा :”
ग-३. “डोंबेग्रामीहुनि निवासयासी बिजे करीतां मार्गि चाचरमुदे आसन : पव्हेसि आसन : नीधीवासां गावां पसिमे (पे)हरे उतरे कणरेस्वरी आसन :”
पाचवा गट- अज्ञात पाठ.
दि५- गगनविहार संग्रहालय येथील ही पोथी आहे. या पोथीत इतरांहून निराळे वर्णन असले तरी ते त्रोटक स्वरुपात आहे. तुरळक ठिकाणी आवश्यकतेनुसार हिचा उपयोग केला आहे. कधीतरी फार पूर्वीच ही प्रत हाताळणाऱ्याकडून यातील समाप्तीलेखाचे पान पोथीपासून सुटे झाले असावे. त्यामुळे त्याने स्वहस्ताक्षरात पोथीच्या पहिल्याच कोऱ्या पानावर समाप्तीलेखातील फक्त ‘शके १५११' एवढाच मजकूर जाणीवपूर्वक जणू काही आपल्यासाठी लिहून ठेवला आहे.
सहावा गट- इतर संकीर्ण टाचण्या.
वा- ही वाइंदेशकर चरित्रपाठाची पोथी श्रीदेवदत्त ग्रंथालयात आहे. यातील काही संदर्भ आवश्यकतेनुसार घेतलेले आहेत.
स्म- श्रीदेवदत्त ग्रंथालयातील ‘स्मरणपाठ' चरित्रग्रंथाचाही उपयोग झाला.
***
पाठमीमांसा
पहिला गट- चिरडे पाठ.
कुठलाही पंथीय वा पंथीयेतर दस्तऐवज, तो ‘उत्तरोत्तर मुनीनां प्रामाण्यम्' या उक्तीनुसार जेवढा प्राचीन तेवढा अधिक प्रमाण मानला जातो. स्थानपोथीबद्दलही जेवढा प्राचीन पाठ, जेवढी जुनी पोथी तेवढी ती अधिक प्रमाण ठरते. त्याद्वारे आपण सर्वज्ञांच्या वेळच्या परिस्थितीचा वेध घेऊ शकतो आणि स्थानांच्या मूळ स्थितीजवळ जाऊन उत्तम पक्षाच्या स्मरणास पात्र ठरू शकतो. काही वर्षांपूर्वी स्थानपोथी संपादण्याचे कार्य आरंभिले तेव्हा आणिक पोथीला मूळ पाठ धरून कार्य सुरू होते. अर्थात याहूनही अधिक सूक्ष्म विवरण असलेली एखादी पोथी पंथात कुठे ना कुठे अस्तित्वात असेलच, असा विश्वास होता. परंतु आपल्या खंतीमुळे ती आपल्याला प्राप्त होत नाही, असा अपरितोष भावत तिचा धांडोळा घेणे मात्र अत्र-तत्र-सर्वत्र सुरूच होते. तेव्हा त्या अनंतशक्तीसामर्थ्यवंत कैवल्यचिंतामणीची कृपा ओळली आणि ही अपूर्व पोथी हाती लागली. चाळता क्षणीच मूळ पाठ म्हणून आपण हिचाच उपयोग करावा असा निःसंदिग्ध निश्चय झाला. स्थानपोथी संदर्भातील हे अप्रतिम लेणे आजवर इतके दुर्लक्षित कसे काय राहिले याचाच अचंबा वाटतो. ह्यानंतरही काही पोथ्या मिळाल्या परंतु हीच सर्व दृष्टीने योग्य वाटली. कारण ह्या पोथीतील स्थानवर्णन तुलनेने अधिक सूक्ष्म व विस्तारपूर्वक वाटले. इतके सविस्तर वर्णन असलेली पोथी पाहून तेव्हा आम्ही तिला अर्वाचीन समजली होती. परंतु तळेगावकर आम्नायाच्या अन्वयस्थळाची माहिती सांगणाऱ्या एका पोथीत हिच्या प्राचीनत्वाबद्दल पुढील माहिती हाती लागली-
“भटोबासांचा वर्त्तमानी म्हाईंभटीं चरित्र सोधनी केली होति : परि स्थान सोधनि राहीली होती : मग म्हाईंभटीं अंतकाळी लक्ष्मींद्रभटातें (बाइदेवबासाते) म्हणितले, ‘तुम्ही स्थान सोधनी करावी' : मग तेही भटाची आज्ञा घेउनी स्थान शोधनी केली : तेचि पुन चिडले महानुभावीं स्थाने सोधीले : तेथ दोरी पांड : आवड : हे तेहि घातलें : मग कवीश्वरबासांचा सिष्यी चरीत्रान्वयो शास्त्रान्वयो लाउनि सांखळा बांधलिया : तेची वचनें अर्थुनि पेटेहरिबासी स्थळें बांधलि : मग हेत वासनांतरें पुढां प्रवर्त्तलिया : अचळे मुरारिबास(अचळ शिवबास) यांचा विसोबासि ज्ञान प्रबोध केला : ऐसे कवीश्वर आम्नायी टीका टीपन प्रवर्त्तली :॥३॥:”
अर्थात यातील काही मजकूर विवाद्य असला तरी 'श्रीचिडले' महानुभावांच्या काळनिर्देशावर प्रकाश पडतो.
‘चिरडे पाठ' हा सर्वच दृष्टींनी सूक्ष्म स्थानवर्णन कसे करतो, हे तपशील हाताळताना कुठल्याही सूज्ञ वाचकास लगेच लक्षात येईल, याबद्दल अजिबात शंका नाही.
उदा : ‘हि.' पाठात निधीवासा येथील पुरादित्याची संक्षिप्त माहिती आहे. तर चिरडे पाठकारांनी त्यांना श्रुत असलेल्या विविध वासनांद्वारा परिपूर्ण माहिती दिली आहे.
हि.- “पुरादीत्यीं अवस्थान : मास ४ : पुर्वामुख आदित्याचा मढ : पटिसाळ : दक्षीणीली भींतीसीं पुर्वपसिम उत्तरामुख वोटा : तेथ गोसावियांसी अवस्थान जालें : जक्तीचा दारवठा पुर्वाभिमुख : आंगणी मादनेस्थान : पुरादीत्यापसिमे गुंडे : वासनां पसिमे मार्तंड चौरी : तीकडेचि परीश्रेये :।: पुरादित्या दक्षीणे वळ्हे : मार्तंड चोरी : तीकडेचि परीश्रेये : पुर्वपसीम हाटवटी : हाटवटीये वडाखालि संतोषाचा सातरा :॥:”
उ.(चिरडे)- “पुरादैतीं अवस्थान : मास ६ : पुरांदैत्याचें देउळ पूर्वाभिमुख : चौकीं आसन : तेथ विसेख १३ : भीतरि दक्षिणेचे भीतीसीं पुर्वपसीम वोटा उत्तराभिमुख : तेथ विसेख १६ : पुढें आंगण चातुर्दक्ष : आंगणी वीसेख ६ : आंगणी मादनें : देउळाची पटीसाळ उत्तरदक्षिण पुर्वाभिमुख : पटिसाळे जोतें : पटीसाळेसि पाइरीया ४ : पटिसाळे वीसेख ६ : भेटि ४ : उंबरा : कवाडें : जगतीचा दारवठा पुर्वाभिमुख : एकी वासना उत्तराभिमुख : दारवठा पाइरीया :॥: जगतीबाहीरि पसीमे पसिमाभिमुख आसन : तेथ भटोबासाकरवि होडे गुंडे टाकवणें :॥: पुरादैत्या आज्ञे जगतीआंतु नारायेणाचा मढु उत्तराभिमुख : पुढां पटिसाळ पूर्व-पश्चिम उत्तराभिमुख : चौकीं आसन : तेथ वीसेख तीन :॥: तेथ भक्तजनाचें बीढार :॥: मढा दक्षिणे पौळीबाहीरि बडवेयाचें घर : तेथ आसन :॥: दक्षिणेचे पौळीसीं खीडकीं : ते खीडकीये पश्चिमे बडवेयाची कडबेयाची वळ्हे : तेथ मार्तंडाची चोरी : तीकडेचि प्रश्रये :॥: तथा उत्तरेच्या दारवठेया पूर्वे वोता आश्राइत परिश्रये :॥: पुर्व-पश्चिम राजबीदी : ते राजबीदी दक्षिणे वडु : त्या वडातळि कापडमांडवी : तेथे गोसावी बीजें केलें : त्या वडाखालि संतोखाचा सातरा :॥:”
मशीदींचा उल्लेख
आपली काही स्थाने गरदळली, काही ठिकाणी यवनांनी मशीदी केल्या. इतर पाठांत त्याबद्दल विशेष माहिती येत नाही. चिरडे पाठकार मात्र त्याची नेमकी माहिती देतात.
पैठण- “प्रागखांडी जाता उजवेया हाता महालक्ष्मीचे देउळ पूर्वाभिमुख : तथा ते चंडीका : तयातळीची (तयांतुचि) लिंगाचे देउळ दक्षिणाभिमुख : तेथचि विनायकाचे देउळ उत्तराभिमुख : या तिही देउळाचिये जगतीचा दारवंठा पूर्वाभिमुख : तयाची मसिद केली :”
“आडेया उत्तरे पांडा १० उभी काळीका पश्चिमाभिमुख : बैठी काळीका पश्चिमाभिमुख : शोधु : दोन्हीं काळीका पूर्व-पश्चिम : पूर्वेची ते बैठी काळीका पश्चिमाभिमुख : पश्चिमेची ते उभी काळीका पूर्वाभिमुख : दोहीं माझारी गोदरी उत्तर-दक्षिण रुंद पांडा १० : पूर्वेचे काळीकेहुनि पश्चिमेची काळीका पांडा १० : तेथ अवस्थान दिस २० : तीस डावेया हाता पांडा १० वोंकारमांधाता उत्तराभिमुख : एकी वासना पूर्वाभिमुख : एकी वासना ते वोंकार माधानि : पश्चिमेचे काळीकेचा मुगुट केला : आणि पूर्वेची काळीका ते तुरकांचेया आवारांतु पडीली : काळीका आडें पश्चिमाभिमुख : त्यासि पाइरीया ४९ : घाटीं पाटांगणें सा :”
“भूतसृष्टी दाखवणे पश्चिमे टेकावरी देउळे तिन : एक महालक्ष्मीचे देउळ पूर्वाभिमुख : एक एकविरेचे देउळ दक्षिणाभिमुख : एक विनायकाचे देउळ : शोध : ते चंडीकेचे देउळ उत्तराभिमुख : या तिही देउळाची जगती एकीची : जगतीचा दारवंठा पूर्वाभिमुख : तयाची मसिद केली :”
मांगळौर- “मांगरौळी वराहदेवी आसन : वसति : गावांत मढु पूर्वाभिमुख : जगतीचा दारवंठा पूर्वाभिमुख : तयाचि मसिद केली :”
अचलपुर- द्राक्षीचा आवारू मसीदीचे अज्ञकोनी पूर्वामुख :”
या मशिदींच्या उल्लेखांवरून ही पोथी तुलनेने अर्वाचिन असल्याचे प्रथम दर्शनी भासते. परंतु अगदी देवाच्या काळापूर्वीही भारतात मशिदी बांधल्या गेल्याचे उल्लेख उपलब्ध आहेत. कुतुबमिनार जवळील ‘कुव्वतुल इस्लाम' या आद्य मशिदीची बांधणी शके १११५ च्या सुमारास अनेक जैन व हिंदू मदिरांचे दगड वापरून करण्यात आली, असे मराठी विश्वकोशाच्या १२व्या खंडात पृष्ठ क्र. १३५४ वर नमूद केले आहे. तसेच सध्याच्या मान्यताप्राप्त अन्य इतिहासानुसार दिल्लीचा बादशहा अल्लाउद्दीन खिलजी याचा सेनापती मलिक काफूर याने महाराष्ट्र लुटल्यानंतर तो देवगडावरून तेलंगणात गेला. मग कर्नाटकात बल्लाळ राजाचा पराभव केला आणि थेट रामेश्वरमला मशिद बांधली. हे वर्ष होतं शके १२३२. श्रीचिडले महानुभावांच्या काळाविषयी दुसऱ्या दृष्टीने विचार केल्यास त्यांच्या पाठात ‘रामेश्वरबा वासना,' ‘परशरामबा वासना,' ‘आनोबासाचिया वासना' हे शब्द येतात. यावरून त्यांचा काळ वरील तिघांनंतर, म्हणजे शके १२७० नंतर कधीतरी असू शकतो. पण असे विधान करतानाही एक अडचण अशी येते की याच चिरडे पाठाच्या काही पोथ्यांत ‘शोध' असाही उल्लेख क्वचित ठिकाणी येतो. पण तो ‘शोध' श्रीमुरारीमल्लबास विद्वांस यांचा नसावा. कारण या पाठाच्या उपरोल्लेखित पोथ्यांपैकी एका पोथीचा उपलब्ध असलेला समाप्तीलेखाचा शक १५०६ असा आहे. मग हा ‘शोध' श्रीगुर्जर शिवबास यांचा असू शकतो. किंवा श्रीचिडले महानुभावांनी स्वतः घेतलेला ‘शोध'ही असू शकतो. एकंदरित, आपल्याला या स्थानपोथीकारांच्या काळाविषयी ‘शोध' घेण्यास वाव आहे.
दुसरा गट- पिढीपाठ.
आतापर्यंतच्या विवेचनानुसार चिरडे पाठ अतिशय महत्त्वाचा ठरतो. तरीही प्रत्येक पाठाचे, किंबहुना त्यातील प्रत्येक पोथीचे एक अनन्यसाधारण असे वैशिष्ट्य असते. या पैकी एकही पोथी डावलल्यास आजमितीला परिपूर्ण स्थानपोथीचे निर्माणकार्य शक्य नव्हते. म्हणून इतर पाठांच्या वैशिष्ट्याकडेही जरा अवधान देऊया.
श्रीगुर्जर शिवबासांना मान्य असलेल्या स्थानांबद्दल श्रीदेवमुनींनी पिढीपाठाच्या सुरुवातीला पुढील माहिती दिली आहे-
“स्थाने पिढी अनुमत : परशरामबास महदाचार्ये तत्कृत आदि : तथा तोचि पाठु चरित्रे प्रधान करुनि आणिकही बहुत पाठ यासी मिळती : ते सिवबासी संबंधुनि पिढीपाठ केला : हा वाचिलेया सकळ पाठाचि योग्यता : जैसिया सरीता समुद्री मिळेति : इये पाठी नाही ते न लगते जाणावे : आणि गावाचा सरवळाही केला : तो पिढीसी असे : ते अनुमत प्रधान करुनि स्थानासी अनुक्रमु लाविजता असिजे : तो अवबोध सिळासी विनियोगु : फलेठानि कऱ्हाडेया ब्राह्मणाचा घरी अवतारु स्वीकारु : मातापूरी व्याघ्रवेष निमित्त करुनि उभय शक्तीचा स्वीकार : द्वारावतिये गमन : तथा अवस्थान : पूरत्याग : भरवसी प्रधान पुत्राचे पुर स्वीकार : द्युतक्रीडा निमित्ते उदास्य स्वीकारे बिजे करणे : हा चरित्रान्वयो आठवावा इतुलेचि : स्थानविनियोगु नाही : आता स्थान विनियोगु : रांधवनहाटी श्रीप्रभू भेटी :”
पण त्यांच्या पाठात इतर स्थानपोथीकारांनी ‘भरवस' नंतर घेतलेल्या कांती, वोरंगल, डाकराम, पांचाळेश्वर, गावी एकी हाटामध्ये, गावी एकी व्यवहारेचेया..., भोगराम, भांडारा, मनशीळ, मार्गी वृक्षाखाली आसन, खिरारीया नेत्रपतन, मार्गी गावी एकी चोर सांघाती, गावी एकी वेठी गमन, मार्गी बीजे करीत असति तव रानम्हैसा..., गावा एका बीजे करीत असति : तव रानी गोपाळ मिळाले असती : ते रानभेरीचा खेळ खेळत असती, मार्गी संन्यासीया स्थीति, गोपाळचोंढी, मार्गी लाहासी पिली खेळवणे, गावी एके पाणिपात्रा बिजे करणे : ठाकुरभार्ये पुत्रदान, गावी एकी ब्राह्मणाचा घरी वऱ्हाडी सिद्ध रे सिद्ध! म्हणणे : तेथ चौकीये थाळा आरोगणा, गावी एकी सन्यासि मुर्ख : पुस्तक भांडार देववणे मग तयासी भांडौनि बिजे करणे, गावी एकी सन्यासियाचि उघाणि, गावी एकी वृक्षाखाली अवस्थान : गोसावी सवेउपरी हे गोष्टी सांगितली : गोसावी नगरामध्ये पाणिपात्रासि बिजे केले : तव रामदरणेयाचे दुस तेथ पडले, खेडी जानाळा पश्चिमिलीए पाळी गोसावियांसी मर्दना : मादने : पूजा : आरोगण : तेथ वसति : तथा शोध : देउळवाडा काजळेश्वरा उत्तरे दुस : तेथ वसति : एक म्हणति वडाखाली आसन : एकी वासना खडकावरी आसन : शोध : अष्टमहासिद्धी उत्तरे दुस : अष्टमहासिद्धीसि आसन : या स्थानांचा समावेश नाही.
स्थानपोथीतील वर्णनशैली
ख२, बी, उ, त१, या इतर पाठांतील स्थानपोथ्यांत एकांक, पूर्वार्ध, उत्तरार्ध अशा तीन भागांत स्थानांचे विभाजन केलेले आहे तर शिवबासांच्या पिढीपाठात यांचे एकत्र वर्णन केलेले असून ‘पूर्वार्ध, उत्तरार्ध' असा निर्देश केला आहे.
उदा. ‘घोगरगावी वसति नगराकार : पूर्वार्ध : उत्तरार्ध :'
‘अरण्यग्रामी गुंफे अवस्थान : दिस ५... पूर्वार्ध स्थाने ५ : उत्तरार्ध नागनाथी चौकी आसन... नागनाथाचेया उपहुडानंतरे परिश्रया बिजे केले : तेथ गुंफा पाहिली : तेथ अवस्थान : दिस १५ तथा १६ :'
‘भिंगारी आदित्यी अवस्थान दिस १५ : उत्तरार्धीही १५ :' ‘टेक उतरता उत्तरे पंचमवेदु : तयाचि टेका उत्तरे साधा अनुवर्जित बिजे करणे : हे स्थान उत्तरार्धी :'
काही स्थाने कशी घडतात या विषयी त्यांचा विवेक-
भडेगाव- ‘दुसरी वसै गावा नैऋत्ये : गौराइसे खांबा आड बैसली होती यातव ते घडे : आणि हे निखंब म्हणौनि तियेचि स्थाने एथ परीसावी :'
रावसगाव- ‘तयाची वोताचिये थडीये उपाध्याचा निक्षेपु : ते संबंधाचे नमस्करणीये म्हणोनि स्थान मांडीले :'
सोमनाथ (साष्टी पिंपळगाव)- ‘थडीये नाथोबाचा निक्षेप : ते संबंधाचे नमस्करणीये म्हणौनि हे स्थान मांडिले :'
देवळाच्या चौकातील नमस्कारी जागा नेमकी कुठे, या विषयी त्यांनी अचूक स्थाननिर्देश केलेले आढळतात-
‘सेंदुर्णी गोपाळी रिगता डावेया हाता चौकी अवस्थान :'
‘सेलवडे बामेश्वरी वसति : रिगता डावेया हाता चौकी :'
त्यांच्या पाठाशी न जुळणाऱ्या माहितीविषयी त्यांनीच केलेला निर्देश-
काजराळा गावा वायव्ये तळेयाचिये पूर्विली पाळी काजळेश्वराचे देउळ पूर्वाभिमुख.. : स्थाने ११ : ‘येरे उत्तरेकडीले स्थाने न लगती चरित्रपाठे :'
‘श्रीनगर स्थाने २१ : एरे देउळे आदि पिढीपाठ चरित्राचेनि क्रमे न लगती :'
‘ डोमेग्रामीची स्थाने ५३ : एरे पिढीपाठाचेनि मते न लगती :'
‘ नेउरगाविचि स्थाने १७ : एरे देउळे चरित्रपाठाचेनी मते न लगती :'
त्यांच्या काळी जिर्णोद्धार केलेल्या ठिकाणाविषयी काही ठिकाणी उल्लेख येतो-
‘एवं पेहेरासंगमीची स्थाने ६ : खालुते देउळ ते न लगते : ते नवे केले असे : तदाकाळीचे नव्हे :'
गट तीन- स्थापत्यशास्त्रीय पाठ.
या स्थानपोथीचे पाठकार कोण असावेत या बद्दल अजून निश्चित माहिती उपलब्ध होत नाही. तरी अभ्यासांती हा पाठ ‘पिढीपाठा'पेक्षा प्राचीन असावा, असा अंदाज बांधता येतो. या गटातील पोथ्यांमध्ये स्थानांचे वर्णन स्थापत्यशास्त्रातील शैलीप्रमाणे तपशीलवार आढळते. एखाद्या स्थानाचं वर्णन करताना देवळाची दिशा निश्चित करून त्याच्या जगतीचे वर्णन करतात. मग मधील विविध वास्तू कोण्या दिशेला आहेत याचे वर्णन करून मुख्य देवळाचं वर्णन करतात. ते करताना देवळाच्या दारशंका, उंबरवट, चौक, खांब, पटिशाळा याचीही इत्थंभूत माहिती देतात. खालील उदाहरणावरून ते कटाक्षाने लक्षात येईल.
१. उदा : लोणार- धार । “लोणार नगरमहाद्वार : एक उत्तराभिमुख : एक पश्चिमाभिमुख : धारे जाता एकु दारवठा : पूर्विली आडवांगी पाइरीया १२ : उतरतिया वेंघतिया : धारेवरी आसन लोंबता श्रीचरणी : धारेवरी दोनि चिरे : दोही आडवांगी पाइरीया १०-१० : पटीसाळ : दक्षिणाभिमुखे पूर्वाभिमुखे पटीशाळे आसन : धारेचिया कुंडाचे तिन दारवंठे : एक पूर्वाभिमुख : पाइरीया १६ : एकु पश्चिमाभिमुख : पाइरीया १६ : एकु दक्षिणाभिमुख : पाइरीया १६ : भितरी रीगता डावेया हाताची सोंडी : पश्चिमिली आडवांगी आसन : चिरे ६ : पाटांगणे २ : पूर्विलीकडील आडवांगिचे कुंडा दोनि रिगावे : एक पश्चिमाभिमुख : पाइरीया १३ : एक दक्षिणाभिमुख : पाइरीया १३ : पापाहार पापविनासनाचे देउळ पूर्वाभिमुख : मंडपाचे दोनि दोरवठे : एक उत्तराभिमुख : एक पूर्वाभिमुख : पौळीचे दोनि दारवठे : एकु पूर्वाभिमुख वडाकडे : एकु पश्चिमाभिमुख : धारेचा घाटु दक्षिणाभिमुख : कुमारेश्वरा जाता पाइरीया ४० :
कुमारेश्वर, कमळजा । कुमारेश्वराचे देउळ पूर्वाभिमुख : मंडपाचे तिनि दारवठे : एक दक्षिणाभिमुख : एक पूर्वाभिमुख : एक उत्तराभिमुख : पौळीचे दोनि दारवठे : एकु दक्षिणाभिमुख वायव्यकोना आश्राइत : पाइरीया ६ : एकु उत्तराभिमुख : पाइरीया ८ : उत्तर दिसे घाट : पूर्व दिसे मार्गु : घाटा पश्चिम दिसे मार्गु घाटु : भैरवाचे देउळ उत्तराभिमुख : भैरवा मागा वोटा आणि डावेया हाता चौकु : पूर्वेचा अज्ञकोनी परिश्रयस्थान : कमळजेचे दक्षिणे भैरवाचे देउळ डोंगरा अधोपरी : कमळजेचे देउळ उत्तराभिमुख : मंडपाचे तिनि दारवठे : एक उत्तराभिमुख : एकु पूर्वाभिमुख : पाइरीया ५ : एकु पश्चिमाभिमुख : पाइरीया ५ : पौळीचा दारवठा उत्तराभिमुख : पाइरीया १६ : कमळजैचा घाटु : धारातीर्थीचा वडु : पापहारी कपाळनारायणाचे देउळ : वासनांतरे नमस्करीजे :”
या गटातील पोथ्यांमुळे प्रस्तुत संहितेला आगळाच आकृतीबंध प्राप्त झाला आहे. स्थानवर्णनाची एक अपूर्व धाटणी यात पाहावयास मिळते. इतर पाठांपेक्षा त्यांच्या पाठात स्वतंत्र वैशिष्ट्ये आढळतात. वेरूळ लेण्यांतील यथावत असलेल्या स्थानांची माहिती देताना तर त्यांची वर्णनशैली अधिकच खुलते.
२. लेणे । “आता लेणी : राजविहारु खण तिन : तिसरा खणी माचा उत्तर-दक्षिण : माचेयापासी वोवरी दक्षिणाभिमुख : माचेयापुढे मर्दना मादने : वोवरीसी आरोगणा : वरीलिये खणीचा दारवठा पश्चिमाभिमुख : पाइरीया १२ : मागुता पूर्वाभिमुख दारवठा उतरता दुसरीये खणीचा : पाइरीया १० : (आता खालिली खणी तिसरा खणी दक्षिणीली आडवांगी उतरता पाइरीया १५ : पश्चिमाभिमुख मागौता पूर्वाभिमुख : पाइरीया १० :) तिसरा खणीचा दारवंठा दक्षिणीली आडवांगी पश्चिमाभिमुख : पाइरीया १६ : मागौता पूर्वाभिमुख : पाइरीया १० : पौळीचा दारवठा पश्चिमाभिमुख :।: कोकसवाढेयाचे लेणे.. पाइरीया ७ : मागौतिया पूर्वाभिमुख पाइरीया ८ :।: धुमेश्वराचे लेणे दोनि खण... ये लेणी वासनांतरे : एकी वासना माणकेश्वराचे लेणे : चौकासी तिनि दारवठे : एकु दक्षिणाभिमुख : एकु उत्तराभिमुख : एकु पूर्वाभिमुख : माणकेश्वरा दक्षिणे आडवांगी खालिली खणी विवर पेखणेयाचे : (पूर्विलीकडील माणकेश्वरा दक्षिणील आडवांगी खालिल खणी विवर पेखणेयाचे :) भितरी रिगता पाइरीया १० : वरीली खणी जळक्रीडा : दारवठा पश्चिमाभिमुख : वेंघता पाइरीया १७ : मागौता पूर्वाभिमुख दारवठा : पाइरीया १० : माणिकेश्वरापुढे तिनि साजे : पश्चिमिला साजेयासी उत्तराभिमुख द्वार : तेचि पुढे विवर दक्षिणाभिमुख : रिगावा पश्चिमाभिमुख : एकु उत्तराभिमुख : इसाळुवाचेया लेणेया बिजे केले : पाइरीया ८ : माणिकेश्वराचिया पश्चिमिली मंडपाचीया पाइरीया वेंघता उतरता २५ (२०।५) : मंडपाचिया दोही आडवांगीचिया वेंघतिया पाइरीया ३६ : दुसरी पाइरीया ३६ (वेंघतिया २०।५ दुसरीये २०।५): उत्तरीली आडवांगी मर्गजेश्वराचे लेणे : वेंघता दारवठा पूर्विलीकडे : पाइरीया ४१ (वेंघता दारवंठा पूर्विलिकडे पाइरीया १०।२०।११) : पौळीचा दारवठा पश्चिमाभिमुख : पाइरीया ५ : संकरेश्वराचे लेणे : दक्षिणीलीकडे दारवठा : उपरकुंडीचे पाणी खाली पडे : ते धारे पाइरीया २५ : उत्तरीलीकडील संदि तिचि पटीसाळ : पाइरीया ५ : उत्तरीली दारवंठाचिया ६ : उपरकुंडीये जोगेश्वरीचे लेणे दक्षिणाभिमुख : हावेया हाता आसन : दोन्ही लेणी लिंगाची पश्चिमाभिमुख : आसन.. :
असे प्रत्येक लेण्याची दिशा, मजले, प्रत्येक मजला वेंघताना असलेल्या पायऱ्यांची अचूक संख्या, दारवंठे, सर्वज्ञांचे आसनस्थान, इ. हुबेहूब वर्णन वाचून आपण बसल्या जागीच अख्खे वेरूळ फिरून येतो!”
स्थानवर्णनासह ते त्या वास्तू भोवताली असलेल्या जागांचेही वर्णन करतात आणि असे करताना ती वास्तू/देऊळ हे निव्वळ खूण म्हणून दिलेले आहे, वांचून ते नमस्कारी नाही, असाही निर्देश करतात-
श्रीनगर- ‘मढावरी अज्ञकोनी पिंपळु हे खुण :'
‘भिलमढीसी पारीसनाथाचे देउळ पूर्वाभिमुख : हे खुण :'
‘पुढे साजे गणेसाचे पूर्वाभिमुख : हे खुण :'
‘वडातळी खडक फोडीले आहे हे खुण :'
नासिक- ‘देउळा इशान्यकोनी विहिरी आणि अडु हे खुण :'
अडगाव पव्हे- ‘पव्हेसी वायव्यकोनी वडु आहे हे खुण : मार्गी वोहळ खालवा ऐसा आहे : वावरु आहे : पूर्विली काठी मार्गी नदि आहे : हे खुण :' ‘मार्गासी उत्तरे तळे आहे : येता डावेया हाता हे खुण :'
नांदुर (मध्यमेश्वर)- ‘जळक्रीडे खाच ऐसी खडके आहाति : हे खुण :'
भाटेपुरी- ‘धाबेयापुढे अडु होता : आता चिच आहे हे खुण :'
माहुर(सर्वतीर्थ)-‘तेथ लिंग उत्तरे हे खुण :'
मेहकर(सारंगधर)- ‘सिद्धनाथाचे देउळ पूर्वाभिमुख : हे खुण : देउळ नमस्करणिय नव्हे :'
हे पाठकार त्यांना श्रुत असलेल्या इतरांच्या वासनाही प्रामाणिकपणे नोंदवतात-
खराळा- ‘कोण्ही देउळीयेपुढा दंडवत घालीति'
त्र्यंबक- ‘एकी वासना मढु आहे : घाट हे खुण : रामेश्वरबा देउळ वासनांतरे :'
त्यांच्या काळी हयात असलेल्या वा बदललेल्या मार्गांचा निर्देश-
‘एकु मार्गु उजवेया हाता : डावेया हाताचा मार्गु ऋद्धपूरीचा :'
वेरूळ- ‘नगरांतुनि सिवाळेया येता मढापुढुनि बिदी होती :'
श्रीनगर- ‘पाट गावा पश्चिमे : तळेयाचिये पाळी पसिमिला खडकासी नासिकाचा मार्गु : तळेयासी उत्तरीली पाळीखाली मार्गु नासिकीचा :'
नद्यांची नावे : (इतर स्थानपोथ्यांत नद्यांच्या नावाविषयी क्वचित ठिकाणी उल्लेख येतो.)
नाशिक- ‘पंचायतनाचिया देउळा दक्षिणे नदी सरस्वती :'
निफाड- ‘नदी नाव वडाळी :' ‘संगमु दोही नदीचा : कादवा आणि वडाळी :'
गट चौथा- पूर्वप्रकाशित गट.
या गटातील पोथ्यांची माहिती त्रोटक स्वरूपाची असल्यामुळे त्यातील माहितीचा उपयोग खूप कमी प्रमाणात केला आहे.
***