top of page

    सृजन-अवतरण-आणि चतुर्विधी भ्रमण हा जर अनंता सृष्टीपासूनचा अविद्यायुक्त जीवाचा क्लेषकारक इतिहास असेल तर सृजन-अवतरण-आणि चतुर्विधापरी उद्धरण हा त्या सृष्टीचक्रचालक, अनिमित्तबंधूतारक, अनंत ब्रह्मांडनायकाचा इतिहास-वर्तमान-आणि भविष्यही आहे! होय, तो भोगौलिक दृष्ट्या निस्सीम, भौमितीयदृष्ट्या निराकार, जीवशास्त्रीयदृष्ट्या निरवयव, चित्रीयदृष्ट्या अमूर्त, गणितीयदृष्ट्या अनंत, वैज्ञानिकदृष्ट्या अगम्य, खगोलीयदृष्ट्या अनुपलब्ध, बौद्धिकदृष्ट्या अगाध, तात्विकदृष्ट्या अप्रमेय, तार्किकदृष्ट्या अतर्क्य, सामाजिकदृष्ट्या अवर्ग्य, लौकिकदृष्ट्या अगोचर, साहित्यिकदृष्ट्या अवर्णनीय आणि आलंकारिकदृष्ट्या निरुपम असला तरी ‘‘संभवामि युगे युगे’’ असल्यामुळे आणि आपल्या अस्तित्वाचा स्वमुखेच ‘‘बहुनि मे व्यतितानि जन्मानि..’’ असा दाखला देणारा असल्याने ऐतिहासिकरित्या ‘संस्मरणीय’ निश्चितच ठरतो. मात्र तो अद्भूत इतिहास जाणणारा ‘‘मनुष्यानाम् सहस्त्रेषु’’च असतो. त्यातही यथार्थपणे जाणणारा क्वचितच अन् त्याहीपेक्षा तो सुवर्णसोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवणारा सौभाग्यवंत तर अतिशयच विरळा नांदतो. मग तशी पूर्व, किंबहुना अपूर्व जोड जोडली नसणाऱ्या आम्हा निदैवीयांनी तो सुवर्णकाळ कसा बरे अनुभवावा..? त्या काळात डोकावून त्याला अनुभवण्याचे कुठले साधन उपलब्ध नाहीच काय?

      कर्मरहाटीच्या एखाद्या संदर्भात कदाचित याचे उत्तर ‘नाही’ असे आले असते. परंतु दैवरहाटीत आपल्या अनन्य भक्ताला ‘‘मा शुच:।’’ म्हणणारा तो कृपाळू भगवंत ‘साधनदाता’ही असल्यामुळे त्या सुवर्णयुगात शिरण्याचे दालनही त्यानेच खुले करुन दिले आहे. होय, त्याच्या अस्तित्वाची जशी तशी साक्ष उमटवून देणारी, भगवंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली, चतुर्विध साधनातील आद्य साधन म्हणून प्रतिष्ठेस पावलेली, केवळ आठवणीनेही दिव्यानुभूती प्राप्त करुन देणारी अशी ती श्रीचरणांकित महापवित्र स्थाने.. नव्हे, त्या सुवर्ण महोत्सवाची क्षणचित्रे!

      अशी असंख्य सुवर्णयुगं होऊन गेलीत, त्यातील मोजकीच आपल्या अधिकारानुसार आपल्याला ज्ञात झालीत. त्यानुसार मातापूर अन् पांचाळेश्वरची स्थानं अतिप्राचीन-कोण्या एका त्रेतायुगातील. ती स्थानं नमस करण्याची आज्ञा कलियुगात आमच्या साधनदात्यांनी केली असली तरी द्वापरातील एका घटनेतही याचे प्रतिबिंब दिसून येते. श्रीकृष्ण भगवंत बालपणी गोकुळात क्रीडा करीत असताना गोवर्धन पर्वतावर त्यांचा नित्य विहार होता. तेव्हा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या गिरिराजाची पूजा त्यांनी करवून घेतली होती. असे भिन्न अवतारांच्या असतिपरीतील साधर्म्य, बिंब-प्रतिबिंब भाव येथे लक्षात घेण्याजोगा ठरतो.

***

     सर्वसंग परित्याग करून आलेला अनुसरला साधक दृढता बाणेपर्यंत अधिकरणाची जवळीक करतो. तदनंतर तो नित्यविधीस प्रवृत्त होतो, म्हणजेच अटनाला निघतो. तेव्हा लगेच त्याच्याकडून गाउनि गावा निरुद्देश नित्याटन होववत नाही. त्यामुळे आणि सर्व स्थाने त्याने पाहिली-नमस्करिली नसल्यानेही तो स्थानोद्देशे अटन करतो. का ‘स्थानमात्र पाहावे’ अशी पूर्वजांची आज्ञाच आहे. त्यामागे भगवंतांचीही हीच प्रवृत्ती असावी की स्थाने आठवत आठवत साधक मुख्य स्मरणापर्यंत पोहचावा. मुख्य स्मरण साधत नाही म्हणून स्थान आठवायला सांगितले आहे. किंबहुना स्थान ही स्मरणाची प्रथम पायरीच आहे. प्रसादाद्वारे देवाला आठवावं, तर श्रीमूर्तीवरील वस्त्रांचे साने विभागच आज उपलब्ध आहेत. आणि तेही जाळीआड, बांधणीत दडलेले! भिक्षु-वासनिकाचा विचार करावा तर जीवाची दोषदृष्टी आडवी येते. साक्षात अवताराबद्दलच त्रिविधता असते, तर जीवाबद्दल काय बोलावे! अर्थात स्थानाबद्दलही प्रतिकूळता संभवत असली तरी त्याची शक्यता कमी असते. कारण जड वस्तू कुणाच्या अधात-मधात नसल्याने जीवाला ती ‘दोषरहित’ वाटते.

एखादी लीळा केव्हा, कधी, कोण्याकाळी, कोण्या ऋतूत, कोण्या प्रसंगी घडली, कोणाप्रती निरूपण झाले, भक्तीजन कोण कोण उपस्थित होते, श्रीमूर्तीवर कोणते वस्त्र, अलंकार, आभूषणं विराजमान होते इ. तपशील स्मरणात अत्यंत महत्त्वाचा असला तरी ती लीळा कोठे, कोण्या प्रदेशात घडली, तिथे देऊळ होते की एखाद्याचे घर, रांधवण हाट होता का माणिकदंड, तेव्हा वृक्षातळी आसन होते की गुंफेमध्ये, त्याची जगती किती दूरवर होती, गुंफा किती होत्या, कशा होत्या, पायऱ्या किती होत्या, चौक किती खांबांवर उभा होता, पटीशाळा कशी होती, द्वारे कवाडे किती होती, त्यांचे मुख कोण्या दिशेकडे होते, खिडक्या किती होत्या, गाभारा कसा होता आणि या सगळ्यानुसार देव नेमके कोण्या ठिकाणी, कोण्या दिशेकडे श्रीमुख करून आसनस्थ होते, हे जाणून घेतल्याशिवाय स्मरण होणे दुरापास्त आहे. आणि ते जाणण्यासाठी ‘‘हे होते तेथ जाइजे’’ हाच श्रीमुखोक्त रस्ता आहे.

      याच मार्गावर चालून आचार्यादिकांनी परबह्म परमेश्वराला प्राप्त करून घेतले. पुढे आचार्यांच्या आज्ञेनुसार प्रथमच बाइदेवबासांनी स्थानपोथीची बांधणी केली असावी असा कयास आहे. त्यामुळे स्थानं अबाधित राहण्याबरोबरच पुढील पिढ्यांना स्थानावरील निश्चित नमस्कारी जागेची माहिती आणि तत्कालीन परिस्थितीची जाणीव झाली. परंतु कालचक्र फिरले तशी स्थानांची परिस्थितीही झपाट्याने बदलत गेली. काही देवळं ढासळायला लागलीत, काही नदीच्या प्रवाहात गेलीत, काहींच्या जीर्णोद्धाराने मूळस्थिती पालटली, काहींच्या घरातील स्थाने विविध कारणांमुळे अनुपलब्ध झाली, यवनांच्या धाडींमुळेही स्थानं नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला. आजच्या घडीला तर वेरुळ, घाटावरील काही स्थाने अशा बोटावर मोजता याव्या इतक्याच स्थानांची मूळस्थिती कायम आहे. एर बहुतांश स्थानांच्या स्थितीत कमी अधिक फरकाने पालट झाला आहे. त्यामुळे मूळ परिस्थिती कशी होती आणि पोथी लेखनाच्या समयी त्यात कुठला कुठला बदल झाला, हे नोंदवणे आमच्या पूर्वजांना अगत्याचे वाटले. त्यानुसार त्यांनी त्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या. त्यामुळे शेकडो वर्षांपासून पंथाला सुयोग्य अशी दिशा मिळत आलेली आहे. लीळारित्राला जर अवताराच्या क्रीडेचे धावते समालोचन करणारे श्राव्य माध्यम म्हटले तर स्थानपोथीला चलचित्र दाखवणारा मूकपट म्हणावा लागेल. असंख्यांनी ही स्थानपोथी हाताळली अन् तीत भर घालून तिला अधिकाधिक संपन्न केली.

      मात्र त्या सुधारित प्रती प्रकाशात येऊ शकल्या नाहीत, मुद्रित झाल्या नाहीत. त्या अनुषंगाने शोध घेतला असता अधिक माहिती देणाऱ्या बऱ्याच पोथ्या हाती लागल्या. या पोथ्या तत्कालीन परिस्थितीची इत्थंभूत माहिती देणाऱ्या असल्या तरी आजच्या बदललेल्या परिस्थितीला पाहून नूतन साधकाला त्यातील तपशीलाचे आकलन होणे बऱ्याचदा दुष्कर होऊन जाते. फार काय घोगरगावकरांच्या काळातील परिस्थितीही आता बदलून गेली आहे. त्यामुळे आवश्यक तिथे तिथे हयात परिस्थितीचे दाखले दिले आहेत, जेणेकरून उकल अधिक सुलभ व्हावा.

संशोधन कार्याचा आढावा

      कालौघात अनेक मठ, मंदिरे भूमिगत झाली. त्यांचे भग्नावशेष इतस्तत: विखुरलेले आढळतात. परंतु त्यामुळे मूळ वास्तू कशी होती याचा केवळ अंदाज बांधता येतो. असे जरी असले तरी स्थानपोथीतील वर्णन आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मूळ वास्तू कशी होती याचा शोध घेता येणे आता शक्य झाले आहे. या उपक्रमात मूळ वास्तूच्या जागेची निश्चिती अचूक व्हावी म्हणून तेथील स्थळाची स्थानपोथीच्या दिशानिर्देशाद्वारे पाहणी करण्यात आली आहे. तेथील अवशेष आणि इतरही संदर्भ जुळावेत या करीता भूपृष्ठभागाची (Terrain) पाहणी करूनच अभ्यासपूर्ण शोध घेतला आहे. 

      या स्थानशोधनीचे मुख्य वैशिष्ट्य सर्वज्ञकालातील मठ, मंदिरे, घाट, अग्निष्टिका, आवार, घरे, खांडी, आडे, विहिरी, खिडक्या, महाद्वारे इत्यादि वास्तूंच्या उपलब्ध अवशेषांद्वारे तत्कालीन मूळ परिस्थितीचे आकलन व्हावे असेच आहे. ती वास्तू मूळ स्थितीत कशी असावी, हे त्रिमितीय मानचित्रांद्वारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

बृहत्‌ स्थानशोधनी

नित्यं यत्प्रभुसत्तयैतदसृजच्छक्तिः परा चाहरत्

विश्वं यतकृतिसंस्थितिं नु पटवो भक्तुं न विश्वेश्वराः

भेजुर्निर्गुणमीश्वरं गुणगणायानंतशक्तिः सदा

भक्ता यद्रतिमाप्नुवनिरूपमामानंदमीशं नुमः ।।१।।

                                                            -रत्नमाला 

 

   

निधीवास येथील म्हाळसेचा तत्कालीन दारवंठा आणि त्रिमितीय मानचित्र

IMG_6595 01.jpg
016 02.jpg

      प्रस्तुत स्थानशोधनीद्वारे महाराष्ट्रातील संपूर्ण स्थानांची यथार्थ माहिती व्हावी असे उद्दिष्ट जरी असले तरी ते अल्पकाळात होण्यासारखे नाही. तो एक दीर्घसूत्री कार्यक्रम आहे. तूर्त नेवासा येथील स्थानांच्या त्रिमितीय सचित्र लेखाद्वारे सर्वज्ञकालीन परिस्थितीचे आकलन व्हावे म्हणून प्रयत्न केला आहे. आणि हा उपक्रम वर्धिष्णू असणार आहे. त्यातील स्थानांची, देवळांची, मठांची, त्रिमितीय छायाचित्रे पाहून चित्तवृत्ती निश्चितच प्रसन्न होतील. आणि अव्यक्त प्रसन्नता अनुभवगाम्य होईल.

***

      आमच्या पूर्वजांचा कल ईश स्मरणात जन्म क्षेपण्याकडे होता. ‘स्थान’ संरक्षणाच्या मिषाने कोण्या स्थानाची सवय करण्याचा विचार त्यांना कधी शिवला नाही. पण ‘यामुळे आमची स्थाने गर्दळली’ असे म्हणत आमच्या पूर्वजांवर कोणी बोट ठेवल्यास ते साफ चुकीचे ठरेल. ती आमचीच खंती होती. हल्ली स्थानांच्या संरक्षणाबद्दल जागरुकता आली आहे. सरकार दरबारी नोंदणी सुरू आहे, ही आनंदाची बाब आहे. पण स्थान संवर्धनाची जबाबदारी पार पाडताना, जिर्णोद्धार करताना त्याची यथास्थिती कायम राखली जावी, हे कळकळीने सांगावेसे वाटते. आजही वेरुळन्याये मूळस्थिती कायम असणारी स्थाने नमस करताना लाभणारी प्रसन्नता काही औरच असते. भगवंतांच्या वास्तव्याची साक्ष देण्यास सज्ज असलेले तेथील प्रत्येक दस्तऐवज अंगावर रोमांच आणतात. इतकेच नव्हे तर एकदा ती परिस्थिती मनात ठसवली की नाममंत्ररूपी अश्वावर आरूढ होऊन रोज पश्चातप्रहरी लीळा-चेष्टायुक्त श्रीमूर्तीचे स्मरण करताना हृदयावर निज आल्हादाचे नानाविध तरंग निर्माण होतात. त्याचप्रमाणे जी स्थाने आपल्याला अनुपलब्ध आहेत, म्हणजे जी आम्ही कधी पाहिलीही नाहीत आणि भविष्यातही तशी शक्यता नाही, अशा स्थानांवर घेऊन जाण्याचाही हा उपक्रम प्रामाणिक प्रयत्न करेल. अनुपलब्ध स्थानांचे आणि त्याद्वारे श्रीमूर्तीचे भावनायुक्त स्मरण करण्यासही तो साधकाला साह्यभूत ठरो, अशी अपेक्षा आहे.

***

नेवासा मुखपुष्‍ठ -

निधीवास शहराचे त्रिमितीय मानचित्र -

प्रतिक्रिया आणि अभिप्राय (7)

Sheetal Anasane
Sheetal Anasane
Nov 04, 2023

Dandavat Pranam 🙇‍♀️ Yesterday someone shared this Newasa video on YouTube with me for Study purpose as I wanted to imagine Stan while doing study of charitra.. I am so great full to get introduced to this video.

  • Contact used for reference is with "Praman"

  • The grafix used is too good

  • The background speach gives more information

  • We can very well imagine how and where Swamiji was


It takes lot of efforts for the sanshodhan to have output like this. I am very much grateful to see this.

It ll be my pleasure if I can be helpful inanyway.


Dandavat Pranam 🙏

Shri Chakradhar Swami always be with you.

Like
Replying to

Thank You so much for your kind words. We really appreciate it.

For detail description you can go गावांची सूची >> नेवासा page.

Like

Suraj Warghane
Suraj Warghane
Sep 13, 2023

Good work Dandvat pranam

Like

Sandip Walsinge
Sandip Walsinge
Aug 27, 2023

Awesome work. Very creative. Thank you very much for your efforts.

Dandvat Pranam

Like

Guest
Aug 24, 2023

Good work 👏👍🏻 Dandvat pranam





Like

Guest
Aug 21, 2023

दंडवत प्रणाम दादा. Good work best luck for your upcoming projects.

Like

Guest
Aug 16, 2023

Dandavat pranam

Like

स्थानशोधनी

©2023 by स्थानशोधनी. Proudly created by Shri Devdatt Ashram, Jadhavwadi

Total Views

bottom of page