top of page

महातीर्थ निधीवास

​सूची 

डोंबेग्राम ते निधीवास-

     उत्तरार्ध काळात सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू डोंबेग्रामहून नेवाशाला आले तेव्हा प्रथम ‘चाचरमूद’१ (बेलपिंपळगाव) येथे आसन झाले. पुढे काही अंतरावर असलेल्या ‘चौबारा’२ येथे पहाटेच्या सुमारास आसन झाले. सांप्रत या जागेचा काहीच मागमूस लागत नाही. परंतु ही जागा बेलपिंपळगाव-नेवासा या दोन्हीमध्ये कुठेतरी असावी. येथून सर्वज्ञांनी नेवाशातच गावाच्या पश्चिम विभागी प्रवरेच्या उत्तर तटावर असलेल्या ‘कणेरेश्वर’ नावाच्या देवालयात बीजे केले. देवळाच्या चौकात आसन झाले. आणि कणेरेश्वराजवळच कुसुमेश्वराचे देऊळ होते- ‘‘निवासेया पश्चिमे गंगे उत्तरे कणेरेश्वरु : तयापूर्वे जवळीचि कुसुमेश्वरु :’’ तिथेही आसन झाले. मग येथून सर्वज्ञांनी मंडळिकांना पुरादित्याच्या मठात पाठविले.

     कुसुमेश्वराच्या पश्चिमेकडे चतुर्मुखाचे देऊळ होते. त्या देवळाच्या दक्षिण दारवंठ्याला लागून भव्य घाट होता.३ हाच तो ‘‘पुरादित्या वाव्यकोनी घाट : ते घाटी आसन :’’ त्या घाटावर सर्वज्ञांचे आसन झाले. आणि दक्षिणेकडे काही अंतरावर अग्निष्टिका होती, तिथेही आसन झाले. यानंतर सर्वज्ञांनी पुरादित्याच्या मठात बीजे केले.

page 02.png

नेवाशाचे सद्य:स्थितीतील ऐतिहासिक मानचित्र

page 03_edited.png

पूरादित्यी अवस्थान

     उत्तरार्ध काळात सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू डोंबेग्रामाहून नेवाशाला दोन वेळा आले. पहिल्या वेळेस आले तेव्हा पाच दिवस अवस्थान झाले. आणि दुसऱ्या वेळेस आले तेव्हा पाच महिन्यांच्या वर अवस्थान झाले. दुसऱ्यांदा झालेल्या अवस्थानात निरनिराळे पाठभेद आढळतात. परंतु श्रीनागराजांचे उपशिष्य देवमुनीकृत स्थानपोथीत मात्र पाच महिन्यांच्या वर अवस्थान झाले असे उदाहरणासह दिले आहे. ‘‘निवासां पूरादित्यीं अवस्थान मास पाच : दिवाळिये पासौनि सिमूगा आंतु यातव :’’ अर्थात दिवाळी ते शिमगा या दोन्ही पर्वासंबंधित लीळा या नेवाशात झाल्या असल्यामुळे पाच महिन्यांच्या वर सर्वज्ञांनी या ठिकाणी वास्तव्य केले असा निष्कर्ष निघतो.

लाडमोड टेकडीवरील स्थान

     निधीवास या ठिकाणी पाच महिन्यांपेक्षाही दीर्घकालीन वास्तव्य झाले. परंतु येथील अत्यंत महत्त्वाची स्थाने नमस करण्याची परंपरा कालौघात मावळत गेली असावी का? खूण म्हणून या ठिकाणी पूर्वजांनी ओटे मांडले होते का? अथवा ओटेविरहित मूळ अवस्थेतच स्थान नमस करण्याची परंपरा ठरावीक काळापर्यंत होती; आणि ती परंपरा कालांतराने खंडीत झाली असावी का? इत्यादि प्रश्नांची उत्तरे शोधणे हा संशोधनाचा विषय आहे.

     विसाव्या शतकात नेवासा खुर्द येथील लाडमोड टेकडीवर पुरादित्य म्हटल्या जाणाऱ्या उपलब्ध स्थानाची नोंद काही ग्रंथांत आढळते, परंतु स्थानपोथीत पुरादित्य या स्थळाविषयीच्या दिशानिर्देशाविषयीचे सुक्ष्म निरिक्षण केले असता त्याचा निर्देश नेवासा बुद्रुक येथे आढळतो. लाडमोड टेकडीवरील स्थळाची दिशा स्थानपोथीतील दिशानिर्देशाच्या अगदी विरुद्ध आहे. म्हणून सांप्रत पुरादित्य म्हटले जाणारे स्थान ते पुरादित्य नसून विहरणस्थान आहे असे म्हणावे लागेल. परंपरेने हे स्थान आपण नमस्करीत जरी असलो तरी ते विहरण स्थान आहे असेही म्हणावयास स्थानपोथीत वा चरित्रपोथ्यांत कोणताच पाठपुरावा मिळत नाही.

     प्रवरेचा प्रवाह पूर्वी गावाच्या दक्षिणेकडून होता. पुढे काळांतराने गावाच्या पश्चिमेस एक जवाएवढी खिंड पडली आणि तिचा प्रवाह दोन्ही गावांच्या मधून झाला. त्यामुळे गावाचे खूर्द आणि बुद्रुक असे दोन भाग झाले. अशी येथील रहिवाशी ग्रामस्थांमध्ये समजूत आहे. या समजूतीतही मतभेद आहेत.१ काही वयोवृद्ध गृहस्थांचे म्हणणे आहे की, प्रवरेच्या मूळ प्रवाहात काही बदल झाला नाही. मग प्रवरेच्या प्रवाहात बदल झाला या समजूतीवरूनच म. दत्तराजदादा शेवलीकर यांनी त्यांच्या स्थानमार्गदर्शकात ही स्थाने नामशेष झाली असे म्हटले आहे. परंतु ती स्थाने नामशेष झाली नसून ती नेवासा बुद्रुक येथे आहेत. आणि ती बुद्रुक येथेच कशी आहेत याविषयी आपण पुढे पाहणार आहोत. येथील ग्रामस्थांचा प्रवरेच्या प्रवाहात बदल झाला अशी समजूत का झाली असावी याचे कारण शोधणे अत्यंत गरजेचे आहे.

     प्रवरेचा प्रवाह बदलला अशी समजूत होण्यास कारण असे की, लाडमोड टेकडीवरील पुरादित्य नावाने ओळखल्या जाणाऱ्या जागेच्या मागून असलेला ओढ्यासारखा जलप्रवाह नेवासा खुर्द गावाला वळसा घालून पुन्हा प्रवरेत मिळतो. हा कोण्या काळात निर्माण झाला असेल याची माहिती मिळत नाही. परंतु मराठा, मुघल वा निजामशाहीत (साधारणपणे पेशवाईच्या काळात) झाला असावा.

     हा प्रवाह तत्कालीन राजवटीत शहरास पाणी पुरवठा व्हावा या हेतूने निर्माण केला असावा अशी दाट शक्यता वाटते. गावाच्या पश्चिमेस असणारा भूभाग मुळातच उंच असल्याने तसे करणे शक्य झाले. या प्रवाहाला पाहून नदीच्या प्रवाहात बदल झाला अशी काही ग्रामस्थांची समजूत झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नेवाशाचे सद्य:स्थितीतील ऐतिहासिक मानचित्र

page 06.png

लाडमोड टेकडी या स्थळात डेक्कन कॉलेज, पुणे तर्फे पुरातत्त्वज्ञ ह.धी.सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन करण्यात आले (१९५४-६०). सदर उत्खननातून प्रागैतिहासिक काळ, उत्तर पुराश्म काळ, मध्य पुराश्म, ताम्रपाषाण युग नंतर प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड, रोमन कालखंड, बहामनी कालखंड अशा विविध कालखंडांतील संस्कृतींचे अवशेष दिसून आले असे त्या संशोधकांचे म्हणणे आहे.

          

या स्थानाविषयीची एक घटना

या स्थानासंदर्भात एक घटना घडली. आणि त्या घटनेचे साक्षीदार होते श्रीमयंकराज पंजाबी. त्यांनी ती घटना श्रीगुरुवर्य मोठेबाबांना सांगितली होती. ती घटना पुढीलप्रमाणे-   

या स्थानाचं बांधकाम करावं असं एका भिक्षुकांना वाटत होते. त्यासाठी तसा हेतू धरून त्यांनी या पांढरीवर वास्तव्य केलं. अनुष्ठान केलं आणि एके दिवशी रात्री त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नात ते म्हणतात, ‘देवा! मला हे स्थान बांधायचंय.’ मग त्यांना स्वप्नातच एक जागा दिसली आणि ‘या ठिकाणी खोद.’ असा दृष्टांत झाला. त्यांनी स्वप्नात दाखवलेल्या जागेवर खोदकाम केलं. त्या खोदकामात त्यांना भूमिगत धनद्रव्याचा लाभ झाला. त्यांनी या मिळालेल्या धनलाभातून, पैशातून स्थानाचं बांधकाम करायला पाहिजे होतं, पण ते भलतंच काहीतरी करीत बसले. त्यामुळे त्यांचा अधःपात झाला.

ममदापुरला असणाऱ्या एक वयोवृद्ध तपस्विनी या स्थानाविषयी सांगत असत की, ‘आम्ही लहानपणी जात असू तेव्हा तिथला ओटा फार उंच टेकडीवर होता. तो नमस्करण्यासाठी दगडगोटे धरून वर चढावं लागत होतं.’ म्हणजे त्यांच्या लहानपणीच्या काळात या ठिकाणी एकच ओटा होता. पुढे कालांतराने कोण्या महंतांनी ही जागा समतळ करून त्यावर तीन ओटे मांडले.

 

ज्ञानेश्वर मंदिर

      या भागातच येथून दक्षिणेस दोन फर्लांग अंतरावर ज्ञानेश्वर मंदिर आहे. पूर्वी त्या ठिकाणी एक पुरातन मंदिर होते. त्या मंदिरातील खांबावर करवीरेश्वरास नंदादीप लावण्याविषयी दिलेल्या वर्षासनाबाबतचा एक लेख कोरलेला आहे. त्यावरून या ठिकाणी करवीरेश्वराचे (कणैरेश्वराचे) देऊळ होते. असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. परंतु ते याच ठिकाणी होते याचा कोणताही सबळ पुरावा नाही. पैस खांबाच्या भोवती बांधण्यात आलेल्या नव्या मंदिराचे उद्घाटन १९६३ साली झाले.

निधीवास आणि प्रवरा

     चरित्रपोथ्या आणि स्थानपोथ्यांतील वर्णनाचे सूक्ष्म निरीक्षण केले असता निधीवास शहराचे मुळातच दोन भाग होते असे सहज लक्षात येते.

    प्रवरेच्या प्रवाहात बदल झाला होता ही समजूत मानली तर मूळ म्हाळसा देवालय असणारी उपलब्ध जागा आजही पाहावयास मिळते. आणि या पुरातन स्थळाचा स्थानपोथीत अचूक निर्देश आढळतो. त्यामूळे नदीचा प्रवाह बदलला ही समजूत पूर्णपणे चूकीची ठरते.

     स्थानपोथीद्वारे प्रवरेच्या दोन्ही थडीवरील नेवाशाच्या स्थळनिर्देशाचे सुक्ष्म निरिक्षण करताना येथील भोगौलीक परिस्थितीचा अभ्यास असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय दिशानिर्देश जुळविणे कठिण आहे. खुर्द आणि बुद्रुक गावातून वाहणाऱ्या प्रवरेचा आकार इंग्रजीतल्या ‘यू’ आकारासारखा आहे. अशा आकारामुळे प्रवरेस ‘पूर्व-पश्चिम’ दोन आणि ‘उत्तर-दक्षिण’ एक असे सहा तट निर्माण झाले आहेत. त्या सहाही तटाविषयी (थडीविषयी) असणारे स्थानपोथीतील दिशानिर्देश आणि स्थळ यांचा अचूक निर्देश कळण्यास ‘नेवासा गावाचे सद्य परिस्थितीतील ऐतिहासिक मानचित्र’ पाहावे.

     सर्वज्ञ जेव्हा डोंबेग्रामाहून नेवाशास आले तेव्हा प्रवरेच्या उत्तर काठावरील नेवासा बुद्रक या ठिकाणी असलेल्या पुरादित्य मठात आले.

     पुरादित्य हा नेवासा बुद्रुक गावाच्या पश्चिमेस प्रवरेच्या पूर्व काठावर होता हे स्थानपोथीतल्या पुढील वाक्यावरून अगदी स्पष्ट होते. ‘‘गावाचा पसीमे विभागी पेहरेचे पूर्वीले थडीये पुरादित्य :’’ ‘‘पुरादित्यापुढें पूर्व-पश्चिम हाटवटी : हाटवटीचिये पूर्विली सिरां घाटावरी देउळी : तियेपुढें उभया ठाकौनि यात्रा आकर्षणी व्यवस्था कथन :’’ पुरादित्य मठाच्या पूर्व दारवठ्यापासून ते प्रवरेच्या पश्चिम टोकापर्यंत तत्कालिन हाटवटी (बाजारपेठ) होती. हाटवटीच्या पूर्व टोकावर घाट होता. आणि घाटाच्या उत्तर टोकावर वराहदेवाची देऊळी होती. तिच्यापुढे सर्वज्ञ श्रीचरणचारी उभे राहिले. त्याकाळी माघ मासात मोठी यात्रा भरत असे. सर्वज्ञांनी यात्रेचे अवलोकन केले आणि बाइसांकडे पाहून म्हणाले, ‘‘बाइ : हे यात्रा जे असे तें एथौनि मोहरिजैल तरि मोहरैल, परि म्हाळसी थोटावली ठाकैल :’’ बाइसा म्हणाल्या, ‘‘थोटावैल तरि थोटावैल : मोहरविजो कां बाबा :’’ यावर सर्वज्ञांनी म्हटले, ‘‘तैसे नव्हे की बाइ : एथौनि जरी अव्यवस्था’’ असे निरूपण केले.

     या घाटाच्या समोर पूर्वेस पूर्व तटापर्यंत वाळवंट होते आणि त्या पूर्व तटावर म्हाळसेचा पश्चिमेकडील घाट होता. त्यास सहा पाटांगणे असून ५६ पायऱ्या होत्या. त्यावर म्हाळसेचा पश्चिम दारवंठा होता. अर्थात म्हाळसेचे देऊळ हे नेवासा खुर्द गावात होते हे या वर्णनावरून सिद्ध होते. म्हणून सर्वज्ञांच्या काळात आणि त्या आधिच नेवासा शहराचे दोन भाग होते असे म्हणावयास काही हरकत नाही.

कणेरेश्वर-कुसुमेश्वर

     चौबाऱ्याला आसन झाल्यानंतर सर्वज्ञ प्रथम नेवासा परिसरात कणेरेश्वराच्या देवळात आले. काही काळ येथे आसन झाल्यानंतर या देवळाच्या जवळच पूर्वेस कुसुमेश्वराचे देऊळ होते. ‘‘निवासेया पश्चिमे गंगे उत्तरे कणेरेश्वरु : तयापूर्वे जवळीचि कुसुमेश्वरु :’’ येथेही आसन झाले. ला.रा.बी.पं. या चरित्रपाठांप्रमाणे कुसुमेश्वरास वसति झाली. काही पाठांत कुसुमेश्वरासच ‘कमळेश्वर’ असे म्हटले आहे. अर्थात ‘कुसुमेश्वर’ आणि ‘कमळेश्वर’ हा एकच म्हटला तरी चालेल.

     नेवाशास सर्वज्ञ दोनदा आले. पहिल्यांदा आले तेव्हा वसती झाली. वसतीच्या स्थानाविषयी बहुधा सर्वच स्थानपोथ्या आणि चरित्रपोथ्यांत वासनाभेद आहेत. काही पाठकारांच्या मते कुसुमेश्वरास वसति झाली, तर काहींच्या मते अग्निष्टिकेस, तर काहींच्या मते महालक्ष्मीस वसती झाली.

     कुसुमेश्वराच्या देवळात आसन झाल्यावर बाइसांनी सर्वज्ञांचे श्रीचरणक्षाळण केले. आणि येथूनच सर्वज्ञांनी मंडळिकांना मढ पाहायला पाठविले.

     चरित्रपोथ्या आणि स्थानपोथ्यांमध्ये पुरादित्यात येण्याअगोदर कणेरेश्वर-कुसुमेश्वरात सर्वज्ञांना आसन झाले असा उल्लेख आहे, परंतु यास रत्नमाळा स्तोत्रकारांनी पुरादित्याच्या अवस्थानातील विहरणस्थान मानले आहे. ‘‘कदाचिदीश: करवीरदेवदेवालये दिव्यति देववर्य: । तत्पूर्वयामे कुसुमेश्वरे वा नित्यं पुरादित्यकृताधिवास:’’ (रत्नमाला उ.१०२९)

     सांप्रत हे ठिकाण पुरादित्याच्या वायव्येस असणाऱ्या घाटाच्या उत्तर बाजूस आहे.

 

स्थानपोथीतील कणेरेश्वर कुसुमेश्वराचे वर्णन-

स्था.पो. विद्यापीठ ९७०- ‘‘नीवासें कणेरेस्वराचें देउळ पुर्वामुख : मंडपाचे तीनी दारवठे : एकु दक्षीणामुख : पाइरीया ४ :।: पुर्वामुख पाइरीया ४ :।: उत्तरामुख पाइरीया ४ :।: कुसमेस्वराचे देउळ पुर्वामुख : आसन : पौळीचा दारवठा पुर्वामुख : एकु उतरामुख :’’

स्था.पो. ‘‘निवासेया पश्चिमे गंगे उत्तरे कणेरेश्वरु : तयापूर्वे जवळीचि कुसुमेश्वरु’’       

page 10.png

     ही दोन्ही देवालये एकमेकांच्या जवळच होती हे उपरोक्त स्थानपोथीतील वाक्यांवरून स्पष्ट होते. कणेरेश्वराचे देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या मंडपास दक्षिणाभिमुख, पूर्वाभिमुख, उत्तराभिमुख असे तीन दारवंठे होते. त्यास चार-चार पायऱ्या होत्या.

कणेरेश्वर कुसुमेश्वराचा तलविन्यास-

कणेरेश्वर

kanereswar_page 11.png

कुसुमेश्वर

kusumeswar_page 11.png

चतुर्मुख-घाट

     चतुर्मुखाच्या देवालयाविषयीचा उल्लेख फक्त एका गटातील स्थानपोथ्यांतच आढळतो. इतर पोथ्यांत त्यास असणाऱ्या घाटाचाच उल्लेख आहे. ‘पुरादित्या वाव्यकोनी घाट :’ मात्र तो घाट स्वतंत्र आहे, की कोण्या देवालयाच्या संबंधित आहे याचा मात्र उल्लेख ते करीत नाहीत. असो, प्रत्येक गटातील स्थानपोथीकारांची स्थानवर्णन करण्याची ती एक पद्धत आहे. मात्र या स्थानपोथीकारांनी त्या घाटाचे वर्णन सांगून तो कोण्या देवळाचा आहे हे देखील नमूद केले आहे.

     चतुर्मुख या देवालयाचे वर्णन कणेरेश्वराच्या आणि कुसुमेश्वराच्या मध्ये येते. अर्थात हा या दोन्ही देवळांच्या जवळच प्रवरेच्या काठावर होता. या देवळाचे वर्णन स्थानपोथीतल्या एका गटात पुढील प्रमाणे येते-

‘‘चतुर्मुखाचें देउळ दक्षिणाभिमुख : पाइरीया ३ : पौळीचे दारवठें तीनि : एकु उत्तरामुखु : पाइरीया ५ : एकु पूर्वामुखु : पाइरीया ६ : एकु दक्षिणामुखु : दारवठेयापुढें घाटु पेहेरेचा : पाइरीया ५० :’’ चतुर्मुखाचे देवालय हे दक्षिणाभिमुख होते. वासनाभेदाने पूर्वाभिमुख होते. देवळास तीन पायऱ्या असून त्याच्या पौळीचे तीन दारवंठे होते. उत्तराभिमुख दारवंठ्यास पाच पायऱ्या आणि पूर्वाभिमुख दारवंठ्यास सहा पायऱ्या होत्या. तिसरा दक्षिणाभिमुख दारवंठा होता, त्यास पुढे घाट असून पन्नास पायऱ्या होत्या. काही गटातील स्थानपोथ्यांत त्यांनी केलेल्या वर्णनात त्या वास्तूचे अगदी सुक्ष्म विवेचन केलेले असते. जसे वेरूळ येथील १६ क्रमांकाच्या लेण्यातील मुख्य देवालयाच्या पश्चिमेकडील मंडपावर एका बाजूने जाताना एकूण पायऱ्यांची संख्या २५ आहे. मात्र त्या दोन भागात विभाजीत केल्या आहेत. त्या दोन भागात कशा विभाजीत आहे हे कळण्यासाठी त्यांची संख्या २०।५ अशी लिहिली आहे. अर्थात पहिल्या टप्यात ५ पायऱ्या असून दुसऱ्या टप्यात २० पायऱ्या आहेत. ज्या ठिकाणी तिन टप्पे असतात तिथे ‘१०।२०।११’ अशी संख्या लिहिलेली असते.

     कणेरेश्वराच्या दक्षिणेकडील दारवंठ्यास असणाऱ्या घाटाच्या पायऱ्याविषयी देखिल २०।३० अशी संख्या लिहिलेली आहे. अर्थात या पायऱ्याही दोन टप्यात असतील असे म्हणावयास काही हरकत नाही. पहिल्या टप्यात ३० आणि दुसऱ्या टप्यात २० अशा होत्या.

घाटाचे भग्नावस्थेतील प्र.चि. 

कणेरेश्वर, कुसुमेश्वर, चतुर्मुख ही देवालये कालौघात नष्ट झाली. चतुर्मुख देवायलयाच्या जागेवर ‘‘नाथबाबा’’ हे देऊळ बांधले आहे.

चतुर्मुख देवळाच्या जागेवर नव्याने बांधलेले नाथबाबा मंदिर

नव्याने बांधलेल्या देवळाच्या पश्चिमेस असलेले चतुर्मुख देवळाचे अवशेष

चतुर्मुख मदळसा 

चतुर्मुख देवळाची मानचित्रे

कणेरेश्वराची मानचित्रे

कुसुमेश्वराची मानचित्रे

नाथबाबा मंदिराच्या वायव्येस एक जिर्णोद्धारीत देऊळ आहे. त्यास ‘निर्झणेश्वर’ असे नाव आहे. स्थानपोथीतील वर्णनानुसार या ठिकाणी कुसुमेश्वर असावा.

     कुमारेश्वर-कुसुमेश्वरानंतर या देवळांच्या पश्चिमेकडील असणाऱ्या घाटावर आसन झाले, असा उल्लेख स्थानपोथ्यांत येतो. परंतु सर्वज्ञ प्रथम आले तेव्हा या घाटावर आसन झाले की, पुरादित्याच्या अवस्थानातील हे विहरणस्थान आहे असा उल्लेख कुठे आढळत नाही. ‘‘पुरादैत्या वाव्यकोनी घाट : ते घाटीं आसन :’’ चतुर्मुखानंतर एका गटातील स्थानपोथ्यांत ‘अनकेश्वराचे देउळ पूर्वाभिमुख : आसन :’ असा उल्लेख येतो. हे देउळही या देवळांच्या समुहात असावे. तिथेही सर्वज्ञांना आसन झाले होते. परंतु त्याची निश्चिती करणे कठीण आहे.

अग्निष्टिका-लिंगाची देउळी

     जवळ-जवळ सर्वच स्थानपोथीकार कणेरेश्वरापासून ते घाटापर्यंतचे वर्णन ‘कणेरेश्वर-कुसुमेश्वर’ या देवालयांना साचन मानून१ करतात. त्यापुढील वास्तूंचे वर्णन स्थानपोथीकारांनी ‘पुरादित्य’ या स्थळाला साचन मानून केले आहे.

काही स्थानपोथ्या वगळून बऱ्याच स्थानपोथ्यांत अग्निष्टिकेचे वर्णन पुढीलप्रमाणे येते-

१. ‘‘कणेरेस्वरापूर्वे गावा पसीमे थडीयेसी अग्नीष्टीके आसन : तथा वसती :’’

२. ‘‘अज्ञष्टीका लींगाची देउळी आसन :’’

३. ‘‘अग्नीष्टीका नदीचीए थडीए उत्तरे :’’

     नेवाशास सर्वज्ञ प्रथम आले तेव्हा येथे आसन झाले असावे, की पुरादित्याच्या अवस्थानातील हे विहरणस्थान असावे हे सांगणे कठीण आहे. अग्निष्टिकेत आसन झाले आणि या अग्निष्टिके जवळच लिंगाची देउळी होती. तिथेही सर्वज्ञांना आसन झाले होते.

     अग्निष्टिका स्थळनिश्चितीचे स्थानपोथीतीतील वर्णन वाचताना गोंधळ होण्याची शक्यता आहे. ‘‘पुरादित्या वाव्यकोनी घाट : त्यासि वायव्यकोनी पेहेरेचिये थडीयेसी अग्नीष्टीका पूर्वाभिमुख : तेथ आसन :’’ स्थानपोथीतल्या या ओळींचे सरळ सरळ वाचन केल्यास त्याचा अर्थ असा होईल, ‘पुरादित्याच्या वायव्यकडे घाट आहे. आणि त्याच्या वायव्यकडे पेहेरेच्या थडीस अग्निष्टिका पूर्वाभिमुख आहे. तिथे सर्वज्ञांना आसन झाले.’ परंतु असे वाचन केल्यास ते पूर्णपणे चुकीचे ठरेल! कारण येथील परिस्थितीचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की, पुरादित्याच्या वायव्यकडे जर घाट आहे तर त्याच्याही वायव्यकडे नदी आहे. त्या नदीच्या पात्रात हे ठिकाण येईल. असा गोंधळ होऊ नये म्हणून या ओळींचे वाचन कसे असावे याविषयीचे स्पष्टीकरण महत्वपूर्ण ठरते.

     कोण्याही गटातील स्थानपोथीकार कोण्या एखाद्या स्थळाचे वर्णन करताना तेथील एखाद्या वास्तूला साचन मानून करतात. ‘पुरादित्य’ परिसरातील स्थानांचे वर्णन करताना ‘पुरादित्य’ या स्थळाला साचन मानून करत आहेत. अग्निष्टिका स्थळाचे वर्णन पुरादित्य या ठिकाणाहून करत आहेत म्हणून त्याचे वाचन असे करता येईल- ‘पुरादित्याच्या वायव्य कोनात घाट आहे. आणि ‘त्यासि’ म्हणजे पुरादित्याच्याच वायव्यकडे अग्निष्टिका आहे. तिथे सर्वज्ञांना आसन झाले.’

     या स्थळाची निश्चिती स्थानपोथीच्या दुसऱ्या गटातील वाक्यानेही सहज होते. ‘‘कणेरेश्वरापूर्वे, गावा पसीमे, थडीयेसी अग्निष्टीके आसन.’’ हे पाठकार मात्र कणेरेश्वरापासून अग्निष्टिकेचे वर्णन करीत आहेत. अर्थात अग्निष्टिका ही कणेरेश्वरा आणि घाटानंतर आहे हे निश्चित.

     मग या स्थानपोथीकारांनी घाटाच्या आग्नेयेस अग्निष्टिका आहे, असं का म्हटलं नसावं! असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु घाट असणाऱ्या जागा या परिसरात अजूनही आहेत म्हणून त्यांनी कणेरेश्वराच्या पूर्वेस आणि गावाच्या पश्चिम थडीस अग्निष्टिका आहे असे वर्णन केले आहे. ‘‘कणेरेश्वरापूर्वे गावापसीमे थडीयेसी अग्निष्टीके आसन :’’ हे वर्णन साक्षेपी दृष्टीने पाहिल्यावर अग्निष्टिका ही कणेरेश्वराच्या पूर्वेस नाही तर आग्नेयेस आहे असे दिसून येते.

     स्थानपोथीकार एखाद्या स्थळाचे वर्णन करीत असताना त्यांनी सांगितलेली पूर्व दिशा ही मोघम असते. ती किंचित आग्नेय अथवा पूर्णपणे आग्नेय, तसेच किंचित ईशान्य वा पूर्णपणे ईशान्यही असू शकते. अर्थात त्यांनी म्हटलेल्या पूर्व दिशेत ‘आग्नेय’ अथवा ‘ईशान्य’ या उपदिशाही अंतर्भूत असू शकतात. म्हणून काही पाठकार एखाद्या वास्तूचे उपदिशांचा उपयोग करुन तंतोतंत वर्णन करतात. तर काही पाठकार मोघम वर्णन करतात. जसे- ‘‘गावापसीमे महालक्ष्मीचे देउळ :’’ मात्र दुसरे पाठकार याच देवळाचे वर्णन करताना ‘गावा वायव्ये महालक्ष्मीचे देउळ :’ त्यामुळे ज्या पाठकारांनी ‘पश्चिमे’ असं म्हटलं आहे, त्यांना वायव्य मान्य नाही असं नाही. त्यांनी मोघम वर्णन केलं आहे. अर्थात त्या पाठकारांची वर्णनशैलीच तशी आहे. वांचून त्यांनी पूर्वेस म्हटले म्हणजे त्या दिशेचाच आग्रह नसावा.

दुसऱ्या एका पाठात ‘‘अग्नीष्टीका नदीचीए थडीए उत्तरे :’’ असा उल्लेख आढळतो. अर्थात अग्निष्टिका नदीच्या थडीवर असून उत्तरेस आहे असे त्यांना म्हणावयाचे आहे. परंतु कोणाच्या उत्तरेस आहे याचा उल्लेख मात्र ते करीत नाहीत. कारण या पाठकारांच्या स्थानपोथीतील वाक्ये ‘‘कणेरीश्वरी आसन : कुसुमेश्वरी आसन : पुरादित्याचा मढ : पटीसाळ :’’ एणेन्याये संक्षिप्त आहेत. परंतु त्यांच्या वाक्याचा इतर वाक्यावरून संदर्भ करता येणे शक्य आहे. ‘‘अग्नीष्टीका नदीचीए थडीए उत्तरे : पुरादैती अवस्थान :’’ म्हणजे अग्निष्टीका नदीच्या थडीवर असून उत्तरेस आहे. यानंतर लगेच पुरादित्याचे वर्णन येते. अर्थात पुरादित्याच्या उत्तरेस नदीच्या थडीवर अग्निष्टिका आहे असे त्यांना म्हणावयाचे आहे.

     या स्थळाची मूळ स्थिती बऱ्याच प्रमाणात भंगलेली असली तरी सद्य:स्थितीत यातील फारच थोडे अवशेष लींग आणि काही प्रतिमा भग्नावस्थेत दृष्टोत्पत्तीस येतात. या जागेस पूर्वेकडून काही पायऱ्या असून मध्येच एक चौथरा आहे. त्यात एक जुनेच लिंग आणि दक्षिणेकडे गणपतीची प्रतीमा आहे. समोर एक नंदी आहे. चौथऱ्याच्या खाली खोलगट भागात अजूनही एक चौथरा आहे. त्यात पूर्वेकडील भागात एक पाषाण बाहेर निघालेला असून त्यास मध्यस्थानी एक मूर्ती कोरलेली आहे. या चौथऱ्यानंतरही काही पायऱ्या आहेत. अग्निष्टिकेचा स्वतंत्र लहान घाट असून तो प्रवरेत उतरतो.

सद्य:स्थितीतील अग्निष्टिका परिसराचे प्र.चि.

अग्निष्टीका-लिंगाच्या देवळाची मानचित्रे

पुरादित्य परिसर-स्थाननिर्देश

     अग्निष्टिकेनंतर पुरादित्याचे वर्णन स्थानपोथ्यांत पुढीलप्रमाणे येते. ‘‘गावाचा पसीम वीभागी पेहेरेचे पुर्वीले थडीये पुरादैत्यु :’’ अर्थात पुरादित्य हा गावाच्या पश्चिम विभागात असून पेहेरेच्या पूर्विल थडीवर होता.

या ठिकाणी पुरादित्याची जागा निश्चित करण्याकरिता पेहेरेचा पूर्व काठ असलेली जागा कोणती? याविषयी निरीक्षण करणे आवश्यक आहे. पूर्व काठाची जागा समजण्यासाठी खाली दिलेला नकाशा उपयुक्त ठरेल.

     उपरोक्त छायाचित्रात स्थानपोथीतील वाक्याप्रमाणे पुरादित्य हा गावाच्या पश्चिमेस व प्रवरेच्या पूर्व काठावर होता.

     नेवासा बुद्रुक गावात पश्चिमेकडील प्रवरेचा पूर्व काठ असणाऱ्या भागाची लांबी एकूण १०० मी. इतकी आहे. त्यातही दोन भाग पडतात. पहिला भाग हा ६० मी. तर दुसऱ्या भागाची लांबी ४० मी. इतकी आहे. हे दोन्ही विभाजीत क्षेत्र कसे आहेत ते आपल्याला पुढील छायाचित्रावरून लक्षात येईल. 

     पहिल्या ६०मी. अंतराच्या भागात उत्तरेच्या आरंभी एक वाडा आहे. त्यानंतर पडलेला वाडा आणि त्याच्याही दक्षिणेस दोन घरे. अशी एकूण रचना या भागात आहे. या ६०मी. जागेत पुरादित्य जागेचा अचूक स्थलनिर्देश मिळतो. सद्य:स्थितीत याठिकाणी फारच थोडे अवशेष भग्नावस्थेत दृष्टोत्पत्तीस येतात.

 

पुरादित्याचा अचूक स्थलनिर्देश स्थानपोथीतील पुढील वाक्यांनी होतो.

१. ‘‘गावाचा पसीम वीभागी पेहेरेचे पुर्वीले थडीये पुरादैत्यु :’’

२. ‘‘पुरादित्या वाव्यकोनी घाट :’’

३. ‘‘जगतीबाहिरी पश्चिमे पश्चिमाभिमुख आसन : तेथ भटोबासाकरवी होडे गुंडे टाकवणें :’’

४. ‘‘तथा उत्तरेच्या दारवठेया पूर्वे वोता आश्राइत परिश्रय :’’

५. ‘‘परीश्रयस्थान नदी दक्षिणीली आडवांगी :’’

 

स्थानपोथीतील उपरनिर्दिष्ट स्थलनिर्देशाचे विषदीकरण

वरील स्थानपोथीतीतील वाक्यांचा क्रमानेच आपण विचार करणार आहोत-

१. पुरादित्याची जागा निश्चित करण्याकरिता पहिल्या पुराव्याचा आपण विचार करू. ‘‘गावाचा पसीम वीभागी पेहेरेचे पुर्वीले थडीये पुरादैत्यु :’’ अर्थात पुरादित्य हा गावाच्या पूर्णपणे पश्चिम भागात असून पेहेरेच्या पूर्व थडीवर (काठावर) आहे. पूर्णपणे म्हणण्याचा उद्देश असा की, नेवासा बुद्रुक गावास प्रवरेच्या एकूण तीन थडी आहेत. ‘‘पुर्वीले थडीये पुरादैत्यु :’’ ‘‘पेहेरे उत्तरे कणेरेस्वरी आसन :’’ ‘‘पेहेरेचे पसीमीली घाटी पाइरीया ७ :’’ अशा पूर्व-उत्तर-पश्चिम तीन थडी आहेत, परंतु त्यातील एक पूर्णपणे उत्तरेस नसून ती किंचित ईशान्येस आहे.

२. ‘पुरादित्या वाव्यकोनी घाट :’ अर्थात विपर्यायाने घाटाच्या आग्नेयेस पुरादित्य आहे. सांप्रत हा घाट या स्थळाच्या वायव्येस आहे.

३. ‘जगतीबाहिरी पश्चिमे पश्चिमाभिमुख आसन : तेथ भटोबासाकरवी होडे गुंडे टाकवणें :’ स्थानपोथीतील या वाक्यावरून असे लक्षात येते की, पुरादित्य हे स्थळ प्रवरेच्या अगदी काठाला लागून असेल तरच या लीळेचा वा स्थानपोथीतील वाक्याचा संदर्भ जुळू शकतो. ‘जगतीबाहिरी पश्चिमे पश्चिमाभिमुख आसन :’ झाले असा एका स्थानपोथीकारांनी निर्देश केला आहे, परंतु किती अंतरावर आसन झाले असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु या वाक्याचे उत्तर चिरडे गटातील एका स्थानपोथीत मिळते. ‘‘पुरादित्यामागे होड पौळीसी :’’ अर्थात पौळीला लागून जवळच भटोबासाकरवी होडे गुंडे टाकवणे ही लीळा घडली असे म्हणता येईल. स्थानपोथीतील दिशानिर्देश आणि या स्थळाच्या परिस्थितीचे साक्षेपी अवलोकन केले असता मागे सांगितलेल्या ६०मी. जागेतच पुरादित्य जागेची निश्चिती होते.

४. ‘तथा उत्तरेच्या दारवठेया पूर्वे वोता आश्राइत परिश्रय :’ पुरादित्याच्या उत्तर दारवठ्याच्या पूर्वेस ओत होता. आणि त्यास लागून परिश्रयस्थान होते. सद्य:स्थितीत या स्थलाच्या उत्तरेस वाड्यास लागून एक ओत आहे. तो अग्निष्टिकेजवळून प्रवरेत उतरतो.

५. स्थानपोथीत परिश्रय स्थानाचा निर्देश दोन ठिकाणी येतो. ‘‘दक्षिणेचे पौळीसीं खीडकीं : ते खीडकीये पश्चिमे बडवेयाची कडबेयाची वळ्हे : तेथ मार्तंडाची चोरी : तीकडेचि परिश्रये :’’ हा एक आणि दुसरा ‘‘तथा उत्तरेच्या दारवठेया पूर्वे वोता आश्राइत परिश्रये :’’ पैकी दक्षिणेकडील परिश्रयस्थानाविषयीचा निर्देश दुसऱ्या गटातील स्थानपोथीकारांच्या वाक्याने अधिक स्पष्ट होतो. ‘‘परीश्रयस्थान नदी दक्षिणीली आडवांगी :’’ परंतु हे वाक्य लक्षात घ्यावयाचे असल्यास नदीच्या परिसराचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

घळ पडलेल्या परिसराचे छायाचित्र

page 29_edited.jpg

     गावाच्या पश्चिमेकडे १००मी. लांबी असणाऱ्या पूर्व काठाच्या पहिल्या ६०मी. अंतरातील भागात दक्षिणेकडे नदीला जलप्रवाहाच्या दाबामुळे एक त्रिकोणीय अंदाजे चार हजार चौ.मी. मापाची घळ पडली आहे. त्याचे वायव्य-नैऋत्य असे सरळ अंतर २५मी. आहे. हा घळ पडलेला भाग पूर्वेकडे शिरला असल्याने नैसर्गिकच वायव्य-नैऋत्य २५मी. असा दक्षिणकाठ निर्माण झाला. आणि त्या भागासच स्थानपोथीकारांनी परिश्रयस्थानाचा निर्देश करताना ‘नदी दक्षिणीली आडवांगी’ असा केला आहे. म्हणजेच परिश्रयस्थान हे नदीच्या दक्षिण काठाच्या आडबाजूस होते असा अर्थ या वाक्याचा होतो.

     उपरनिर्दिष्ट स्पष्टीकरणाचा थोडक्यात सारांश असा- पुरादित्य हा गावाच्या पश्चिमेकडे १००मी. लांबी असणाऱ्या पूर्वकाठाच्या पहिल्या ६०मी. अंतरातील भागात आहे. या ६०मी. अंतराचा उत्तरेकडील आरंभ ‘उत्तरेच्या दारवठेया पूर्वे वोता आश्राइत परिश्रय :’ हा होय. आणि दक्षिणेकडील शेवट ‘‘परीश्रयस्थान नदी दक्षिणीली आडवांगी :’’ या एका गटातील स्थानपोथीतील वाक्यावरून होतो. या ६०मी. जागेत पुरादित्य, बडव्याचे घर या जागांचा निर्देश आपण पुढील स्पष्टीकरणात पाहणार आहोत.-

पुरादित्य-बडव्याचा आवार

     उपरनिर्दिष्ट स्पष्टीकरणात आपण पुरादित्य परिसराचा स्थलनिर्देश पाहिला. आता आपण पुरादित्य आणि बडव्याचा आवार या स्थळाचा निर्देश पाहणार आहोत. पुरादित्य असणाऱ्या ६०.मी. या जागेतील आपण उत्तरेचा आणि दक्षिणेचा शेवट पाहिला. याच भागात सर्वज्ञ काळात येथील वास्तूंची स्थिती कशी होती याचा आढावा आपण स्थानपोथी आणि चरित्रातील वर्णनावरून घेणार आहोत.

 तस्मिन्प्रयाते स्वयमादिनाथे स्थित्वा मुहूर्त सह किंकरैः स्वैः प्रक्षाळित तेन मठं जगाम देवः पुरादित्यसुरालयं स ॥१०१०॥

नाथोबांना कमळेश्वराहून मढ पाहण्यास पाठविल्यावर त्यांनी मढ स्वच्छ केला आणि सर्वज्ञ मुहूर्तभराने भक्तजनांसहित पुरादित्याच्या मठात गेले.

     पुरादित्याचा मढ हा अग्निष्टिकेच्या आग्नेयेस होता. ‘‘पुरादित्या वाव्यकोनी घाट : त्यासी वाव्यकोनी अग्निष्टीका :‘‘ त्यासी म्हणजे पुरादित्याच्या वायव्यकोनी अग्निष्टिका होती. याविषयीचे स्पष्टीकरण पूर्वीच केले आहे. आणि दुसऱ्या स्थानपोथीतील ‘‘अग्निष्टिका नदीचिए थडिए उत्तरे :’’ या वाक्यानेही अधिक स्पष्ट होते की, अग्निष्टिका ही पुरादित्याच्या उत्तरेस म्हणजेच वायव्येस होती.

     अग्निष्टिकेच्या आग्नेयेस किती अंतरावर पुरादित्य होता तसा अंतराचा निर्देश स्थानपोथ्यांमध्ये कुठे आढळत नसला तरी येथील उपलब्ध मठाच्या अवशेषांवरून त्या जागेची निश्चिती करता येते. सांप्रत पुरादित्य असणाऱ्या जागेच्या उत्तरेस साधारणत: ५७३ चौ.मी. असलेला एक वाडा आहे. त्याच्या दक्षिणेस म्हणजेच पुरादित्य असणारी जागा ४१८ चौ.मी. आहे. या जागेतही एक वाडा होता तो पडला. त्याच जागेवर त्यांच्या पिढीतील वारसांपैकी एकाने लहानसे घर बांधले आहे. या जागेच्या दक्षिणेस सर्वज्ञ काळात बडव्याचा आवार होता. ही जागा २,१९३.२२ चौ.मी. आहे. त्या जागेवरही सांप्रत एक घर आहे.

     पुरादित्याचा मढ हा पूर्वाभिमुख होता. ‘‘पूर्वाभिमूख आदित्याचा मढू :’’ काही स्थानपोथ्यांमध्ये ‘‘पुरादित्याचे देउळ’’ असाही उल्लेख येतो. त्यामुळे तो मढ होता का देऊळ होते अशी शंका निर्माण होते. चरित्रपोथ्यांत मात्र तो मढ होता असाच उल्लेख आहे. स्थानपोथीकार मढ असणाऱ्या वास्तूस मढ असेही संबोधतात आणि देऊळ असेही संबोधतात. हे पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल.

१. ‘‘वेसीआंत रीगता सैंग उत्तर-दक्षिण गोदरी : ते गोदरीयेपूर्वे जोल्हानारायणाचा मढ पश्चिमाभिमुख :’’ परंतु यासच चिरडे गटातील स्थानपोकारांनी ‘‘जोल्हानारायणाचे देउळ’’ म्हटले आहे.

२. ‘‘टोकगव्हाणी लक्ष्मीनारायणाचे देउळ : तथा मढु उत्तरामुख :’’

३. ‘‘जगतीआंत भोगरामा उत्तरे जवळीचि भैरवाची देउळी : एक म्हणति मढ पूर्वामुख :’’

४. ‘‘जगतीआंतु रामनाथा अज्ञे (एक म्हणति. रामनाथा दक्षिणे) नरसिंहमढु पूर्वामुख’’ या मढास दुसऱ्या गटातील पाठकारांनी ‘‘पूर्वामुख नरसिंहाचे देउळ’’ असे म्हटले आहे.

५. नृसिंहमढा उत्तरे पांडा २० जखीणीचे धाबे उत्तरामुख :’’ या धाब्यास दुसऱ्या गटातील पाठकारांनी ‘‘जखीणीचे देउळ’’ असे म्हटले आहे.

६. ‘‘रामसीतेचेया मढा पश्चिमे लक्ष्मीनारायणाचा मढु :’’ दुसऱ्या गटातील पाठकारांनी ‘‘रामसीतेचेया देउळा पश्चिमे लक्ष्मीनारायणाचा मढु :’’ रामसीतेच्या मढास देऊळ असे म्हटले आहे.

    उपरनिर्दिष्ट उदाहरणांवरून असे लक्षात येते की, मढाच्या रचनेस मढ म्हणता येईल आणि देऊळही म्हणता येईल. मढ मुख्यत्वे अध्ययनासाठी असून त्यात प्रतिमा देखील असतात. मढ असो वा मंदिर, त्यास प्रधानत्वे व्यपदेश१ न्यायाने ती नामना होते.

मठांचे प्रकार

     मठांच्या प्रकाराविषयी ढोबळ मानाने पुढील प्रकार होतील,- मठ, प्रतिमठ, मढ, मढी, मढौली.

उपरोक्त मठांचे प्रकार आणि उपप्रकार आहेत.संन्याशांच्या राहत्या स्थळाला मठ संबोधले जात असावे. ‘‘पराजित मठ प्रतिष्ठा करणे’’ मढ हा अध्ययनासाठी असावा. ‘‘गोसावी शास्त्रमढु पातले...गोसावी तयांतें पुसिलें : हे काइ वाचिजत असिजे?’’ मठातील मठ तो प्रतिमठ. ‘‘प्रतीमठु म्हणिजे मठांतु मठ :’’ मढापेक्षा लहान असणारी मढी. ‘‘तेथ ते मढी करौनि राहिले असति :’’उपरोक्त प्रकारांपैकी पुरादित्य हा मढ प्रकारातील आहे.

सद्य:स्थितीत पुरादित्य असणाऱ्या जागेचे प्र.चि.

पुरादित्याच्या जगतीमधील स्थाने

१. स्थानपोथीच्या एका गटातील स्थानवर्णनात पुरादित्याच्या जगतीत पुरादित्य, एकवीरा, सूर्यकांत या तीन देवळांचा निर्देश आहे. ही तिन्ही देवालये क्रमानेच पूर्वाभिमुख, उत्तराभिमुख, पश्चिमाभिमुख असून या तिन्ही देवळांचे आंगण एकच आहे. अशा प्रकारची रचना या देवळांची आहे. पुरादित्याच्या देवळास पुढे पटीशाळा आहे.

२. इतर गटातील स्थानपोथ्यांपेक्षा चिरडे गटातील स्थानपोथीत पुरादित्याचे वर्णन विस्तृत येते. पुरादित्याचे देउळ पूर्वाभिमुख असून त्यास चौक आहे. त्याच्या चौकात सर्वज्ञांना आसन झाले. मध्ये दक्षिणेच्या भिंतीस पूर्व-पश्चिम ओटा उत्तराभिमुख होता. देवळाच्या पुढे उत्तर-दक्षिण पटीशाळा असून त्यापुढे ‘चातुर्दक्ष’ (चारही बाजूंनी) आंगण आहे. त्या पटीशाळेस जोते असून चार पायऱ्या होत्या. पुरादित्यास उंबरा कवाडे असून त्याच्या जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख होता. एका वासनेप्रमाणे उत्तराभिमुख होता. दारवंठ्यास पायऱ्याही होत्या. पुरादित्याच्या जगतीमध्ये आग्नेयेस नारायणाचा मढ उत्तराभिमुख होता. त्यासही पुढे पूर्व-पश्चिम उत्तराभिमुख अशी पटीशाळा होती. त्या मढाच्या चौकातही आसन झाले. या मढात भक्तिजनांचे बिढार होते. या नारायणमढाचा अचूक निर्देश करावयाचा असेल तर तो जगतीत पुरादित्याच्या आग्नेयेस आणि तिन्ही देवळे मिळून असलेल्या आंगणाच्या दक्षिणेस होता. ‘‘आंगणा दक्षिणे उत्तरामुख नारायणाचा मढ :’’

     या व्यतिरिक्त इतर गटातील स्थानपोथ्यांत फार संक्षिप्त वर्णन येते. या दोन्ही गटातील स्थानपोथ्यांच्या वर्णनानुसार पुरादित्याच्या जगतीतील स्थानांचे मानचित्र-

जगतीतील स्थानांचे मानचित्र-

पुरादित्याची मानचित्रे

पुरादित्याच्या जगतीबाहेरील स्थाने

     हातगुंडा- जगतीच्या पश्चिमेकडील भिंतीस लागून ‘‘तिरी हातगुंडा होडे भटां पराजयो करणें’’ हे स्थान होते. त्याच्या जागेची निश्चिती स्थानपोथीतील पुढील वाक्यावरून होते.  ‘‘पुरादित्या मागे होड पौळीसी : पश्चिमाभिमुख आसन :’’ अर्थात हे स्थान पौळीला लागूनच होते असे म्हणता येईल.

दक्षिण खिडकी, वळ्हे-

     ‘‘दक्षिणेचे पौळीसीं खीडकीं : ते खीडकीये पश्चिमे बडवेयाची कडबेयाची वळ्हे : तेथ मार्तंडा चोरी : तीकडेचि प्रश्रये :’’ स्थानपोथीतील या वाक्यावरून पुरादित्याच्या दक्षिण पौळीला (दक्षिणेकडील भिंतीला) खिडकी होती आणि तिच्या पश्चिमेकडे बडव्याची कडब्याची वळ्हे (गंजी) होती असे स्पष्ट होते. अर्थात या निर्देशावरून दक्षिण पौळीला खिडकी असणारी जागा पौळीच्या मध्यभागात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसऱ्या गटातील स्थानपोथीत ‘‘नैऋत्यकोनी वळ्हे :’’ म्हटले आहे. त्यामुळे वळ्हेचा स्थलनिर्देश अधिक स्पष्ट होतो.

परिश्रयस्थान- पुरादित्यातील अवस्थानकाळात परिश्रय स्थानाचा उल्लेख दोन ठिकाणी येतो.

१. ‘‘खिडकीये पश्चिमे कडबेयाची वळ्हे : तेथ मार्तंडा चोरी : तिकडेची प्रश्रये :’’ दुसऱ्या गटातील स्थानपोथीत- ‘‘परिश्रयस्थान नदी दक्षीणीली आडवांगी :’’

२. ‘‘तथा उत्तरेच्या दारवठेया पूर्वे वोता आश्राइत परिश्रये :’’

अर्थात परियस्थान हे कडब्याच्या वळ्हेकडे (गंजीकडे) आहे असे चिरडे गटातील स्थानपोथीकारांना म्हणावयाचे आहे. परंतु त्याचा अचूक निर्देश दुसऱ्या गटातील स्थानपोथीकारांच्या पुढील वाक्यावरून होतो. ‘‘परिश्रयस्थान नदी दक्षीणीली आडवांगी :’’ अर्थात पुरादित्याच्या दक्षिणेस प्रवरेस घळ पडलेल्या जागेस दक्षिण काठ नैसर्गिकच निर्माण झाला आहे. त्याच्या आडबाजूस म्हणजेच वळ्हेच्या दक्षिणबाजूस परिश्रयस्थान होते असे म्हणावयास काही हरकत नाही.

 

बडव्याचे घर-

१. ‘‘दक्षिणे बडवेयाचे घर :’’

२. ‘‘मढा दक्षिणे पौळीबाहिरि बडवेयाचें घर : तेथ आसन :’’

३. ‘‘दक्षिणे भोपेयाचे घर : माळवद पुर्वामुख :’’

     पुरादित्याच्या दक्षिणेस बडव्याचे घर होते. त्याचे माळवध पूर्वाभिमुख होते. तिथे सर्वज्ञांना आसन झाले होते. ‘‘पौळीबाहिरी’’ या निर्देशावरून ते पौळीच्या बाहेर जवळच होते असे म्हणता येईल.

या स्थळाचा अचूक निर्देश असाही करता येईल की, स्थानपोथीतील नारायणमढाच्या वर्णनानंतर ‘मढादक्षिणे’ असा निर्देश येतो. अर्थात नारायणमढाच्या दक्षिणेस पौळीच्या बाहेर बडव्याचा आवार होता हे निश्चित.

वळ्हे परिश्रयस्थान आणि बडव्याचा आवार या स्थळाच्या निर्देशाचे पुढील छायाचित्रावरून सहज आकलन होऊ शकते.

पुरादित्याच्या उत्तरेकडील स्थानांचा निर्देश

पाणीबाऱ्याचा दारवठा

पुरादित्याच्या उत्तरेकडील जगतीस दारवंठा होता त्याचा निर्देश स्थानपोथ्यांत पुढीलप्रमाणे येतो-

१. ‘‘जगतीचा दारवठा पुर्वाभिमुख : एकी वासना उत्तराभिमुख :......तथा उत्तरेच्या दारवठेयापूर्वे वोता आश्राइत परिश्रय :’’

२. ‘‘पौळीचा दारवठा पुर्वाभिमुख : पाइरीया १० : उत्तरे पाणीबारे खीडकी होती :’’

     उत्तर दारवंठ्यास एका स्थानपोथीत ‘उत्तर दारवठा’ म्हटले आहे, तर एका स्थानपोथीत ‘पाणीबारे खीडकी’ म्हटले आहे. क्वचित एखाद्या ठिकाणी दारवठ्यास काही पाठकार खिडकी म्हणतात, तर दुसरे पाठकार त्यास ‘दारवंठा’ या नावाने संबोधतात. ‘पश्चिमेचे जगतीसी दुसरी खिडकी उत्तरामुख’ दुसऱ्या पाठकारांनी मात्र यास जगतीचा दारवठा म्हणून संबोधले आहे. ‘जगतीचा दारवंठा उत्तराभिमूख’ अर्थात ‘खिडकी’स दारवठा म्हणता येऊ शकतो, कारण तोही काही फरकाने दारवठाच आहे. ‘‘उत्तरे पाणीबारे खीडकी होती :’’ म्हणजे पाणीबारे आणि खिडकी हे दोन्ही होते असा अर्थ या वाक्याचा नाही. ‘पाणीबारे’ हा षष्ठ्यंत प्रयोग आहे. त्याचा अर्थ ‘पाणीबाऱ्याची खिडकी’ असा होतो. इतरत्रही असे प्रयोग आढळतात, ‘‘मढा उत्तरे उत्तराभिमुख दारवठा तो पाणीबारेयाचा :’’ म्हणजे दारवठ्यास ‘पाणीबारे’ हे विशेषण लावून ‘पाणीबारेयाचा दारवठा’ असा प्रयोग केला आहे.

     पाणीबाऱ्याचा दारवंठा हा नदीच्या पात्रात उतरण्यासाठी वा नदीकडून त्या वास्तूमध्ये प्रवेशण्यासाठी असावा म्हणून त्यास पाणीबारे म्हणत असावेत. ‘‘गावापूर्वे नदी : पाणीबारेनि गोसावी बाहिरी बीजें केलें :’’ या वाक्यातील नदीच्या काठावर असणारे ‘पाणीबारे’ हे गावात प्रवेशण्यास वा बाहेर जाण्यासाठी होते असे म्हणता येईल.

‘‘संगमेश्वरा अज्ञे पाणीबारे : तिकुनची रिगनीग :’’

‘अग्निष्टीकेपुढें पौळीसी पाणीबारेयाचा दारवठा पश्चिमे :’
      हे ‘पाणीबारे’ नदीच्या पात्रालगत असणाऱ्या वास्तूस आहे. त्या वास्तूतून नदीकडे जाता येते आणि नदीकडून त्यात प्रवेश करता येतो. सद्य:स्थितीत पुरादित्य असणाऱ्या जागेत पौळीचा काही भाग आणि पाणिबाऱ्याचा दारवठा असणारी जागा दृष्टोत्पत्तीस येते. काही अवशेष पश्चिमेकडून नदीच्या बाजूने पात्रात वाहून गेले. काहींचा ग्रामस्थांनी घरास उपयोग केल्याचा दिसून येतो.

     पुरादित्याच्या उत्तरपौळीस असणारे पाणिबारे वा उत्तर दारवठ्याचे स्पष्टीकरण पाहिले. आता आपण त्यापुढे असणाऱ्या स्थानांचा निर्देश पाहणार आहोत-

परिश्रयस्थान

     स्थानपोथीत, ‘‘तथा उत्तरेचेया दारवठेया पूर्वे वोता आश्राइत परिश्रय :’’ मागे पुरादित्याच्या नैऋत्येकडील परिश्रयस्थान सांगितले. आता हे दुसरे परिश्रयस्थान सांगत आहेत. हे परिश्रयस्थान उत्तरेच्या दारवंठ्याच्या पूर्वेस वोतास लागून होते. सांप्रतही या जागेवर वोत आहे. तो अग्निष्टिकेजवळून प्रवरेत उतरतो.

पुरादित्याच्या पूर्वेकडील स्थानांचा निर्देश

संतोषाचा सातरा

संतोषाचा सातरा

     ‘पासवडी अविधी परीहार’ (स्मपा.पू.२२८) प्रसंगी संतोषाला सातरा पसरायला लावला. या स्थळाविषयी मात्र चरित्रपोथ्यांत मतभिन्नता आढळते. मु.वा. इत्यादि चरित्रपाठांत ही लीळा वेरूळ येथील माणिकेश्वराजवळील आहे, तर पं.ह.लां. इत्यादि चरित्रपोथ्यांत नेवासा येथील आहे. शिवबासांच्या पिढीपाठात ‘‘....एकु दीसु आपणचि गोसावियाते म्हणितले : ‘‘जी जी : माझी पासवडी बाइसासि दिधली : ते माझी मजचि देतु का :’’ सर्वज्ञे म्हणितले : ‘‘हो का : बाइ ते पासवडी आणा :’’ मग बाइसी पासवडी आणिली : तयासि दिधली : तेणे जाला अविधी : एकी वासना एळापुरीचि (एकी वासना नेवासा) सातरी पसरविली :’’

हिराइ गटातील पोथ्यांत मात्र या लीळेचा नेवाशातच समावेश आहे. शिवबासांना त्या लीळेविषयी मतभेद आढळल्यामुळे तसा उल्लेख त्यांनी केला असावा. शोधकारांनी ही लीळा एळापूरलाच आहे असा स्पष्ट निर्देश त्यांच्या पाठात केला आहे. त्यास कारण असे की, त्यांना कोण्या एका पोथीत ‘माणकेश्वर’ शब्द मिळाल्यामुळे ती लीळा एळापूरचीच असावी असा कयास केला असावा.

माणकेश्वरासमोर सातरा पसरवणे असा निर्देश ‘वा.’ पाठात आढळतो.

     ‘‘एक वेळ गोसावियांसी उदेयाचा पुजावसरु जालेयानंतरे माणिकेश्वरासि बीजे केले : तेथ यात्रा भरली होती : गोसावियांसी माणिकेश्वरी चौकी नावेक आसन जाले : संतोष गोसावियांपासी राहिले होते : ते आपरीतोख भावीती : जे माझे गोसावियांचा ठाइ काही प्रवेसू नव्हेचि : तयाचा मनोर्थ जाणौनि सर्वज्ञे म्हणितले : ‘‘संतोषा तुम्ही एथ सातरा घाला...’’

परंतु माणिकेश्वरासमोर संतोषांना क्रियेच्या अपरितोषामुळे सातरा पसरायला लावला असे त्या लीळेतील मजकूरावरून वाटते. अविधी परिहाराकारणे त्यांना सातरा पसरायला लावला असे कुठे आढळत नाही. दुसरे असे की, एळापूरला संतोषांनी पासवडी ओळगविल्यानंतर त्यांनी नेवाशाला जर बाईसांकडून परत मागितली तर यात खूप दीर्घ कालावधी गेला असे म्हणावे लागेल. वेरूळनंतर नेवाशाला पाचवी दिवाळी झाली अर्थात इतका दिर्घ कालावधी झाल्यानंतर ते पासवडी पुन्हा मागत आहेत. त्यामुळे वेरूळलाच संतोष पासवडीचा प्रसंग घडला आहे असे शोधकारांना वाटते, म्हणून त्यांनी ती लीळा एळापूरच्या क्रमात मांडली असे म्हणावे लागेल.

स्थानपोथ्यांत नेवासा येथील ‘संतोषांचा सातरा’ या स्थानाचा निर्देश पुरादित्याच्या पुढे असणाऱ्या हाटवटीच्या पश्चिम टोकाजवळ दिला आहे.

१. ‘‘पुरादित्यापूर्वे पूर्व-पसिम हाटवटी : हाटवटीयेचेया पसीमीलां सिरां वट : वटापूर्वे पांडा ती (३०) संतोषाचा सातरा :’’

२. ‘‘पूर्व-पश्चिम राजबीदी : ते राजबीदी दक्षिणे वडु : त्या वडातळि कापडमांडवी : तेथ गोसावी बीजें केलें त्या वडाखालि संतोखाचा सातरा :’’

३. ‘‘पूर्व-पसीम हाटवटी : हाटवटीए वडाखालि संतोखाचा सातरा :’’

     ज्याअर्थी स्थानपोथीकारांनी त्या स्थानाचा निर्देश केला आहे, त्याअर्थी ती लीळा या ठिकाणी घडली असावी असे का म्हणू नये! म्हणजे संतोषांना वेरूळला मिळालेली पासवडी नेवाशाला आल्यानंतर त्यांनी सर्वज्ञांना वोळगविली आणि याच ठिकाणी परत मागितली, त्या अविधी परिहारार्थ सातरा पसरायला लावला असे म्हटले तर यासही पुढील वा-२ पाठातील लीळेतील वाक्याचा बाध येतो, ‘‘संतोषें गोसावियांसि पासवडी ओळगविली होति : तें गोसावी ‘दिवस दोनि पांगरली :’’ यावरूनही असे वाटते की, ही लीळा एळापुरलाच का नसावी.

     असे जरी असले तरी बहुतेक सर्वच स्थानपोथ्यांत ‘संतोषाचा सातरा’ या स्थानाचा निर्देश नेवाशात आहे. शिवबासांच्या पिढीअनुमत स्थानपोथीत देखील या स्थानाचा निर्देश नेवाशातच आहे. परंतु त्याचा निर्देश त्यांनी म्हाळसेच्या दारवंठ्याजवळ केला आहे. ‘‘म्हाळसेचिये जगतीपश्चिमे वाळुवंटीं साइंदेवांचीं केळें आरोगण : बाइसाचां विरक्त दाखवणें : नाथोबाकरवि येळौर मांगळौर म्हणवणें : संतोषाकरवि सातरा घालवणें : हे तीन्ही दारवठां : हिराइसें वाळुवंटीं :’’ या पोथीचा समाप्तीलेख पुढीलप्रमाणे आहे- ‘‘पिढी अनुमत स्थाने... इति नागराज उपशिष्य देवमुनिकृत शोधनस्थानें समाप्तिगमनू...शकें १५२५’’

     आणि काही चरित्रपोथ्यांतही या लीळेचा समावेश नेवाशातच केला आहे. रत्नामाळा स्तोत्रातही लक्ष्मींद्रबासांच्या श्लोकांत नेवाशातच या स्थानाचा निर्देश आढळतो.-

कुत्रापि मिळिता तस्य पटी संतोषयोगिनः ।

तेन दत्ता परेशाय स ददौ नागमातृकां ॥११३८॥

संतोषनामा तद दृष्टवा तन्मनः क्षुभितं भृशं ।

स देवांतिकमागत्य शीतं वाति मम प्रभो ॥११३९॥

परः प्राह च कथांयाश्चीरं योगिन्‍क्षिपेदिति ।

उवाच परमं योगी तुभ्यं दत्ता पटी मया ॥११४०॥

नागांबायास्त्वया दत्ता सा पटी मम दीयतां ।

ॐ मित्युक्त्वा परेशेन तदावोचत दासिकां ॥११४१॥

आनीयतां पटीं बायि स्वयं स्वीकृत्य संददौ ।

तस्याविधिविनाशार्थं योगिनं समुवाच ह ॥११४२॥

यथा मंडळीक: कर्ता तथा स्वमपि तत्कुरु ।

पैरन्पैरन्वदन्सर्वान्नियुक्तः प्रययौ ततः ॥११४३॥

सर्वमाहृत्य सर्वेशं सायंकाळे समागतः । 

प्रातःकाळे च तस्यान्नं कारयामास किंकरैः ॥११४४॥

भुजन्स्वभाजने तस्थौ योगिनं प्राह सर्वदृक्‍।

प्रणामं कुरु संतोष वद स्वेदं मुखेन च ॥११४५॥

बायिसानां हृता पटी मया पापेन चात्मने । ।

सोविधि शमायातु प्रोक्तेदं नमनं कुरु ॥११४६॥

विहितं यदिदं सर्वे परेशोक्तमकारयत्‍॥

दर्शयामास तान्‍सर्वान्‍ लीळामनुसृतान्प्रति ॥११४७॥

     उपरोक्त लक्ष्मींद्रबासांनी केलेल्या वर्णनात ‘कुत्रापि मिळिता तस्य पटी’ संतोषांना ती पासवडी कुठेतरी मिळाली होती ‘तेन दत्ता’ त्यांनी ती सर्वज्ञांना अर्पण केली. ‘परेशाय नागमातृकां स ददौ।’ सर्वज्ञांनी ती बाईसांना दिली. अर्थात संतोषांना मिळालेली पासवडी त्यांनी नेवाशातच अर्पण केली आणि या ठिकाणीच त्यांनी परत मागितली असे म्हणावयाचे आहे. ‘कुत्रापि मिळिता’ याचा अर्थ संतोषांना ती पासवडी वेरूळला मिळाली होती असा अभिप्रेत असावा का? तसे जर असेल तर पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो, इतक्या दीर्घ कालावधीपर्यंत खुद्द आमचे देव (सर्वज्ञ) देखील दीर्घकाळ वस्त्र वापरत असतील असं चरित्रावरून दिसून येत नाही. त्यामुळे बाईसांनी ती पासवडी सांभाळून ठेवली होती का! अशी शक्यता वाटत नाही. जर ‘कुत्रापि मिळिता’ याचा अर्थ नेवाशास येण्याच्या काही काळाआधी कुठेतरी ती मिळाली होती असे म्हटले तर शक्य आहे. परंतु त्यांना इतरत्र कुठेतरी पासवडी मिळाली होती असा कोणताच पुरावा चरित्रपाठात वा इतर ग्रंथात आढळत नाही.

     संतोषांच्या सातऱ्याचा प्रसंग नेमका वेरूळला असावा का नेवाशाला? या प्रश्नाचे उत्तर मिळणे अतिशय कठीण आहे.

संतोषांच्या सातऱ्याचे मानचित्र

पुरादित्यापुढील हाटवटी

स्थानपोथीतील हाटवटीचे वर्णन-

१. ‘‘पुरादित्यापुढे पूर्व-पश्चिम हाटवटी : हाटवटिचिये पूर्विली शीरां घाटावरि देउळी : तियेपुढें उभयां ठाकौनि यात्रा आकर्षणी व्यवस्था कथन :’’

२. ‘‘एकी वासना. पुर्व दीसे वडु : बीदी : दोहीकडे पडीसाळा दुसीयाचीया :’’

     ही हाटवटी (बाजारपेठ) पुरादित्यापासून ते प्रवरेच्या पश्चिम तटापर्यंत होती. हाटवटीच्या पूर्विल टोकावर घाट होता. घाटाच्या उत्तर टोकावर वराहदेवाची देऊळी होती. या देउळीसमोर ‘‘यात्रा आकर्षणी व्यवस्था कथन’’ ही लीळा घडली. घाटाच्या पश्चिम बाजूस क्रमानेच उत्तर-दक्षिण अशी चार देवालये होती.     

     पुरादित्याच्या देवळासमोरून आलेली हाटवटी गोपाळाच्या देवळाला वळसा घालून पून्हा पूर्वेकडे प्रवरेच्या पश्चिम घाटास येऊन मिळाली असे स्थानपोथीतील पुढील वाक्यावरून म्हणता येईल. ‘‘गोपाळाच्या देउळा पसिमे राजबीदीस नाथोबाकरवि सातरा घालवणे :’’

नाथोबांच्या सातऱ्याचे मानचित्र

गोपाळ, संगमेश्वर, सुंदर, कपाळेश्वर

स्थानपोथीतील चारी देवालयांचे वर्णन-

‘‘पेहेरेचीये पसिमीले थडियेसि गोपाळाचें देउळ पश्चिमाभिमुख : तेथचि देवा सीक्षा भेटि : तेथौनि साधातें म्हाळसा पाहों पाठवणें :॥: गोपाळाच्या देउळा पसिमे राजबीदीस नाथोबाकरवि सातरा घालवणें : तथा देउळापुढें थडीएसि : त्यास दक्षिणे संगमेस्वराचें देउळ पुर्वाभिमुख : तेथौनि यात्रा अवलोकणें : तथा आकर्षणें :॥: त्यास दक्षीणें सौंदराचें देउळ पुर्वाभिमुख : त्याचे चौकीं आसन : विहार :॥: जगतीचा दारवठा पुर्वाभिमुख : त्यासि दक्षीणे कपाळेस्वराचें देउळ पुर्वाभिमुख : चौकीं आसन : विहार :॥:’’

     गोपाळ, संगमेश्वर, सुंदर, कपाळेश्वर ही चारही देवालये प्रवरेच्या पश्चिम तटावर घाटाच्या पश्चिम बाजूस क्रमानेच उत्तर-दक्षिण होती. उत्तरेकडून सुरूवातीला गोपाळाचे देऊळ होते. गोपाळाच्या देवळानंतर दक्षिणेस प्रवरेच्या काठावर संगमेश्वराचे देऊळ होते. आणि त्यास दक्षिणे सुंदराचे देऊळ आणि त्यासही दक्षिणे पव्हेजवळील घाटाच्या दक्षिणेस वाळवंटात कपाळेश्वराचे देउळ होते. ‘‘देवतेचेया घाटा दक्षीणीलीकडे वाळवंटी कपाळेश्वराचे देउळ पुर्वामुख :’

गोपाळाचे देऊळ

स्थानपोथीत गोपाळाच्या तीन देवळांचा उल्लेख येतो.

१. एक नेवासा (बुद्रुक) गावातील प्रवरेच्या पश्चिम तटावरील घाटाच्या पश्चिमेकडे.

२. दुसरा नेवासा (खुर्द) गावातील प्रवरेच्या पूर्व तटावरील म्हाळसा देवालयाच्या दक्षिणेकडे.

३. आणि तिसरा म्हाळसेच्या पश्चिम दारवंठ्यात. यातील तिसऱ्या वास्तूस गोपाळमढ म्हणून संबोधले आहे.

 

प्रवरेच्या पश्चिम तटावरील गोपाळाचे देऊळ

चिरडे गटाच्या स्थानपोथीतील गोपाळ देवालयाचा स्थान निर्देश-

     प्रवरेच्या पश्चिम तटावरील गोपाळाचे देऊळ हे पश्चिमाभिमुख होते. ‘‘पेहेरेचीये पसिमीले थडियेसि गोपाळाचें देउळ पश्चिमाभिमुख : तेथचि देवा सीक्षा भेटि : तेथौनि साधातें म्हाळसा पाहों पाठवणें :’’ या पाठकारांच्या वासनेप्रमाणे दादोसांची भेट आणि साधाते म्हाळसा पाहो पाठवणे या स्थानाचा निर्देश पेहेरेच्या पश्चिम थडीवरील गोपाळाच्या देवळात आहे.

    चरित्रातही उ.३१६ या लीळेत या ठिकाणाचाच निर्देश केला आहे. ‘‘गोसावी म्हाळसेचेया देउळा विहरणा बीजें करिता मार्गी गोपाळाचां देउळीं रिगतां उत्तरीलीकडें चौकीं आसन जालें : गोसावियांचेया दर्शना साधे आली होति...:’’

गोपाळाचे मानचित्र

संगमेश्वर

१. ‘‘त्यास दक्षिणे संगमेश्वराचे देउळ पूर्वाभिमुख : तेथौनि यात्रा अवलोकणें : तथा आकर्षणें’’

२. ‘‘संगमेस्वराचे देउळ पूर्वाअभिमूख :’’

     नेवासा (खुर्द) गावाच्या पश्चिम तटावरील घाटाच्या पश्चिमेकडे असणाऱ्या गोपाळ देवळाच्या दक्षिणेस संगमेश्वराचे देउळ होते. परंतु या देवळाचा उल्लेख ‘‘तेथौनि यात्रा अवलोकणें : तथा आकर्षणें :’’ याविषयीच आहे. या ठिकाणी आसन झाले असा निर्देश कुठे आढळत नाही.

     यात्रा आकर्षणे या लीळेच्या स्थळाविषयी स्थानपोथ्यांत मतभिन्नता आढळते. चिरडे गटातील स्थानपोथ्यांत यात्रा आकर्षणे या लीळेचा निर्देश संगमेश्वराच्या देवळापुढे दिला आहे. काही गटातील स्थानपोथ्यांत कपाळेश्वरास असणाऱ्या उत्तरेकडील घाटाच्या सोंडीवरून यात्रा आकर्षणे असा निर्देश आहे. पिढीपाठ गटातील स्थानपोथ्यांत आणि काही चरित्रपाठांत पेहेरेच्या पश्चिम घाटावरील उत्तर टोकास असणाऱ्या देवळीपुढे निर्देश आहे. तर काही गटातील स्थानपोथ्यांत म्हाळसेच्या पश्चिम दारवंठ्यास असणाऱ्या घाटावरच आसन झाले आणि येथूनच म्हाळसा संभाषणे या लीळेचा निर्देश आहे.

संगमेश्वराचे मानचित्र

सुंदर

१. ‘‘त्यास दक्षीणें सौंदराचें देउळ पुर्वाभिमुख : त्याचे चौकीं आसन : विहार :॥: जगतीचा दारवठा पुर्वाभिमुख :’’

संगमेश्वर देवळाच्या दक्षिणेस सुंदराचे देऊळ होते. त्याच्या चौकात आसन झाले. त्याच्या जगतीचा दारवठा पूर्वाभिमुख होता.

11. Sundar 01.png

कपाळेश्वर

१. ‘‘त्यासि दक्षीणे कपाळेस्वराचें देउळ पुर्वाभिमुख : चौकीं आसन : विहार :॥: जगतीचा दारवठा पुर्वाभिमुख’’

२. ‘‘कपाळेस्वराचे देउळ पूर्वाअभिमूख :॥: यात्रा अकर्खण :॥:’’

३. ‘‘देवतेचेया घाटा दक्षीणीलीकडे वाळवंटी कपाळेस्वराचे देउळ पुर्वामुख : नांदीया दोही आडवांगी पाइरीया २।२ : पुढें घाटु : आसन : पाइरीया १९ : देउळाउतरे पव्हेपासी घाटु : पाइरीया २०। : कपाळेस्वराचे देउळा उतरे वेघतां तीसरी सोंडी घाटी आसन : म्हाळसी थोटावली राहीली :’’

     सुंदराच्या दक्षिणेस कपाळेश्वराचे देऊळ होते. या देवळाचे अंतर मात्र सुंदरापासून दक्षिणेस थोडे दूर असावे. आताही या मंदिराचे अवशेष प्रवरेच्या वाळवंटात विखरलेल्या अवस्थेत पडलेले आहेत.

          ‘‘देवतेचेया घाटा दक्षीणीलीकडे वाळवंटी कपाळेस्वराचे देउळ पुर्वामुख :’’

     देवतेचा म्हणजे प्रवरेच्या पश्चिम काठावरील म्हाळसा देवालयाकडे जाणारा घाट, त्याच्या दक्षिणेकडे वाळवंटात कपाळेश्वराचे देऊळ पूर्वाभिमुख होते. ‘‘नांदीया दोही आडवांगी पाइरीया २।२ :’’ पूर्वाभिमुख देवळासमोर नंदी असून त्यास दोन्ही बाजूने दोन दोन पायऱ्या होत्या. हे देऊळ पूर्वाभिमुख असल्याने पुढे असणाऱ्या नंदीस ‘आडवांगी’ म्हणजे उत्तर-दक्षिण अशा दोन-दोन पायऱ्या होत्या. त्यापुढे घाट होता. त्या घाटावर सर्वज्ञांना आसन झाले. त्यास १९ पायऱ्या होत्या. हा घाट कपाळेश्वराच्या देवळापुढील होय.

...........................

चारही देवळांच्या समुहातील कपाळेश्वराचे देऊळ हे वास्तविक प्रवरेच्या दक्षिण काठावर होते असे ९७० क्रमांकाच्या स्थानपोथीतील वर्णनावरून वाटते. ‘‘देवतेचेया घाटा दक्षिणीलीकडे वाळवंटी कपाळेश्वराचे देउळ’’ परंतु इतर गटातील स्थानपोथ्यांत ‘‘निवासेया पूर्वे पेहेरे पसिमे थडीयेसी ये देउळे :’’ असा निर्देश आहे.

९७० क्रमांकाच्या पोथीतील ‘‘देवतेचेया घाटा दक्षीनीलीकडे वाळवंटी कपाळेस्वराचे देउळ पुर्वामुख : नांदीया दोही आडवांगी पाइरीया २।२ : पुढें घाटु : आसन : पाइरीया १९ : देउळाउतरे पव्हेपासी घाटु : पाइरीया २०। :’’ या वाक्यावरून कपाळेश्वराचे देउळ हे वाळवंटात असून घाटाच्या म्हणजे पश्चिम तटावरील घाटाच्या दक्षिणेकडे होते असे म्हणावे लागेल. या देवळास पूर्व आणि उत्तर अशा दोन्ही बाजूस घाट असावा असे वाटते. ‘‘पुढे घाटु’’ म्हणजे पूर्व बाजूस घाट आणि कपाळेश्वराच्या उत्तरेस देवळाला लागूनही घाट होता हे पुढील वाक्यावरून म्हणता येईल- ‘‘कपाळेस्वराचे देउळा उतरे वेघतां तीसरी सोंडी घाटी आसन :’’ सारांश ९७० क्रमांकाच्या पोथीनुसार कपाळेश्वराचे देऊळ हे दक्षिण थडीजवळ वाळवंटात होते.

सद्य:स्थितीतही पेहेरेच्या दक्षिण थडीस लागून एक देऊळ भग्नावस्थेत पडलेले आहे. हेच ते कपाळेश्वराचे देऊळ असावे.

प्रवरेच्या दक्षिण तटावरील घाट ९७० क्रमांकाच्या स्थानपोथीतील ‘‘दक्षीणीलीकडील घाटु पाइरीया १२। :’’ असे वर्णन येते. हा घाट प्रवरेच्या दक्षिण तटावरील असावा.  

वरेच्या दक्षिण थडीवर पडलेलेल्या देवळाचे अवशेष

प्रवरेच्या पश्चिम तटावरील घाट

१. ‘‘पेहेरेचे पसीमीली घाटीं पाइरीया ७ : तेथ वऱ्हार देवाची देउळी : तेथ आसन : एकी वासना. गोसावी चरणचालीया उभे असति : पुढां वाळवंट’’

२. ‘‘हाटवटिचिये पूर्विली शीरां घाटावरि देउळी : तियेपुढें उभयां ठाकौनि यात्रा आकर्षणी व्यवस्था कथन :’’

३. ‘‘नदीचिया पश्चिमिला घाटावरि उत्तरीली सेवटी देउळियेपुढां गोसावी उभे असति : तवं म्हाळसीसि पव्हा अपारु आला असे : यात्रा थोरी भरली असे...:’’ (उ.३३८)

४. ‘‘बीदी : दोहीकडे पडीसाळा दुसीयाचीया : पुढें घाटु : सोंडी आसन :’’

     नेवासा (बुद्रुक) गावातील पेहेरेच्या पश्चिम तटावर हा घाट होता. त्यास ७ पायऱ्या असून सोंडीदेखील होत्या. त्या घाटावर वऱ्हार देवाची देऊळी होती. लीळाचरित्रातील वर्णनाप्रमाणे ती घाटाच्या उत्तर टोकावर होती. तिथे आसन झाले. एका वासनेप्रमाणे तिथे चरणचारी उभे राहिले आणि ‘यात्रा आकर्षणी व्यवस्था कथन’’ ही लीळा तिथे घडली.

घाटावरील देवळाचे मानचित्र

वाळवंटातील हाटवटी

स्थानपोथी- वाळवंटातील स्थाने

१. ‘‘वाळवंटी उत्तर-दक्षिण पूर्व-पश्चिम हाटवटी : तेथ ग्राहीक वेखें सकळ पदार्था संबंधु देणें :॥: तथा नाथोबाकरवि वाळवंटी एळौर मांगळौर म्हणवणें :॥:’’

२. ‘‘नदी पैलाडी वाळुवंटीं उत्तरदक्षिण पूर्वपश्चिम यात्रेची हाटवटी :॥: तेथ ग्राहिक वेषें सकळ पदार्था संबंध :॥:’’

२. ‘‘उतरदखीण पूर्वपसीम हाटवटी :॥: सकळ पदार्था संबंधु देणें :॥:’’

३. ‘‘एकु दिसु उदेयाचां पूजावसर जालेंयांनतरें गोसावी विहरणा म्हाळसापुरा वाळवंटें वाळवंटें बीजें केलें : वाळवंटाचिये ठाउनि दारवंठांवेऱ्हीं हाटवटी भरली असे :’’ (उ.३३८).

     प्रवरेच्या पूर्व तटावरील म्हाळसेच्या पश्चिम दारवंठ्यावर घाट होता. त्या घाटासमोरील वाळवंटात सुरवातीस पूर्व-पश्चिम आणि पश्चिमेकडे पश्चिमतटापर्यंत उत्तर-दक्षिण अशी हाटवटी होती.

 

साइदेवा भेटी-वाळवंटातील स्थाने

स्थानपोथीतील साइदेवा भेटी स्थानाचा निर्देश-

१. ‘‘म्हाळसेच्या जगती वाव्यकोनी वाळुवंटी साइंदेवा भेटि : ते प्रुहीतद्वारें : ते रायाचीये आंघोळीसि आले होते : तें इंद्रोबाचे मामे : तेहीं आपणेयांवरि लोहवी छत्री धरिली असे : तेहीं गोसावियांसि केळें दर्शना केलीं : पांच (एकी वासना. सात) : तेयाखालि वाणिया गांधिया : मोती वाणिया : कासाराचीं : सवदागरांची : देशाउरियांची बीढारें असति : तेथ गोसावी बीजें केलें : तयाचेया सकळ पदार्थासि ग्राहीकवेसें संबंधु दिधला :॥:’’

२. ‘‘म्हाळसेचिये जगतीपश्चिमे वाळुवंटीं साइंदेवांचीं केळें आरोगण :॥:’’

३. ‘‘घाटापुढे वाळुवंट : साइभटाचीं केळें : पसीम दीसे वाळुवंटी हाटवटी : ग्राहीकी :’’

     म्हाळसेच्या जगतीच्या वायव्येकडे प्रवरेच्या वाळवंटात, ‘साइदेवांची केळे आरोगण’ ही लीळा घडली. (उ.३१७) चरित्रात याविषयी अतिशय सुंदर वर्णन आलेले आहे

साइदेवा भेटी

३१७ वाळुवंटीं साइंदेवां भेटि : कर्दळी फळें आरोगणा

     एके दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यानंतर सर्वज्ञांनी म्हाळशीच्या देवळात विहरणास बीजे केले. त्यानंतर विहरण आटोपून सकाळच्या एका प्रहरी पश्चिम दरवाजाने बीजे करून तिथला घाट उतरले. तेव्हा राजाच्या आंघोळीची किंवा राजाच्या दैवतांच्या आंघोळीची व्यवस्था पाहणारे साईदेव राजाची नित्यनेमाची सेवा केल्यानंतर, स्वतः आंघोळ करून पालखीत बसून सेवकांनी वर छत्र धरलेले आहे अशा अवस्थेत दैवतास जात होते. तेव्हा त्यांनी सर्वज्ञांना

     वाळवंटातून येताना पाहिले आणि पालखीतून खाली उतरले. दंडवत घालून श्रीचरणास लागले. तलम पातळ वस्त्रांचं आसन रचले. त्यावर सर्वज्ञ विराजमान झाले. मग त्यांनी सेवकांकडून आदरपूर्वक सर्वज्ञांवर छत्र धरवले. देवाचे श्रीकर, श्रीचरण प्रक्षाळले. किती पैसे ओळगवले (अर्पण केले) ते माहिती नाही. मग सर्वज्ञांना आरोगणेसाठी विनंती केली. सर्वज्ञांनी विनंतीचा स्वीकार केला. वस्त्रांचीच लहानशी तंबूवजा खोली केली. पानपुडा सांभाळणाऱ्या सेवकाला त्यांनी बाजारात पिटाळले. बाजारातून तूप, केळे, साखर मागवली. सर्वज्ञांना वाटीत तूप घालून चारेक केळं सोलून साखरेसोबत आरोगणा दिली. सर्वज्ञांनी तीन केळे आरोगली. त्यानंतर सर्वज्ञांना गुळळा झाला, विडा ओळगवला. साईदेवांनी स्तुती केली. मग सर्वज्ञांनी त्यांना जाण्याची परवानगी दिली. सर्वज्ञांनी मठात बीजे केले.॥

३३७ यात्रे ग्राहिकवेष-स्वीकारें सर्वां संबंधु देणें

     एके दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यानंतर सर्वज्ञांना लवकरच आरोगणा झाली, गुळळा झाला, विडा झाला. मग सर्वज्ञांनी सदरा, टोपरे परिधान केले. त्यावर उपरणं पांघरले. श्रीमुखात तांबूळ होते. अशा प्रकारे ग्राहकाचा वेश स्वीकारला. भटोबासांच्या हातात पानांची चंची होती. सर्वज्ञांनी यात्रेच्या गर्दीत बीजे केले. त्या काळात तिथं मोठी बाजारपेठ होती. माघ महिन्याच्या पौर्णिमेला तिथं यात्रा भरायची. म्हाळसेच्या पश्चिमेस घाटाच्या खाली असणाऱ्या वाळवंटात उत्तरदक्षिण, पूर्वपश्चिम अशा प्रकारे बाजार, दुकानं मांडलेली असायची. सर्वज्ञ ज्या तंबुतल्या दुकानात बीजे करायचे त्या तंबूतील दुकानदार मोठं गिऱ्हाईक, मोठी आसामी आली म्हणून प्रभावित व्हायचा. तो, ‘‘यावे यावे जी.’’ असं म्हणून उभा रहायचा. सर्वज्ञांना घडी घातलेल्या वस्त्राचं आसन घालायचा. त्यावर सर्वज्ञ विराजमान झाल्यानंतर तो तांबूळ द्यायचा. मग सर्वज्ञ बाजारभावाविषयी चर्चा करताना किंमत ठरवताना केलेल्या घासाघासीत हस्तचातुर्याने मोल ठरवायचे. ‘हे महाराज आता सर्व दुकानच खरेदी करतील!’ अशी शक्यता त्याला वाटायची. इतरांशी (आणिका) करार करून तिथून बीजे करायचे. अशाप्रकारे कापूर, कस्तुरी, गोंडे (किंवा घोड्यांचे साजशृंगार), चवऱ्या, माणकं, मोती, रेशमी, सुती वस्त्रं, पोवळं, नाना

प्रकारची धान्यं, धनगर, वाणी, श्रेष्ठ, कनिष्ठ पदार्थ दिवस मावळेपर्यंत आमच्या देवांनी अवलोकले. अशाप्रकारे आमच्या देवांनी सर्व बाजारहाटास संबंध देऊन पुरादित्याच्या मढात बीजे केले.॥

    ‘‘तेयाखालि वानिया गांधिया....बीढारें असति’’

     तेयाखाली म्हणजे साइदेवा भेटी स्थानाच्या खाली अर्थात म्हाळसेच्या घाटाच्या उत्तरेकडील हाटवटीच्या भागात वाणी गांधी, मोती वाणी, कासार, सौदागर, देशाउर यांची बिढारे होती. ग्राहीकवेष धरून सर्वज्ञ त्या ठिकाणी गेले. आणि त्यांच्या समग्र पदार्थांना संबंध दिला.

प्रवरेच्या पूर्व तटावरील म्हाळसा घाट

स्थानपोथ्यांतील घाटाचे निर्देश

१. ‘‘वाळुवंठापूर्वे तोचि पेहरेचा घाटु :॥:’’

२. ‘‘म्हाळसेचे घाटीं पाटांगणे सा :॥: पाइरीया ५६ :’’

३. ‘‘म्हाळसेचिये जगतीचा दारवठा पश्चिमाभिमूख :॥: तोचि घाट :॥:’’

४. ‘‘घाटी आसन :॥: म्हाळसा संभाखण :॥:’’

५. ‘‘घाटु पाइरीया ४०। घाटापुढे वाळुवंट :’’

     म्हाळसा देवालयाच्या पश्चिमेकडील घाटास ५६ पायऱ्या असून त्यास ६ पाटांगणे आहेत. दुसऱ्या पाठकारांनी या घाटास ४० पायऱ्यांचा निर्देश केला आहे. त्या घाटापुढे वाळवंट आहे.

     सद्य:स्थितीत म्हाळसेच्या पश्चिम दारवंठ्यावरील घाट आजही अस्तित्वात आहे. घाटाची रचनाशैली अशाप्रकारे केलेली आहे की अजूनही कित्येक वर्षे त्या घाटाला धक्का लागणार नाही. पाण्याचा कितीही दाब आला तरी मूळ स्थितीत घाट कायम राहील अशा अरुंद पायऱ्यांच्या मांडणीची योजनूक केलेली आहे. पाण्याच्या दाबामुळे पायऱ्यांची रचना विस्कळीत होऊ नये म्हणून संपूर्ण घाटाला थोड्या थोड्या अंतरावर थोडे थोडे बाहेर आलेल्या पाषाणांची रचना केलेली आहे. त्यायोगे मूळ पायऱ्या भक्कम स्वरूपात यथास्थितीत राहतील, ही स्थापत्यशैलीतील दूरदृष्टीच होय.

म्हाळसेच्या पश्चिम दारवंठ्याची प्र.चित्रे  

बाइसांचा विरक्त, नाथोबाप्रती एळौर मांगळौर, संतोषाचा सातरा

स्थानपोथ्यांतील निर्देश-

१. ‘‘बाइसाचां विरक्त दाखवणें :॥: नाथोबाकरवि येळौर मांगळौर म्हणवणें :॥: संतोषाकरवि सातरा घालवणें :॥: हे तीन्ही दारवठां : हिराइसें वाळुवंटीं :॥:’’

२. पूरादैत्या पूर्वे पेहेरेमध्ये वाळवंठ : तेथ वाळुवंठि नाथोबाचा सातरा :॥:

३. ‘‘वाळवंटाचिये ठाउनि दारवंठांवेऱ्हीं हाटवटी भरली असे : दारवंठेंयापासी गोसावी नाथोबातें अवलोकिलें आणि म्हणितलें : ‘‘मंडळिका : तुम्हीं एथ सातरी पसरा :’’ (उ.३३८)

४. ‘‘म्हाळसेचे घाटीं पाटांगणे सा :॥: पाइरीया ५६ : रिगतां पहीलीयाचि पाटांगणावरि संतोखाकरवि सातरा घालवणें : हे रामेश्वरबा :।: परशरामबा : बाइसांचा विरक्त वाळवंटी दाखवणें :॥: तेथचि घाटीं आसन : तेथचि म्हाळसा संबोख :॥:’’

५. ‘‘गोपाळाच्या देउळा पसिमे राजबीदीस नाथोबाकरवि सातरा घालवणे :’’

     बाइसांचा विरक्त, नाथोबाप्रती एळौर मांगळौर, संतोषाचा सातरा ही तिन्ही स्थाने एका वासनेप्रमाणे म्हाळसेच्या दारवंठ्यासमोर आहेत. आणि हिराइसांच्या वासनेप्रमाणे वाळवंटात आहेत. परंतु वाळवंटात कोण्या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित होतो. याचे उत्तर दुसऱ्या गटातील स्थानपोथीत मिळते. ‘‘तथा देउळापुढें थडीएसि :’’ अर्थात हे ठिकाण घाटाच्या समोरच वाळवंटात असल्याचे लक्षात येते.

‘संतोषांचा सातरा’ आणि ‘नाथोबाकरवी एळौर मांगळौर म्हणवणे’ या स्थानाविषयीही स्थानपोथ्यांत मतभेद आढळतात. काही गटातील स्थानपोथ्यांत ‘संतोषाचा सातरा’ या स्थानाचा निर्देश पुरादित्याच्या पूर्वेस पूर्व-पश्चिम असणाऱ्या हाटवटीच्या पश्चिम टोकाजवळ आहे. तर रामेश्वरबासांच्या वासनेप्रमाणे ‘‘म्हाळसेचे घाटीं पाटांगणे सा :॥: पाइरीया ५६ : रिगतां पहीलीयाचि पाटांगणावरि संतोखाकरवि सातरा घालवणें :’’ पहिल्या पाटांगणावर आहे.

     नाथोबाकरवी सातरा घालवणे या स्थानाचाही निर्देश काही गटातील स्थानपोथ्यांत ‘‘गोपाळाच्या देउळा पसिमे राजबीदीस नाथोबाकरवि सातरा घालवणें :’’ म्हणजे नेवासा (बुद्रुक) गावाच्या पश्चिम थडीवर (काठावर) असणाऱ्या गोपाळाच्या पश्चिमेस आहे. तर हिराइसांच्या वासनेप्रमाणे वाळवंटात आहे.

हिराइसा वासना- वाळवंटी नाथोबाकरवी सातरा घालवणे

म्हाळसेच्या पश्चिम दारवंठ्यातील गोपाळमढ

 ‘‘जगतीचेया पसीमीलीकडे दारवठेयांतु मढु : तो गोपाळाचा :॥: उंबरा :॥: भीतरि उतरतीया पाइरीया ७ : चौकीं आसन : मढापुढां रासेचें माड : त्यासि पसीमेच्या पाइरीया ४ : उत्तरेच्या पाइरीया ४ : दक्षिणेच्या पाइरीया ४ :॥: मार्गु : मढाचा उंबरा :॥: उतरतीया पाइरीया पाच : आंगण चिरेबंद :॥०॥’’

     म्हाळसेच्या जगतीत पश्चिम दारवंठ्यात गोपाळाचा मढ होता. त्या मढात जाताना आतील उतरत्या पायऱ्या सात होत्या. तर बाहेर पाच पायऱ्या होत्या. त्याच्या चौकात सर्वज्ञांना आसन झाले. त्या मढापुढे रासक्रीडेचे माड१ होते. त्यास पश्चिमेकडून चार पायऱ्या, उत्तरेकडून चार, आणि दक्षिणेकडून चार पायऱ्या होत्या. गोपाळमढाचे आंगण हे चिरेबद्ध होते. पश्चिम दारवंठ्यातील गोपाळमढाचा निर्देश चिरडे गटातील स्थानपोथ्यांतच आढळतो.

गोपाळमढाची मानचित्रे

रासेचे माड

म्हाळसा देवालय

१. ‘‘वाळवंठापुर्वे तोची पुर्वे पेहेरेचा घाटु :॥: घाटापूर्वे पूर्विले थडियासि म्हाळसेचें देउळ पसिमामूख :॥: उतर दक्षिण पटिसाळा :॥: माडावरि आसन : तेथ सिमूगा सिंपणे :॥: हीराइसा : दक्षिणीले दारवठां माडावरुनि सिंपणे अवलोकणे :॥:’’

२. ‘‘म्हाळसेचे देउळ उत्तराभिमुख : तोचि उंबरवटु :॥: चौकी आसन :॥: उत्तरीली विभागीं भीतीसीं खातें होतें तेथ आसन : हे परशरामबा :॥: तेथ बडुवीं पूजा :॥:’’

३. ‘‘म्हाळसेचें देउळ पसिमाभिमुख : पुढां पटीसाळ पश्चिमाभिमुख : भीतरि चौकीं आसन : हे रामेश्वरबा :॥: उत्तरेचे खातां आसन : हे परशरामबा : बडवे पुजा :॥: जगतीचा दारवठा दक्षिणाभिमुख : दारवठां माड तीं खणाचें : ते माझारीले खणीं आसन : तेथौनि सीमुगे सींपणें अवलोकणें :॥: दुसरा जगतीचा दारवठा पश्चिमाभिमुख : तेयापूढें वाळवंट वीसेखाचें :॥:’’

४. ‘‘म्हाळसेचे देउळ पसीमामुख : भीतरी डावेया हाता खातें : चौका उजुकारे उतरीलीकडे गोसावीयांसी आसन : राणेनी पूजा आधी गोसावियांसी केली : मग देवतेसी : मंडपाचिया पाइरीया ३ : म्हाळसेचें माहेर : उतराभिमुख देउळ : तेथ आसन : मंडपासी तीनी दारवठे : एकु पुर्वाभिमुख : पाइरीया ४ : एकु पसीमामुख पाइरीया ५ : एकु दक्षीणामुख : पाइरीया ३ : पौळीचे दोनी दारवठे : एकु उतरामुख : एकु दक्षीणामुख : माडाचा दुसरा खणी आसन : सींपणे अवलोकणे :’’

     म्हाळसेचे देवालय पश्चिमाभिमुख होते. त्यास पश्चिमाभिमुख पटिशाळ होती. देवालयाच्या मंडपास तीन दारवठे होते. एक दारवठा पूर्वाभिमुख असून त्यास चार पायऱ्या होत्या. एक पश्चिमाभिमुख असून त्यास पाच पायऱ्या होत्या. एक दक्षिणाभिमुख असून त्यास तीन पायऱ्या होत्या. म्हाळसेचे संपूर्ण देवालय पश्चिमाभिमुख असून गाभारा उत्तराभिमुख होता.

     रामेश्वरबासांच्या वासनेप्रमाणे म्हाळसेच्या चौकात आसन झाले, आणि परशरामबासांच्या वासनेप्रमाणे देवळात उत्तर भिंतीला खाते होते, तिथे आसन झाले. एका वासनेप्रमाणे दोन्ही ठिकाणी आसन झाले.

    पौळीस उत्तराभिमुख, पश्चिमाभिमुख, दक्षिणाभिमुख असे तीन दारवठे होते. दक्षिणाभिमुख दारवंठ्यावर तीन खणांचे माड होते. त्यातील मधल्या खणात सर्वज्ञांना आसन झाले. त्या खणावरून शिमगा सणाचे शिंपणे अवलोकण केले.

म्हाळसा देवालयचे मानचित्र-

गोपाळाचे देउळ

१. ‘‘म्हाळसेचेया देउळा दक्षिणे गोपाळाचें देउळ पश्चिमाभिमूख :।: तेथ चौकीं आसन जालें :।: साधें म्हाळसी पाहों पाठवणें :॥: परशरामबा. रवणियेवरि आसन : येथौनि पाठवणें :॥: परशरामबास. रवणियेवरि देवां भेटि :॥: रामेश्वरबा. चौकीं भेटि :॥:’’

२. ‘‘दक्षीणीली (क)डौनी भीतरी रीगता उजवेया हाता गोपाळाचे देउळ पसीमामुख : पुर्वीलीकडे देवा सीक्षा भेटी : एकी वासना. गोपाळी वस्ती : पौळीचा दारवठा पसीमामुख : पाइरीया ५।३ : उतरे (एकी वासना. पुर्वे) खीडकी : (पाइरीया) ६। :’’

     म्हाळसेच्या दक्षिण दारवंठ्यातून आत शिरल्यावर उजव्या हातास गोपाळाचे देऊळ पश्चिमाभिमुख होते. त्याच्या चौकात सर्वज्ञांना आसन झाले. आणि बाहेर पूर्वील बाजूस रवणी होती. त्या रवणीवरही आसन झाले.

     एका वासनेप्रमाणे आणि रामेश्वरबासांच्या वासनेप्रमाणे ‘साधाते म्हाळसा पाहो पाठवणे’ चौकात आसन झाल्यावर. आणि परशरामबासांच्या वासनेप्रमाणे रवणीवर आसन झाल्यावर. ‘देवां भेटी’ हे देखील परशरामबासांच्या वासनेप्रमाणे रवणीवर आसन झाल्यावर. ‘दादोसांची भेट’ आणि ‘साधातें म्हाळसा पाहो पाठवणे’ या स्थानांविषयी स्थानपोथ्यांत मतभेद आहेत. चिरडे गटातील स्थानपोथीकारांच्या मतानुसार नेवासा (खुर्द) गावाच्या पश्चिम तटावरील घाटाच्या पश्चिमेकडे असणाऱ्या गोपाळाच्या देवळात ही स्थाने आहेत, तर दुसऱ्या गटातील स्थानपोथीकारांच्या मतानुसार म्हाळसेच्या जगतीत दक्षिणेकडे असणाऱ्या गोपाळाच्या देवळातील ही स्थाने आहेत.

गोपाळाचे मानचित्र

दक्षिण दारवठा (शिंपणे अवलोकणे)

     म्हाळसा देवालय असलेला दुर्ग परिसर १२,४०४ चौमी. परिघाचा असून हा परिसर गावाच्या पश्चिमेकडे प्रवरेच्या पूर्व काठावर आहे. या दुर्गाचा पूर्वेकडील व ईशान्येकडील तटबंदीचा काही भाग ढासळला आहे. पश्चिमेच्या घाटाकडील दुर्गाच्या भिंतीचा भाग मूळ स्थितीत जसाच्या तसा आहे; परंतु त्याच्या उत्तर टोकाकडील घाटाच्या वायव्येकडील भाग खचल्यामुळे तिथल्या भागाची काहीशी पडझड झाली आहे. दुर्गाच्या आतील, मुख्यत्वे म्हाळसा देवालय, गोपाळाचे देऊळ आणि इतर वास्तू कालौघात नामशेष झाल्या असल्या तरी त्यांचे अवशेष अजूनही इतस्ततः विखूरलेले आढळतात. ही जागा दीर्घकाळापासून पडीत असल्याने तटबंदीचा आतील परिसर रानटी झाडाझुडपांनी व्याप्त आहे. त्यामुळे त्या जागेचे निरीक्षण करता आले नाही. याच परिसरातील मोकळ्या जागेत ख्रिश्चन कुटुंब वास्तव्यास असून ते या जागेत शेती करतात. पश्चिमेकडील तटबंदीच्या आतील बाजूस एक विहीर असून त्यापुढील पूर्वेचा परिसर शेतीसाठी वापरला जातो.

म्हाळसा, गोपाळाचे देऊळ आणि गोपाळ मठ ही तीन्ही देवालये दुर्गाच्या आत होती. स्थानपोथीतील वर्णनानुसार म्हाळसेचे देवालय हे दुर्गाच्या पश्चिम दारवंठ्याच्या पूर्वेस होते. आणि या देवालयाच्या दक्षिणेस गोपाळाचे देऊळ होते.सद्यस्तितीत म्हाळसा देवळाच्या दक्षिणेकडील तटबंदीचा काही भाग आणि पश्चिमेकडील घाट उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त देऊळ नामशेष झाल्यात जमा आहे.

     निजामशाहीच्या काळात शहाजी भोसले अनेकदा नेवासे येथे वास्तव्य करीत असत. तेथील म्हाळसा (मोहिनीराज) मंदिरास ते आर्थिक मदत देत असत. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या मंदिराची देखरेख होळकरांनी केली आणि होळकरांचे सरदार गंगाधर चंद्रचूड यांना हे मंदिर जहागीर म्हणून मिळाले होते. नंतरच्या काळात मल्हारराव होळकरांनी चंद्रचूडकडून ही जहागीर काही काळासाठी जप्त केली. ही जहागीर परत मिळाली तर आपण नव्याने मंदिराची उभारणी करू असे त्यांनी जाहीर केले. काही काळानंतर त्यांना ती जहागीर परत करण्यात आली. तेव्हा इ.स. १७७३ मध्ये (अंदाजे ४-५ लाख रुपये खर्च करून) प्रवरेच्या काठावर असलेले म्हाळसा (मोहिनीराज) मंदिर नष्ट होण्याच्या अवस्थेत असल्याने गावात त्याच भागात नव्याने बांधले. पेशव्यांकडून दरवर्षी म्हाळसा (मोहिनीराज) मंदिराला दीड हजार रुपये देणगी मिळत असे. पुढे १८६१ मध्ये इनाम कमिशनने ही रक्कम देण्याचे बंद केले. नव्याने बांधलेल्या मंदिराचा अष्टकोनी सभामंडप आहे. आणि वरती ७.६० मी. व्यासाचा गोलाकार घुमट आहे.

     गाभाऱ्यात मोहिनीराजाची वालुकामय पाषाणाची मूर्ती आहे. या मूर्तीच्या निर्मितीचीही कथा आहे. ती विश्वकम्र्याने निर्माण केली आहे अशी लोकश्रद्धा आहे. यासंबंधीची एक पुराणकथा पुढीलप्रमाणे प्रचलित आहे की, या क्षेत्रात गुप्तरूपाने राहणाऱ्या विष्णूचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे असे शांडिल्य नावाच्या एका साधुपुरुषाला वाटले. त्याने मधु म्हणजे प्रवरा आणि मालती म्हणजे मावा या नद्यांच्या संगमावर खडतर तप केले. त्या तपाने प्रसन्न झालेल्या विष्णूने त्या भक्ताच्या इच्छेनुसार विश्वकम्र्याकडून आपली मोहिनीराजाची मूर्ती करवून घेतली आणि शांडिल्याने तिची स्थापना नेवासे क्षेत्रात केली.

अर्धनारीनटेश्वर मोहिनीराजमूर्ती सुमारे साडेचार फूट उंचीची चतुर्भूज मूर्ती आहे. शंख, चक्र, गदा आणि अमृतकलश तिने धारण केले आहेत. उजव्या पायाखाली राहू दैत्य दाबलेला आहे.

पौराणिक ग्रंथांत लिहिल्याप्रमाणे राहूचा वध करण्यासाठी विष्णूने मोहिनीचे रुप घेतले आणि राहू या असुराचा वध केला. जिथे हा राहूचा वध झाला ते ठिकाण म्हणजे नेवासे येथील म्हाळसा (मोहिनीराज) हे मंदिर आहे. अशी लोकांची श्रद्धा आहे. स्कंदपुराणातल्या कथेनुसार, कुबेराने तारकासुरापासून वाचण्यासाठी विष्णूच्या सांगण्यावरून निधी लपवून येथे ठेवला आणि त्याला निधीवास असे नाव पडले.

     वरील माहितीत जिर्णोद्धारीत मंदिरातील म्हाळसेची मूर्ती ही मूळ म्हाळसेच्या देवालयातील नाही, असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. त्यास कारण असे की, साधांबाईंना पाहायला पाठविलेल्या म्हाळसेचे वर्णन या मूर्तीस जुळत नसल्याने ती मूर्ती नसावी असे त्यांचे म्हणणे आहे.

स्थानपोथ्यांच्या विविध गटातील निधिवास स्थाने

क्रमशः...

स्थानशोधनी

©2023 by स्थानशोधनी. Proudly created by Shri Devdatt Ashram, Jadhavwadi

Total Views

bottom of page